Aamchi Americechi Vari in Marathi Travel stories by Bhaskar Pawar books and stories PDF | आमची अमेरिकेची वारी

Featured Books
Categories
Share

आमची अमेरिकेची वारी

आमची अमेरिकेची वारी
आमची अमेरिका वारी - भास्कर पवार
रात्री सव्वादोनची वेळ. गुरूवार, 4 जून 2004, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून आमच्या ब्रिटीश एअरवेजच्या बोईंग विमानाने रनवे'वर धावण्यास सुरूवात केली. विमानतळाचे दिवे भराभर मागे टाकत विमानाने वेग घेतला. त्याआधी विमानाच्या संबधात सुरक्षीततेचे उपाय, सिटबेल्ट बांधण्याच्या सुचना, पायलट व क्रू यांची नावे, आणीबाणीच्या परिस्थितीत घ्यावयाची काळजी, इत्यादी बाबत सूचना करण्यात आल्या. आम्हांला विमानात खिडकीजवळची जागा मिळाली होती. माझा व रजनीचा हा पहिलाच विमान प्रवास होता. नाही म्हणायला हैद्राबाद्च्या 'रामोजी फिल्म सिटीच्या' विमानाचा आभास निर्माण करणा-या प्रतिकृतीच्या एका बाजूलाबसुन आपण विमानातच बसलोय असे फोटो काढले होते. विमानातील सीटच्यासमोर छोटा टिव्ही होता. आर्मरेस्ट्च्यावर स्क्रिनकंट्रोलची वेगवेगळी बटणे होती. १ते१८ चॅनेल होते त्यावर वेगवेगळे सिनेमे व शेवटचा चॅनल होता मॅपचा. त्याच्यावर विमानाची गती, मुंबईची आत्ताची वेळ, पोहोचणा-या ठिकाणाची आत्ताची वेळ, म्हणजेच लंडनची स्थानिक वेळ, विमानाची सध्याची जमिनीपासूनची ऊंची, इत्यादी माहिती वेळोवेळी येत होती. विमानाने आता खूपच वेग घेतला होता. साधारणतः ३६,०००० फूट उंचीवर गेल्यावर ते स्थिरपणे उडू लागले. खिडकीतून खाली पाहताना खाली-खोलवर जमिनीवरील लुकलुकणारे प्रकाशाचे बिंदु लहान लहान होत लुप्त होत चालले होते. पड्द्यावर विमानाचा वेग दिसत होता. ताशी हजार किलोमीटर वेगाने विमान ३६,००० फूट ऊंचीवरुन उडत होते. बाहेरचे तापमान वजा ३०-४० सेंटीग्रेड्च्या आसपास होते. विमान हवेत झेपावताना पोटात कसेतरी होते असे वाटत होते पण विमान आकाशांत कधी झेपावले व केंव्हा स्थिर झाले हे समजलेच नाही. रजनीचा सुध्दां हाच अनुभव होता. समोरच्या स्र्किनवर विमानाच्या मार्गाचा नकाशा होता. त्यांत अरबी सम्रुद्र सोडल्यानंतर काळ्या समुद्रापर्यंतचा प्रवास भुभागावरुन होणार असल्याचे दिसत होते. विमानातील ह्या नवलाईतून हवाई सुंदरीच्या मंजुळ आवाजाने भानावर आलो. स्वच्छ ग्लासातून पाणी व ज्यूस देण्यासाठी तिने " एस्कुज मी" म्हंटले होते व सीटसमोरील छोटा ट्रे ओढून त्यावर पाण्याचे व ज्यूसचे ग्लास ठेवले. ते थोडे सुध्दां हिंदकळत नव्हते, एक थेंबही सांडत नव्हता. जाता-जाता हवाई सुंदरीने खिडकीचे शटर बंद करण्याची विनंती केली. ती नाकारणे मला शक्य झाल नाही. आमचे विमान ब्रिटीश एअरवेजचे होते. मुंबईला वेटींग-रुममधे बरेच प्रवासी होते. पण त्यातले महाराष्ट्रीयन कोण व परदेशी कोण हे कपडयावरुन ओळ्खणे कठीण होते. विमानतळाच्या बाहेर मुलगी स्वाती, जावई अजय, नातू अभिषेक व माझे व्याही श्री. बुलबुले हे सर्वजण थांबलेले होते. चेकींग झाल्याचे त्यांना फोनवरुन सांगितले.व परत १० मिनिटांनी फोन करतो असे म्हटले होते. परंतु वेटींग रुममधल्या फोनवरुन नेहमीप्रमाणे काही केल्याफोन लागला नाही. एका सहप्रवाशाच्या मोबाईलवरुन मुंबईत राहणारे जुने स्नेही सुर्यकरांकडे फोन करुन जावई-अजय यांना फोनकरण्यास सुर्यकरांना सांगितले. व तसेच पुण्याला जायला निरोपही दिला.या सर्व गडबडीत एक वयस्कर गृहस्थ आमच्याशी मराठीतून बोलले ते आमच्या बरोबर-विमान प्रवासतही बरोबर होते. आयुष्यात कधी एवढया मोठ्या प्रवासाचा योग यईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. माझा मुलगा योगेश याला अमेरिकेत जाउन पांच वर्ष झाली होती. या अगोदर त्याच्याकडे जाण्याचा योग नव्हता. नोकरी-सोनलचे (घाकटीमुलगी) लग्न,योगेशचे लग्न व अमेरीकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला यामुळे त्याच्याकडे जाण्याचा विचार करणेही शक्य नव्हते. पण योगेशने स्थिरस्थावर झाल्यावर प्रथम कोणते काम केले असेल तर, आम्हां दोघांना अमेरिकेत येण्यासाठी करावी लागणारी व्हिसा- कागद पत्रांची पूर्तता, त्यासाठी कायकाय करावे लागेल या बाबतची संपूर्ण जंत्रीच त्याने पाठवली होती. व्हिसा काहीही त्रास न होता मिळाला. तिकिटांची, इन्शुरन्सची, पूर्तता झाली. युकेच्या ट्रान्सीट व्हिसाचा विषय बरेच दिवस चर्चेत राहिला .कारण आमचे विमान मुंबई-लंडन, लंडन-बोस्टन असे जाणार होते. लंडनला ३ तास विमान थांबणार होते. त्यासाठी ट्रान्सीट व्हिसा आवश्यक आहे का नाही यासाठी ब-याच वेबसाईट्वर जाऊन माहिती घ्यावी लागली होती. काही ठिकाणी इमेल ही केले. काहींची उत्तरे होकारार्थी तर काहीची नकारार्थी आली होती. शेवटी युके-काऊन्सिलेटने सर्व विमान कंपन्यांना पाठविलेले अलिकडचे परिपत्रक वेबसाईटवर मिळाले, त्यांची प्रिंट करुन बरोबर ठेवायची असे ठरवलं होते. विमान आता ३६,००० ते ३९,००० फूट ऊंचीवरुन उडत होते. तास-दि ड्तांसाचाच प्रवास झाला होता. आता जेवण आले. काही पदार्थ चवदार तर काही अगदीच बेचव होते. रजनीने पूर्ण शाकाहारी जेवण घेतले होते. मी मात्र एशियन नाॅनव्हेज - त्यात आम्लेट्खेरीज दुसरे काहीच आवडले नाही. ब्रेड,बटर बरे होते. पाणी मात्र अतिशय स्वछ व स्वछ ग्लासात होते. समोरच्या स्र्किनवर विमान सध्या कुठे आहे? कितीउंचीवर आहे, व मुंबईला किती वाजले हे कळत होते. माझे घड्याळ मुंबईच्या वेळेनुसार तर, हिचे घड्याळ लंडनच्या वेळेनुसार लावले होते. मनांत वेळेचा हिशोब करत प्रवास चालला होता. सकाळ्पासूनची दगदग-- पुणे-मुंबई प्रवास यामुळे हिला डुलकी लागली होती. मी मात्र स्र्किन-वरचे वेगवेगळे देश,सुंदर शहरे,व त्यांची नावे पहात होतो. लंड्नला पोहोचण्याची वेळही मधूनमधून स्र्किनवर येत होती. मुंबईतून निघताना वाटत होते की, सिनेमांत दाखवतात तसे विमानतळावर चालत जाऊन विमानाला लावलेल्या शिडीने विमानांत चढायचे. परंतु वेटींग-रुममधून निघाल्यावर बंद पॅसेजमधून चालत जाऊन कधी विमानात पोहोचतो ते कळलेच नाही. सीट शोधण्यासाठी हवाई सुंदरीने तप्तरतेने मदत केली. विमानात स्पिकरवरुन सूचना देताना त्या इंग्रजी बरोबर हिंदीतूनही देण्यात येत होत्या. गुजराथीतूनही सूचना देण्यांत येतील असे सांगितले . परंतु शेवटपर्यंत गुजराथीमधून सूचना काही दिल्या नाहीत. ब्रिटीश एअरवेजच्या हिंदीतून सूचना ऎकताना बरे वाटले, वाटले ब्रिटीशांनी १५० वर्ष भारतावर सत्ता गाजवली त्याचे परिमार्जन करत असावेत .दुसरा विचार आला की, मार्केटिंगची ही धंदा वाढवण्याची खुबी तर नसेल ना असो. लंड्नचे अंतर मिनिटा- मिनिटाला कमी होऊ लागले होते. मधेच डुलकी लागत होती. मनांत एक अनामिक हुरहुर वाटत होती. युकेच्या स्थानिक वेळेनुसार विमान सकाळी ७.३५ ला हिथ्रो विमानतळावर उतरणार होते. मुंबई ते लंडन हा प्रवास ९ तास ५० मिनिटांचा होता. विमान मात्र ७ वाजताच हिथ्रो विमानतळावर उतरले. त्या अगोदर सिटबेल्ट बांधण्याच्या सुचना देण्यांत आल्या. विमानतळावर उतरतांना खालचे द्रृश्य अतिशय मोहक होते. चित्र काढल्याप्रमाणे प्रमाणबध्द व सुबक रस्ते, नद्या, नद्यांवरील पुल, इमारती. एखाद्या प्रदर्शानांत मोठ्या शहरांची लहान प्रतिकृती ठेवावी असे ते चित्र डोळ्यांत साठ्वून ठेवतो न ठेवतो, तोच विमान घावपट्टीवर अलगद उतरले, रनवेवरुन धावत-धावत टर्मिनल ४ लागलेसुध्दां, आधाराशिवाय न चालणारे प्रवाशी ,वयस्कर प्रवाशी, मूलबाळ घेवून जाणारे प्रवाशी यांना विमानांतच थांबवून अगोदर इतर प्रवाशांना बाहेर पडू दिले जात होते. विमानाचे पायलट, क्रू, हवाई सुंदरी प्रवाशांना निरोप देण्यांसाठी दारातच उभे होते व हसून 'बाय बाय' करत होते. हिथ्रो विमानतळावर पाऊल ठेवले. इंग्रजांच्या भूमीवर आपल्यांला कधीकाळी पाय ठेवता येईल असे वाटले नव्हते. याच भूमीवरुन हिंदुस्थांनात येऊन १५० वर्ष राज्य करणा-या ब्रिटीश नागरिकाला शोधण्याचा उगीचच असफल प्रयत्न केला. नक्की इंग्रज कोण ? साऱ्या जगातले असंख्य लोक विमानतळावर दिसत होते. 'हिथ्रो' विमानतळ हे जगातील सर्वात मोठे विमानतळ आहे. तेथे अनेक ठिकाणी एक्झीट व ट्रांझीटचे बोर्ड होते. मी ट्रांझीटचा मार्ग जिथे नेईल तिकडे हातातील बॅगा साभांळ्त जात राहिलो. पुन्हा एकदां मेटल डिटेक्टरने सामान व सर्व शरीराची तपासणी झाली. आमचे पुढचे विमान त्याच टर्मिनलला लागणार होते. टर्मिनलला २५ गेट्स होते. त्यापैकी कोणत्या टर्मिनलला विमान पार्क होणारहे दिसण्यांसाठी अनेक डिस्प्ले विमान तळावर मौजूद होते, व ते इतर विमानांच्या बाबतीत तसे दाखवतही होते. परंतु आमचे विमान कुठे लावायचे हे त्यांचे ठरलेले नसावे म्हणून 'थांबा व पहा' अशीच पाटी दिसत होती.शेवटी अर्धातास तिथे थांबून कंटाळा आला म्हणुन रजनीला तिथेच उभे करुन मी फोन करावा. म्हणून जवळच असणा-या बुथपाशी गेलो. तेथे सर्व व्यवहार पौंडातले. माझ्याजवळ भारतीय नोटा व अमेरिकन डॉलर्स , एका भल्या गृहस्थाने माझी अडचण ओळ्खून इंग्रजीतून मला मार्ग-दर्शन केले, त्याच्या इंग्रजी उच्यांरातून सर्वच काही कळले असे नाही, फक्त इतके कळले की थोड्या अंतरावर कार्ड विकत मिळतात. तिथे जाण्याचा मार्ग खुणेने त्याने सांगितला. तिथे जाऊन १३ डॉलर्स खर्च करुन ५ पौंड किंमतीचे फोन कार्ड घेतले, त्या कार्डावरील नंबर स्क्रॅच करुन योगेशला अनेक प्रयत्नानंतर फोन लागला. परंतु तो व्हाॅइसमेलला गेला. त्याला निरोप ठेऊन , ही उभी होती तिथे परत आलो. अजुनही विमान कोणत्या गेटला लागणार याचा डिस्प्ले अद्यापही येत नव्हता. विमान तळावरील खुल्या बाजारात चक्कर मारायचे ठरवून निघालो, ह्या 'डयुटी फ्री' दुकानातून काय म्हणून विक्रीला नव्हते,...-टिव्ही, कॉमेरे, व्हिडीओ शुटींगचे अद्ययावत कॅमेरे, मल्टीमिडीयाचे जगातले एकूणएक प्रकार, विविध प्रकारचे चॉकलेट, इ विक्रीला असलेली भव्य दुकाने, काचेच्या विविध रंगाच्या व आकाराच्या वस्तू, मुलांचे कपडे, खेळणी, पुस्तके, वेगवेगळ्या आकाराच्या बाटल्यातून भरलेली मदीरा, एकास एक फ्री सौंदर्यप्रसाधने, सुकामेवा, अत्याधुनिक वस्तू,- काय म्हणून त्या बाजारपेठेत नव्हते. जाहिरात करण्यासाठी एक फिरती कारही त्या ठिकाणी होती.त्या प्रचंड मार्केट्मधले ग्राहक मात्र सर्व प्रवासी होते, किती तरी वर्णाचे, धर्माचे, जातीचे, स्त्री-पुरुष, मुले, वयस्कर माणसे, कॆरीयरवर सामान ठेउन इकडून तिकडे फिरत होते. किती वाजले हे डिस्प्लेवरुन समजत होते. येथे उतरुन आता साधारण १ तास होत आला होता. मन बाजारातील वस्तुंच्या किंमतीचा अर्थात पौंडात हिशोब करत होते एखाद्या वस्तूला किती डॉलर द्यावे लागतील व त्याचे रुपये किती हे मनातल्या मनात ठरवित होते मधेच एका ठिकाणी रेस्टरुम दिसली. मग आळीपाळीने बॅगा सांभाळत वॉश घेतला. अद्यापही विमान कुठे लागणार हे समजले नव्ह्ते. शेवटी माहिती देणा-या कांऊटरवर बोस्टनला जाणारे विमान कोणत्या फलाटाला लागणार आहे हे विचारले असता २३ नबंरच्या गेटवरआमचे विमान लागणार असे कळले, त्या गेटकडे जाणारा मार्ग बाणाने दाखवला होता. आम्ही उभे होतो तेथुन २३ नंबर गेट्पर्यंत जायला साधारणपणे ३० मिनिटे लागणार होती. विमानाची वेळ १० वाजुन ५५ मिनिटे होती. आता साधारण नऊ सव्वा नऊ झाले होते. गाडी ढकलत ,गप्पा मारत आम्ही आजुबाजूची नवलाई पहात क्रं २३ कडे निघालो. मधूनच मागून घंटी वाजवत एखादी लहान कार(फ़्लॅक--वयस्कर प्रवाशांना घेवून जाण्यासाठी असणारे छोटे वाहन) येत होती. त्यातला प्रवाशी वयस्कर दिसत होता, परंतू ती गाडी चालवणारा सुध्दा वयस्करच होता. ; एकदाचे २३ नंबरचे गेटवर येऊन पोहोचलो. तिथे असलेल्या चेअर्सवर आराम करत बसलो. सुमारे अर्धातासाने विमानात बसण्यासाठी सोडण्यात येणार होते. काचेच्या तावदानातून आम्हाला नेणारे विमान दिसत होते. मुंबईला आमचे विमान बाहेरुन कसे दिसते, ते आम्हांला बघायला मिळालेच नव्हते. आता मात्र ब्रिटीश एअरवेजचे विमान दिसत होते. विमानांत प्रवाशी-सामान चढवण्याचे काम चालू होते.प्रचंड मोठ्या जाळीच्या कंटेनरमधे अनेक प्रवाशांच्या बॅगा, लगेज, अनेक मोठी गाठोडी, क्रेनच्या साह्यांने ठेवण्यात येत होती. आमच्याही बॅगात्यात असाव्यात. विमानतळाच्या ४ नंबरच्या टर्मिनलचा थोडाच भाग दिसत होता. डावीकडे गेट क्रं २२-२१-व पुढे २४ असे गेट दिसत होते. प्रत्येक गेटवर ब्रिटीश-एअरवेजची विमाने होती. आकाशांतून साधारण मिनिटाला एक विमान खाली येतांना किंवा आकाशांत झेपावताना दिसत होते. लंड्नच्या विमानतळावरुन १० वाजता विमानात बसण्याची परवांगी मिळाली. परत आम्हाला खिडकीजवळील जागा मिळाली. ३ सीटच्या रांगेत खिडकीजवळ रजनी, नंतर मी व मग एक कृष्णवर्णीय तरुण बसला. विमानांत 'क्रू' ने अतिशय अदबीने स्वागत केले. प्रवास उत्तम होणार याची खात्री पटत होती. यावेळी तीन सिटच्या रांगेत असल्याने थोडी अडचण भासत होती खरी -पण महाराष्ट्र महामंडळाच्या एसटी प्रवासाची आठवण करुन घेता-- ह्या सीट केव्ह्ढ्यातरी सुखकारक होत्या, विमानाने आता निघण्याच्या सूचना दिल्या. बेल्ट लावण्यांस सांगण्यात आले. ह्या सुचना मात्र एकूण एक प्रवाशी अत्यंत प्रामाणिकपणे अमलात आणतांना दिसत होते. थोडयाच वेळात विमानाची घरघर सुरु झाली. पण धावपट्टीकडे निघण्याची काही चिन्हे दिसेनात. शेवटी सूचना आली की, विमान अर्धा तास उशिरा सुटेल, मग पुन्हां बेल्ट सोडले, व विमानात काही भारतीय चेहरे दिसतात का ते पाहू लागलो.पण एकही भारतीय दिसत नव्हता. नाही म्हणायला एक दाक्षिणात्य जोडपे दिसले ४-५ रांगा सोडून बसले होते. आता जवळपास पाऊण तास झाला होता.पुन्हां एकदा सूचना झाली यावेळी मात्र काही तांत्रिक कारणाने खोटी झाली आहे. व थोडया वेळातच पुढचा प्रवास सुरु होईल असे सांगून दिलगिरी व्यक्त केली. अशा ४ वेळा सूचना देऊन शेवटी २ तास उशिराने विमानाने घावपट्टी-कडे धावण्यास सुरूवात केली. विमान उशिरा सुटण्याचे कारण, विमानाचा लगेज चढ्ण्याचा दरवाजा बंद होत नव्हता. हे आम्हांला शेवटच्या सुचनेतून कळ्ले. हिथ्रो लंडन ते बोस्टनचा प्रवास ८ तासांचा होता. आता विमान घावपट्टीवरुन वेगाने निघून आकाशांत झेपावले सुध्दां. खिडकीतून लंड्न शहराचे विहंगम दॄश्य दिसत होते. रस्ते, इमारती, कुठे हिरवागार निसर्ग, तर कुठे नद्या, तलाव, पूल, इत्यादी आता विमान उंच ढगात गेले. खालचे दॄश्य ढगात धुक्यात लपून गेले. आजुबाजूला ढगच ढग नसतील तर फक्त पोकळी. आता विमान ३६,००० फुटांवरुन उड्त होते. विमानाचा मार्ग टिव्ही वर दिसत होता. आता पुढचा प्रवास समुद्रावरुन होता. अटलांटीक महासागरावरुन आमचे विमान जाणार होते. विमान स्थिर होताच खाण्याचे पदार्थ द्यायला सुरवात झाली. प्रथम ज्यूस आले. हवे ते ज्यूस मिळत होते. आमच्या शेजारच्या प्रवासी मित्राने वाइन घेतली. जेवणांत पालकभाजी, पराठे, मुगाची उसळ, सॅलड, टॅमाटो सूप व चॉकलेट, पण होते. थोडे जागत थोडे झोपत असा प्रवास सुरु होता. शेजारचा मित्र आता जरा आनंदलेला दिसत होता.त्याच्या चेह-यावर थोडे स्मित होते. त्याने हाय पण केले. ३/४ तास असेच गेले. पुन्हा जेवण आले. भारतीय पदार्थ घेतले. शेजारच्या मित्राने परत २ बाटल्या मागवल्या. १ मला देऊ केली.'साॅरी' म्हटल्यावर त्याला बरे वाटले.असे दिसले. कारण त्याच्या पेयाच्या वाट्यात मी सामील झालो नव्हतो. आता बोस्टन आता १ तासावर राहिले होते. विमान खरे तर त्या वेळेनुसार १ वाजता पोहोचणार होते. त्याआधी विमानात इमिग्रेशनचे फार्म भरुन ठेवले. विमान आता विमानतळाभोवती घिरट्या घालू लागले. कदाचित धावपट्टी मोकळी नसावी. पुन्हां एकदां बोस्टनवर एक मोठी फेरी मारली. विमानातून बोस्टन शहर अतिशय सुंदर दिसत होते. समुद्रावरील कमानीचा पूल, उंचच उंच इमारती,रस्ते, अगदी स्पष्ट दिसत होते. मनांत इतिहासातील बोस्टन टी-पार्टी इथेच कुठे तरी झाली का? असा विचार आला. शेवटी ३ वाजता विमानबोस्टनच्या विमानतळावर उतरले. थोडासुद्घां घक्का बसला नाही. लगत अगदी पिसासारखे उतरले. पुन्हां तपासणी, स्क्रिनिंग, बॅगा, ताब्यात घेणे व फिंगर प्रिंटीग इत्यादी सोपस्कार झाले. शेवटी निघताना सुध्दां बोस्टनच्या विमानतळावर सुरक्षा-रक्षकाने विचारले," आंबे वैगेरे आहेत का बॅगेत ? आमच्या नाही म्हणण्यावर त्याने चटकन विश्वास ठेवला. आम्ही तेथून निघालो. या सर्वात साधारण ४५ मिनिटे गेली होती. आता उत्कंठा शिगेला पोचली होती. बॅगा ढकलत आणि नजरेने योगेश- अजिता कोठे दिसतात का? ह्याचा शोध घेत बाहेर आलो. दोघांनी आम्हाला वाकून नमस्कार करुन पुष्पगुच्छ कधी हातात दिले हे पाणावलेल्या, हरवलेल्या नजरेला दिसलेच नाही. आयुष्यांत आपल्या मुलाने व सुनेने येवढे सुंदर स्वागत करावे हे खरोखरच मोठ्या भाग्याचे. आयुष्यांत कधीही न विसरण्या-सारखे ते क्षण तो प्रसंग. एक सुंदरसे ग्रिटींग योगेशने आणले होते. योगेश- अजिताने चॉकलेटस आणले होते. ते आम्हांला खायला लावले. आता बॅगा ओढण्याची जबाबदारी त्या दोधांनी घेतली. विमानतळाच्या बाजूलाच असलेल्या पार्किंग लॉट्मधे ठेवलेल्या गाडीकडे गेलो. आणि गाडीतून घराकडे आमचा प्रवास सुरु झाला. योगेशच्या घरी सुमारे एका तासात पोहोचलो. भव्य मोठे रस्ते, वेगाने जाणारी वाहने, मोठ्मोठे ओव्हरब्रिज सुंदर सुंदर घरे, घराभोवती हिरवळ नजरेत साठवत योगेश- अजिताच्या घरात प्रवेश केला. प्रथम-दर्शनीच घर एकदम छान ठेवल्याचे दिसत होते. शुक्रवार ४ जुन २००४ चा दिवस होता. बोस्टनला पोहोचलो तेथील तारीखही तीच होती. खरंच आपण अमेरीकेत आलो? मुलांना भेटलो? खरच का? स्वप्न तर नाही ना हे! आणि आरामखुर्चीवर कघी डोळा लागला ते कळलेच नाही. घर छान होते, मोठी वसाहत, ८ मोठ्या इमारती. त्यांत साधारण २४ अपार्ट्मेंटस सर्व बाजूंनी कंपाऊंड -वॉल -मधे हिरवळ, फुलांची झाडे,आणि मुख्य म्हणजे सर्व बाजूच्या इमारती-भोवतीने फिरायला रस्ते होते. मध्यभागी पोहण्याचा तलाव होता. अशा त- हेने सर्व सुख-सोईंनी युक्त अशी जागा होती. आता या वास्तूत ६ महिने वास्तव्य करावयाचे होते. माझा अगदी सिंहगड ते मुंबई, व पुढे लंड्नमार्गे बोस्टनपर्यंतचा प्रवास तुम्ही माझाबरोबर केलातच आता अमेरिकेतल्या गमती--जमती पुढ्च्या लेखात ... भास्कर पवार लॅनकॅस्टर,अमेरीका.