Olakh in Marathi Magazine by Kaustubh Anil Pendharkar books and stories PDF | ओळख

Featured Books
Categories
Share

ओळख

  • ओळख
  • © कौस्तुभ अनिल पेंढारकर
  • email :

    Mobile : +91 8976135528

    कामानिमित्त एका टोलेजंग इमारतीत गेलो होतो. धडधडत्या छातीनं आत प्रवेश केला होता आणि निराश होऊन बाहेर पडलो होतो. काम काही झालं नाही. वेळ मात्र फुकट गेला होता. त्यावेळेत इतर अनेक कामं करता आली असती. पण ती बाजूला टाकून इथे येण्याचा जुगार खेळलो होतो मी. आणि हरलो होतो.

    एव्हाना याची सवयच झाली होती. सात प्रकाशकांनी याआधीच आशा उंचावून मग निराशा केली होती माझी. कोणाला माझ्या गोष्टीत आणखी मसाला हवा होता, कोणाला महत्त्वाचे भाग खटकले होते, कोणाला ही कथा अति बौद्धिक वाटली होती तर कोणी याला सरळ सरळ वायफळ लेखन म्हटलं होतं. जे छापायला तयार होते, त्यांच्याशी पैशाच्या मुद्यावरून बोलणी फिसकटली होती. अकरा प्रकाशकांनी उत्तरंच दिलं नव्हतं. आणि आज तर कहरच झाला होता. माझं पुस्तक त्यांना आवडलं नव्हतं, पण माझी लेखनशैली म्हणे आवडली होती आणि तशाच शैलीत त्यांच्यासाठी लेखन करायची मला ऑफर देण्यात आली होती. पण नाव कोणा भलत्याचंच लागणार होतं. माझं डोकंच फिरलं. मी स्पष्ट नकार दिला. मला चार उपदेशाचे शब्द सुनावण्यात आले, माझं आयुष्यात काहीही होणार नाही अशी भविष्यवाणीही करण्यात आली, आणि मला बाहेरचा रस्ता दाखवण्याआधीच मी बाहेर पडलो होतो. छाती तर अजूनही धडधडत होती, पण मघाशी उत्साहानं, आणि आता रागानं, एवढाच काय तो फरक होता.

    दाणदाण पाय आपटत मी रस्त्यातून चाललो होतो. रस्ता चांगला मोठा होता. विस्तीर्ण! वेळ दुपारची होती. वर्दळ फारशी नव्हती. थोडं पुढे गेल्यावर रस्त्याच्या पलिकडल्या बाजूला एक चहा आणि पानवाल्याची टपरी होती. तिथे इस्त्रीचे कोरे करकरीत शर्ट, पँटमध्ये खोचून काही ऑफिसची मित्रमंडळी गप्पा मारत उभी होती. पुरुष चांगलेच मल्ल दिसत होते. बायका - बायका कसल्या मुलीच त्या, माझ्या वयाच्या... गो-यापान आणि केस रंगवलेल्या. जवळजवळ सगळ्यांच्याच हातात सिगरेटी होत्या. मला सिगरेट पिणारी मंडळी आवडत नाहीत. सहनच होत नाहीत. मी मान फिरवली. पुढे पाहू लागलो. इतक्यात त्या चेह-यांमध्ये कोणीतरी ओळखीचं दिसल्याचा भास झाला. मी पुन्हा पाहिलं. माझी छाती नव्यानं धडधडत होती. मला ती दिसली. मी चटकन् तिचे हात पाहिले. एका हातात मोबाईल, दुसरा मोकळा होता. ती फुकत नव्हती. पण ती त्यांच्यात उभी राहून हसत होती, मुक्तपणे.

    सगळा भूतकाळ डोळ्यांसमोरून अतिशय फिल्मी स्टाईलमध्ये खर्रकन् येऊन गेला. मी जागच्या जागी थबकलो होतो. माझ्या पोटात मोठ्ठा खड्डा पडला होता. उत्साह, भिती, राग, प्रेम सगळ्याच भावनांनी मनात गोंधळ घालायला सुरुवात केली होती. काॅलेजचे दिवस आठवले. त्यावेळची तिची साधी राहणी आठवली. तिचे केस आजही वा-यासोबत उडताना तितकेच मस्त दिसत होते. थोडी जाड झाली होती. मला अचानक तिचं नाव घेऊन ओरडावंसं वाटत होतं. अशा लोकांमध्ये का वावरतेस असं म्हणून तिच्या कानशिलात ठेवून द्याविशी वाटत होती. त्याचवेळी तिला जाऊन घट्ट मिठी मारावीशी वाटत होती. तशीच असेल का अजूनही? तितकीच तिखट, झणझणीत स्वभावाची? की बदलली असेल परिस्थितीनुसार? मीच केवढा बदललो होतो. मी तिच्या हातातल्या महागड्या मोबाईलकडे पाहिलं. तिच्या खांद्याला लटकावलेल्या पर्सकडे पाहिलं. तिच्या शेजारी उभा राहून मधूनच तिच्या खांद्याला किंवा कंबरेला हात घालणा-या धिप्पाड देखण्या माणसाकडे पाहिलं. तिच्या चेह-यावरचं हसू पाहिलं. माझ्यासोबत एक साधा मित्र म्हणून फिरत असतानासुद्धा इतकं निखळ ती कधी हसल्याचं मला प्रयत्न करूनही आठवेना. आठवत होतं ते फक्त आमचं शेवटचं भांडण. आठवत होता माझा त्यावेळचा चिकटू आणि स्वाभिमानशून्य स्वभाव. तिचा निर्विकार चेहरा आणि तिचे स्पष्ट, मनाला बोचणारे खडे बोल. तिनं माझ्याशी बोलणं टाकलं होतं. कॉलेजमध्ये अनोळख्यासारखी वागणूक द्यायची. कॉलेज संपल्यावर आज पहिल्यांदा दिसली होती. केवढी खूश दिसत होती ती, माझ्याशिवाय. मी स्वतःकडे एकवार चोरटी नजर टाकली. माझ्या जुन्या मळकट जीन्सला गुडघ्याजवळ मोठालं भोक पडलं होतं. ती काही फॅशन नव्हती. माझ्या खिशात साधासाच टूजी नेटवर्क असलेला मोबाईल होता. मी देखणा नव्हतो. मी सुदृढ तर नव्हतोच नव्हतो. ती या सगळ्याला फारसं महत्त्व देणा-यातली नव्हती म्हणा. पण तरी माझ्या संकोचात भर पडायला एवढं पुरेसं होतं.

    काय करावं? जावं रस्ता ओलांडून? ओळखेल ती? ओळखलं तर नीट बोलेल का? की उडवून लावेल? चूक तर माझीच होती. मीच भांडायला नको होतं. आता पश्चात्ताप करून काय उपयोग? माझ्यात आणि तिच्यात फक्त दहा-वीस पावलांचं अंतर होतं. पण ते पार करण्यासाठी माझ्या पायात शक्तिच उरली नव्हती. मी तसाच तिला न्याहाळत तिथे उभा राहिलो. मधूनच माझी नजर मी खाली घेत होतो. माझ्यात तिच्याशी नजरानजर करण्याची हिंमत होत नव्हती. ती खरं तर माझ्या दिशेने ढुंकूनही बघत नव्हती. का बघेल? काय होतं माझ्यात बघण्यासारखं? पण तरी... ती तिथे होती. हसत होती. बोलत होती. मोठ्या आवाजात गप्पा मारत होती. टाळ्या घेत होती, देत होती. खुशीत होती. मी तिच्या आयुष्याचा भाग नव्हतो. कदाचित म्हणूनच? मला तिथून निघून जावंसं वाटायला लागलं. पण पाय जागचा हलेना. कोणास ठाऊक कधी पाहता येईल पुन्हा! तेवढ्यात एक मोठी आलिशान गाडी रस्त्याच्या टोकावरून आली. एसयुव्ही होती. ती त्या टपरीसमोर थांबली आणि त्यामुळे मला ती दिसेनाशी झाली. मला माझ्या छातीतल्या ठोक्यांची जाणीव झाली. बरगड्या तोडून छाती फाडून हृदय आता बाहेर येतं की काय असं वाटत होतं. मी मान खाली घालून तिथे तसाच थोडा वेळ उभा राहिलो. मला माझं रडू अडवायचं होतं. इथे नाही... रस्त्यात नाही... प्लीज. आवर घातला. जेव्हा मान वर केली तेव्हा समोरच्या एसयुव्हीची मधली काच खाली सरकवून ती माझ्याकडे बघत असलेली मला दिसली. मी दचकलो. भांबावलो. ती डोळे बारीक करून मिश्कील हसत होती. मला ओळखायचा प्रयत्न करत होती. नजरानजर झाल्यावर तिनं मला ओळखलं असावं. कारण तिचा आनंदी चेहरा आणखी उजळला आणि अलगद तिचा हात वर आलेला मला जाणवला. मी बधीर झालो होतो. कदाचित माझी चर्या बघून असेल, किंवा तिला आमचं भांडण आठवलं म्हणून असेल, पण तिचा हात वर येत असताना अचानक थांबला आणि मी चेहरा थोडा हसरा केल्यावर मग पुढे गेला. मला ती संकोचलेली जाणवली. पण तिनं झटक्यात तो संकोच झटकला. आणि मोठ्या आवाजात मला हात हलवून 'कसा आहेस? इकडे कुठे?' असं विचारलं. मी त्या इमारतीकडे बोट दाखवून 'काम होतं' असं म्हटलं. मला माझा आवाज माझा वाटलाच नाही. 'कसलं काम?' मला काय उत्तर द्यावं कळेना. तेवढ्यात तिची एसयुव्ही सुरू झाली. तिचा माझ्या उत्तरातला रस मावळला. तिनं मला पुन्हा हात केला, आणि काच वर केली. ती एसयुव्ही जाईस्तोवर मी तसाच उभा होतो. मग आधार घेण्यासाठी पाठच्या एका इमारतीच्या भिंतीला टेकलो. माझं अख्खं अंग थरथरत होतं. मला हसावं की रडावं तेही कळत नव्हतं. थोडा वेळ तिथे तसाच टेकून उभा राहिलो. मग... खिसा थरथरला.

    अननोन नंबरवरून कॉल होता. आणि त्यातल्या नऊ आकड्यावर एक थेंब पडला.

    - © कौस्तुभ अनिल पेंढारकर.

    email :

    Mobile : 8976135528