Akalpit - 5 in Marathi Fiction Stories by Dr Naeem Shaikh books and stories PDF | अकल्पित - 5

Featured Books
Categories
Share

अकल्पित - 5

(वाचकांनी हा अध्याय वाचण्या आधी सुरुवातीचे चार अध्याय वाचावे. अन्यथा वाचकांना या अध्यायाचा अर्थ लागणार नाही.)

Chapter 5

इतके दिवस माझ्यासोबत वाया घालवल्यानंतर राहुल त्याच्या कामावर गेला. करीश्मा काही दिवस माझ्या घरी येणार नाही याची मला खात्री होती. सकाळपासूनच मी घराची साफ सफाई करायला सुरूवात केली. दुपारी काही वेळ आराम केला आणि चार वाजल्यापासून पुन्हा सफाईला सुरुवात केली. संध्याकाळी पाचच्या सुमारास सायली माझ्या घरी आली. मी सफाई करण्यात इतका गुंग झालो होतो की मला तिची उपस्थिती जाणवलीच नाही.

“मी आत येऊ का¿”

तिने दारातूनच मला आवाज दिला. तिच्या आवाजाने भानावर आल्याबरोबर मी तिला घरात बोलवले.

“आज साफ-सफाईचा दिवस आहे की काय¿”

“त्याचं काय आहे ना, काल आमच्याकडून घर खुप घान झाला. त्यामुळे आज जरा सफाई करावीशी वाटली.”

सोफ्यावर कपडे ठेवलेले होते. बसण्यासाठी मी तिला सोफा मोकळा करून दिला. ती माझ्या सफाईच्या कामाकडं पाहत सोफ्यावर बसली.

“घराची सफाई तू एकट्यानेच केली¿”

“सकाळपासून करतोय. तेव्हा जाऊन कुठं अर्धा घर साफ झालाय.”

“मला म्हणायचं होतं तू एकटाच कसा, राहुल किंवा करीश्मा आले नाहीत का¿”

“राहुल त्याची नोकरी सांभाळतोय. गेल्या आठवड्याभरात तो फक्त दोन दिवसंच नोकरीवर गेलाय. त्यामुळं मीच त्याला कामावर जायला सांगितलं. आणि करीश्मा... आमच्यात भांडण झालंय. त्यामुळे ती येणार नाही.”

“काय रे तुम्ही. लग्नाला आता किती दिवस राहिलेत आणि तुम्ही भांडणं करताय. समोरा समोर बसा, एकमेकांशी बोला आणि काय प्रॉब्लेम आहे ती सॉल्व करा.”

“भांडणं त्या प्रकारचा नाहीये. खरतर ती आली तरी तिला मी घरात घेणार नाही. आणि राहिला प्रश्न लग्नाचा तर... मला असं वाटायला लागलंय की तिच्याशी लग्न करून मी खुप मोठी चुक करतोय.”

“असं झालं तरी काय¿ तू एवढ्या टोकाचा का विचार करतोय¿”

“मी तुला सुरुवातीपासून सांगतो. माझा अपघात झाला होता आणि पोलीस मला हॉस्पीटलमध्ये घेऊन गेले होते. त्यांना माझ्या जवळ काहीतरी अशी गोष्ट सापडली, ज्याद्वारे त्यांनी करीश्माला माझ्याबद्दल सांगितलं. तेव्हा मला करीश्मा भेटायला आली. माझी स्मरण शक्ती पुर्णपणे नष्ट झाली होती. म्हणून तिला मी माझ्या भूतकाळाबद्दल विचारलं. त्यावेळी तिने मला ठरावीकच गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली आमचं लग्न महिन्यांपुर्वी ठरलं होतं. पण इतर कोणालाही माझ्या लग्नाबद्दल किंवा करीश्माबद्दल माहित नाही. त्यामुळे मला अशी शंका येतीये की खरंच आमचं लग्न ठरलं होतं की करीश्मा मला खोटं सांगत आहे¿ चल, ही गोष्ट जरी मान्य केली. पण मी तिला सुरुवातीलाच विचारलं होतं की माझं कोणी नातेवाईक आहे का¿ तेव्हा ती म्हणाली होती की मी अनाथ आहे आणि माझं या जगात कोणीही नाही. तिने माझ्या आजोबांबद्दल मला काहिच सांगितलं नाही. राहुलने मला माझ्या आजोबांबद्दल सांगितलं. आम्ही पुण्याला माझ्या आजोबांना भेटायला म्हणून गेलो. आणि तिथं गेल्यावर कळालं की आजोबा तिन महिन्या पुर्वीच वारले होते....”

“काय¡ तुझे आजोबा वारले, आणि तेही तिन महिन्यापुर्वी¿ मग जेव्हा तू मला गेल्या महिन्यात भेटला, तेव्हा मला सांगितल का नाहीस¿”

“मला नाही माहित की मी तुला आणि राहुलला का नाही सांगितलं ते. राहुलसुध्दा याच गोष्टीला घेऊन नाराज झाला होता. तिथं कळालं की माझ्या आजोबांनी मरण्याआधी त्यांची सगळी प्रोपर्टी माझ्या नावावर केली होती. त्यातले पन्नास लाख मी तिथून घेऊन आलो. त्यातले काही पैसे मी एका मानसाला त्याच्या मुलीचा एक्सीडेंट झाल्यानंतर ऑपरेशनसाठी दिले होते. उरलेले पैसे घरातच असतील या आशेने मी आणि राहुलने काल सगळ्या घरात पैसे शोधले. त्याच वेळी करीश्मा घरी आली. तिला आम्ही काहीच सांगितलं नाही. पण तिला आधीपासूनच सगळं माहित होतं. तिला माझ्या आजोबांबद्दल माहित होतं, ते वारल्याचं माहित होतं, त्यांनी माझ्या नावावर किती पैसे ठेवले आहे ते माहित होतं, तिथुन मी किती पैसे घेऊन आलो हे सुध्दा तिला माहित होतं. तिनेच आम्हाला तो लॉकर दाखवला जो मी माझ्या घरात लपवून ठेवला होता. त्या लॉकरमध्ये एक रुपया सुध्दा नाहीये, हे पाहिल्यावर ती आम्हाला तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेली. पण पोलीसांना आमच्या बोलण्यावर विश्वासच बसला नाही, म्हणून त्यांनी तक्रार लिहूनच घेतली नाही.”

“पण मग तुमच्यात भांडण कधी झालं¿”

“भांडण झालं नाही. पण जे काही झालं त्यावरून करीश्मावर आम्हाला संशय येऊ लागलाय आणि त्यामुळेच मी तिच्यावर पुर्ण विश्वास ठेऊ शकत नाही. तिला माझ्या आजोबांबद्दल माहित होतं तर तिने मला सांगितलं का नाही¿ तिला माझ्या संपत्तीबद्दल माहित होतं, तर तिने आधी का नाही सांगितलं¿ तिच्या घरची परिस्थिति चांगली असून माझ्या सारख्या फटीचर सोबत लग्न करण्यासाठी तिच्या घरच्यांनी होकार कसा काय दिला¿ मी अनाथ आहे, माझे नातेवाईक नाही हे मान्य केलं, पण मग तिचे नातेवाईक, तिचे आई वडील असतीलच की. तिने कोणासोबतही माझी भेट घालून दिली का नाही¿ त्यांच्या होणाऱ्या जावईचा अपघात झाला आणि तिचे आई वडील आतापर्यंत माझ्या घरी मला भेटायलासुध्दा आले नाही¿ महीण्याभरापुर्वी लग्न ठरलं, त्या आधीपासून आमचं प्रेम प्रकरण चालू होतं आणि तरी सुध्दा कोणालाच करीश्माबद्दल माहित नाहीये, हे कसं शक्य आहे¿”

“खरंच. तुझे प्रश्न विचार करण्यासारखे आहेत.”

सायली विचार करत म्हणाली. मी माझं डोकं शांत करत सायलीला म्हणालो.

“हे जाऊदे... माझ्या प्रश्नांच्या नादात मी तुला विचारायचंच विसरून गेलो. तू अचानक इथं कशी¿”

“अचानक कुठं. तुच तर म्हणाला होतास, वेळ काढून ये. तुला काहीतरी प्रश्न विचारायचे होते.”

“अरे हो. पण मी तुला सांगितलं होतं, तुला ज्या दिवशी वेळ असेल त्याआधी मला सांग. त्यानुसार आपण कुठं भेटायचं वगैरे ठरवू. तू जर अशीच दोन दिवस आधी आली असतीस तर तुला परत जावं लागलं असतं.”

“पण मी सांगणार कशी¿ तू तुझा फोन नंबरच दिला नव्हता.”

“आणि दिला असता तरी काहीच फायदा झाला नसता. माझा फोन बंद आहे. जाऊदे, जे झालं ते चांगलंच झालं असं समजायचं... चहा का कॉफी, काय घेणार¿”

“नेहेमी प्रमाणे...चहा.”

मी जाग्यावरून उठलो आणि किचनच्या दिशेने निघालो. पण किचनच्या दारापर्यंत जाऊन थांबलो आणि मागे वळून तिला विचारलं.

“सायली, कॉलेजच्या काळात माझी कोणी गर्लफ्रेंड होती. तिच्याबद्दल मी तुला काही सांगितलं होतं का¿”

“मी तुला त्या दिवशी सांगितलं ना, तू मला तिच्याबद्दल काहीही सांगितलं नाहीस. पण ती मुलगी नक्कीच करीश्मा असणार, मला खात्री आहे. पण तू असं का विचारलंस¿”

“कारण ती मुलगी करीश्मा नव्हती.”

एवढं बोलून मी किचनमध्ये गेलो. चहा बनवून, चहाचे दोन कप घेऊन आलो. सायली सोफ्यावर पडलेला पेपर वाचत होती. मला किचनमधून बाहेर आलेला पाहून सायलीने म्हणाली.

“हे बघं आदि, तुला तिच्यावर बऱ्याच गोष्टींना घेऊन संशय आहे, मान्य आहे. पण पुराव्याशीवाय तू असा विचार करू नये असं मला वाटतं.”

“हा माझा संशय नाहीये. हे करीश्मानेच मला सांगितलं. तिने सांगितलं की आम्हाला भेटून अजून एक वर्षसुध्दा झाला नाहीये... आणि तू जो पेपर वाचत आहेस तो पेपर दहा दिवसांपुर्वीचा आहे.”

सायलीला चहाचा कप देत म्हणालो.

“पेपर मधल्या बातम्या वाचत नव्हते. डायमंडच्या नेकलेसची जाहिरात आली आहे. ते पाहत होते.”

“मग... लग्नाची तयारी कशी चालू आहे¿ कुठंपर्यंत आली¿”

“काही खास नाही. मला आधी तू हे सांग की तू दोन दिवसानंतर काय करतोय¿”

“मी महिनाभर काहीच करत नाहीये.”

मी हसत म्हणालो.

“मग माझ्यासोबत कपड्यांच्या दुकानात येशील¿ मला लग्नासाठी कपडे घ्यायचे आहे आणि माझ्यासोबत कोणीच नाहीये.”

“पण मी तर तुला कपडे निवडण्यात काहीच मदत करू शकणार नाही. मग मला घेऊन जाण्याचा काय उपयोग होणार.”

“तुला माझ्यासाठी कपड्यीची निवड करायची नाहीये. तुला फक्त माझ्या सोबत थांबायचं आहे.”

“नुसतं सोबत थांबायचं असेल तर मग मी तयार आहे.”

“तू मला खास तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बोलवलं होतं आणि तू प्रश्नच विचारत नाहीये. विचार – विचार...”

मी विचार करण्याचा नाटक करून इकडं तिकडं पाहू लागलो. बराच वेळ मी विचार करत असल्याचा नाटक करत राहिलो. मला वैतागून सायली म्हणाली.

“तू तर प्रश्नांची लिस्ट करणार होतास ना¿ काय झालं मिस्टर, मेमरी लॉस¿”

“खरं सांगायचं तर मी काही प्रश्नांनी यादी वगैरे केली नाही. गेल्या काही दिवसांमध्ये जे काही झालं, त्यामुळे मी माझ्याच भूतकाळाच्या प्रश्नांमध्ये असा काही गुंतलो की... म्हणजे गेल्या महिन्याभरात काय झालं आहे याचा विचार करण्यातच सगळा वेळ गेला. त्यामुळे कॉलेजच्या काळातबद्दल मी विचारच केलाच नाही. तुला तेवढ्यासाठी मी बोलवलं आणि मी. त्याबद्दल तुझी माफी मागतो.”

“एवढ्या साध्या गोष्टीसाठी माफी कसली मागतोस. मी कल्पना करू शकते की गेल्या काही दिवसांत इथं काय झालं असेल आणि त्यावेळी तुझी मनस्थीती काय असेल. आता सहा वाजले आहेत आणि मी सातच्या बसने परत जाणार आहे. तर तुझ्याकडे पाऊन तास आहे. या पाऊन तासात तुला जे काही विचारायचं असेल ते विचार आणि जर मी गेल्यानंतर तुला काही प्रश्न आठवले तर त्या प्रश्नांना लिहून ठेव. आपण परवा भेटू तेव्हा मला विचार.”

“नक्कीच.”

माझ्या घरापासून काही अंतरावर ( ५०० मिटर अंदाजे ) बस स्टोप होता. जसं सायलीने ठरवलं होतं, त्या प्रमाणे ती पावणे सात वाजता बस स्टोपवर जाण्यासाठी तयार झाली. पण आम्ही बाहेर येण्याआधी पाऊस पडू लागला. पावसाचा जोर इतका होता की घराबाहेर निघणे शक्य नव्हते आणि त्यात माझ्याकडे छत्रीही नव्हती.

“आता मी काय करु¿ मी बस स्टोपवर पोहोचले नाही तर माझी बस सुटेल आणि आमच्या भागात इथून जाणारी ती शेवटची बस आहे.”

“पाच दहा मिनीट थांब पाऊस थोडा कमी झाला की लगेच बस स्टोपवर जाऊया.”

तिला माझं बोलणं पटलं, म्हणून ती काही वेळासाठी शांत बसली. पण पाऊस काही कमी झाला नाही.

“एक काम कर थोड्यावेळासाठी थांब. आता बस तर गेली असेल. पाऊस कमी होताच आपण टॅक्सीने जाऊया. मी येतो तुझ्या घरी सोडायला आणि सॉरी... माझ्या घरातला फोनसुध्दा बंद आहे. नाहीतर तू तुझ्या घरी फोन करून सांगितलं तरी असतंस की तुला उशीर होणार आहे, असं.”

“घरच्यांचा काही प्रॉब्लेम नाहीये. माझे आई वडील गावाला गेलेत. दोन तिन दिवसांसाठी मी माझ्या मैत्रिणीसोबत राहणार आहे. मी तिला सांगितलं होतं, मी तुझ्या घरी जाणार आहे आणि रात्रीपर्यंत परत येईन. ती तिकडं माझी काळजी करत असणार.”

पावसाचा जोर कमी होण्याचे चिन्ह दिसत नव्हते. पावसात भिजत जाऊन बस पकडणे शक्य नव्हते आणि टॅक्सी स्टॅन्डसुध्दा माझ्या घरापासून बराच लांब होता. शेवटी आम्ही भिजत घरा शेजारच्या दुकानात गेलो आणि तिने तिच्या मैत्रिणीला फोन केला. तसेच भिजत आम्ही परत घरी आलो.

“असंच भिजत आपण टॅक्सी पकडली असती तर मी घरी जाऊन कपडे तरी बदलले असते.”

खुडचीच्या हॅन्डलवर बसत सायली म्हणाली.

“टॅक्सी स्टँड बस स्टँडपेक्षा जास्त लांब आहे. अशा पावसात आपण बस स्टँडपर्यंत जाऊ शकत नाही, मग टॅक्सी स्टँडवर जाणं... पावसाला कमी होऊदे. मग आपण जाऊया.”

“अरे नऊ वाजायला आले. आता कुठं जातोस टॅक्सीने.”

“मग आता काय करणार¿”

“काय करणार काय¿ उद्या सकाळी जाणार आणि सॉरी मी तुला विचारलंच नाही. मी तुझ्या घरी राहिली तर तुला काही प्रॉब्लम तर नाही ना¿”

“मला काहीच प्रॉब्लम नाही.”

मी स्मितहास्य करुन म्हणालो आणि किचनमध्ये जाऊन जेवणाची तयारी करायला घेतली.

माझ्याकडून काही भांडी खाली पडली. भांड्यांचा आवाज ऐकून सायली किचनमध्ये आली. ती थंडीने थरथर कापत होती.

“काय करतोय तू¿”

“जेवन बनवतोय. तू फ्रेश होऊन घे. कपाटात करीश्माचे दोन तिन कपडे असतील. त्यातला कोणताही एक घाल आणि टॉवेल बाथरूमध्ये किंवा सोफ्यावर असेलच.”

मी बोलत असताना सायली हसली.

“काय झालं हसायला¿”

तिने तो विषय टाळत विचारले.

“तू काय करायच्या तयारीत आहेस¿”

“मी रात्रीचं जेवन बनवतोय. वटाना आहे, बटाटा आहे आणि तांदुळ आहे.... काहीतरी बनवतो.”

“म्हणजे रात्रीचं जेवन तू बनवतोस का¿”

“नाही. एका दिवशी करीश्माने केलं होतं आणि बाकीच्या दिवशी आम्ही बाहेरूनच मागवलं.”

“तू कधी जेवन बनवलंय का¿”

“आठवत नाही... पण गेल्या दहा बारा दिवसांपासून तरी नाही बनवलं. हो पण त्या दिवशी करीश्माला बनवताना पाहिलं होतं.”

“मग राहूदे. मी चेंज करून येते आणि जेवायला बनवते.”

“तसं मला चहा कॉफी बनवता येते...”

मी बोलतंच राहिलो, पण सायलीने ते ऐकले नाही. सायली बाथरूममध्ये गेली आणि मी बाहेर सोफ्यावर जाऊन बसलो. सुरूवातीला एवढी थंडी लागत नव्हती पण नंतर जास्तच थंडी वाजू लागली. पावसातून भिजून आल्यावर मी डोकं सुध्दा पुसलं नव्हतं. बेडरूममध्ये जाऊन दुसऱ्या टॉवेलने डोकं पुसलं आणि सायली बाथरूममधून बाहेर येताच मीसुद्धा कपडे बदलून घेतले. मी लवकरच आजारी पडणार याची मला खात्री होती.

कपडे चेंज करून आल्यावर बेडरूममध्ये ठेवलेल्या लोखंडी पेटीकडं माझं लक्ष गेलं. सायली किचनमध्ये जेवण बनवण्यात गुंग होती. मी बेडरूममध्ये गेलो आणि ती पेटी उघडली. पेटीतले पत्र पाहिले. पत्रांना पाहिल्यावर मला त्यांना वाचण्याचा मोह आवरता आला नाही . म्हणून त्यातले एक पत्र बाहेर काढले. मी वाचायला सुरुवात करणार त्याआधी सायलीचा किचनमधून आवाज आला.

“आदि. मसाला कुठं ठेवलाय¿”

मी पत्राची घडी घालून, पत्राला खिशात ठेवले आणि किचनमध्ये गेलो.

******

जेवन झाल्यावर काही वेळ गप्पा मारल्या. रात्री अकराच्या सुमारास मी सायलीला बेडरूममध्ये झोपायची सोय करून दिली आणि स्वतः हॉलमधल्या सोफ्यावर आडवा झालो.

रात्रीचे साडे बारा वाजले तरी डोळ्यांवर झोप आली नव्हती. डोळे बंद करून झोपण्याचा खुप प्रयत्न केला. पण झोप आलीच नाही. बऱ्याच प्रयत्नानंतर झोप न लागल्याने मी उठून बसलो. बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज येत होता. खिशात काहीतरी असल्याप्रमाणे जाणवले. आपण खिशात पत्र ठेवले होते, ते आठवले. पत्र खिशातून बाहेर काढून त्याच्या घड्या उघडल्या. आणि पुन्हा एकदा पत्र वाचायला सुरुवात केली.

मी त्याही पत्रात माझ्या प्रेमाच्या भावना व्यक्त करत होतो. मी ते पत्र असं लिहिलं होतं जणू ते माझं पहिलं प्रेमपत्र असावं.

ते पत्र मी पुन्हा पुन्हा वाचत होतो. त्या पत्रातून मला वेगळाच आनंद मिळत होता. पाऊस काहीसा कमी झाल्यासारखा वाटला. मी पत्राची घडी करून, पुन्हा त्याला खिशात ठेवले आणि खिडकीजवळ आलो. काचेतून सर्व काही अस्पष्ट दिसत होतं. मी खिडकी उघडून बाहेर पाहिले. पावसांच्या थेंबांना पाहून मला पावसाप्रति आकर्षण निर्माण झाले. मी खिडकीची काच बंद करून दार उघडले आणि घरा बाहेर जाऊन उभा राहिलो. घराची छत जिथपर्यंत होती, तो भाग अजूनही ओला झालेला नव्हता. म्हणून मी भिंतीच्या आडोश्याला थांबून पावसाकडे पाहत होतो. पावसाच्या पाण्याचा अनुभव घेण्यासाठी मी हात पुढं केला. पावसाचे थेंब हातावर पडताच एक आंतरीक उर्जा मिळाल्याचे जाणवले. मी अधीकाधीक पावसाकडे आकर्षीत होत होतो. हळूहळू करून मी अंगणात काही अंतर चालून गेलो आणि पावसात उभा राहून भिजू लागलो. काही तासा पुर्वी मी स्वतःला भिजण्यापासून वाचवत होतो. पण त्याक्षणी मला अधीकाधीक भिजण्याची इच्छा होत होती. पाहता पाहता मी पावसाच्या पाण्याने ओला चिंब झालो. जेव्हा मला हे जाणवलं, तेव्हा मी आनंदाने पावसाच्या पाण्यात उड्या मारू लागलो.

“आदित्य¡”

सायलीचा आवज येताच मी मागे वळून पाहिले.

“तू बरा आहेस ना¿ म्हणजे तुला काही होत तर नाही ना¿”

मी माझे उड्या मारण्याचे कार्यक्रम थांबवले आणि पुन्हा घराच्या आडोश्याला येऊन म्हणालो.

“झोप येत नव्हती. त्यात पावसाचा आवाज... पावसात भिजण्याचा अनुभव कसा असतो ते समजून घेण्यासाठी मी पावसात भिजायला आलो.”

“पावसात भिजण्यापर्यंत ठिक होतं. तू तर उड्या मारत होतास¿ होणाऱ्या बायको सोबत भांडणं झालीत, तरी आनंदाने पावसात उड्या मारतोय. मला वाटत लवकरच तुझ्यावर वेड्यांच्या दवाखान्यात जाण्याची वेळ येणार आहे.”

तिच्या त्या वाक्यावर आम्ही दोघं हसू लागलो. मला आता थंडी वाजू लागली होती म्हणून आम्ही घरात आलो. कपडे बदलायला जाताना मी सायलीला विचारले.

“तू अजून झोपली का नाहीस¿”

“मलासुध्दा झोप येत नव्हती.”

मी बाथरूममध्ये पोहोचलो आणि तिथून मोठ्या ओरडत म्हणालो.

“तो बेड थोडा हालतो, त्यामुळे बरेचदा झोप लागत नाही. त्यासाठी बेड खाली चौकणी फरशी ठेवली आहे आणि ती फरशी बेडच्या उजव्या बाजूच्या पायाखाली ठेवायची होती. हे मी तुला सांगायचो विसरलो.”

“बेडमुळे नाही. मला अशीच झोप येत नाहीये.”

कपडे बदलून मी बाहेर आलो तेव्हा सायली बाहेरच्या खोलीत नव्हती. ती कुठं गेली हे पाहण्यासाठी मी बेडरूमच्या दिशेने जाताना ती किचनमध्ये काहीतरी करताना दिसली.

“सायली¿ मध्यरात्री काय बनवायचा विचार आहे¿”

“काय घेणार, चहा की कॉफी¿”

मी किचनच्या दारापर्यंत आलो आणि म्हणालो.

“चहा.”

“पण तू अजून सांगितलं नाहीस की आज तुला झोप का आली नाही¿”

“माझं हे नेहेमीचंच आहे. यात काही नवीन नाही. परवासुध्दा पुर्ण रात्र जागलो, त्या पैशाच्या नादात. पुर्ण रात्र आम्ही हाच विचार करत होतो की मी पैसे ठेवले कुठं असतील.”

“तू ज्या मानसाला पैसे दिले होते, त्याच्या मुलीच्या ऑपरेशनसाठी त्या मानसाला विचार पैशांबद्दल. त्याला सगळी हकीकत सांग आणि विचार की त्यांना इतर पैशांबद्दल काही माहित आहे का¿”

“पण त्यांना काय माहित असणार. त्यांना मी जेवढे पैसे दिले त्यांना तेवढ्याच पैशांबद्दल माहित असणार.”

“आता एवढे प्रयत्न केलं आहेसच, तर मग आणखी एक प्रयत्न करण्यात काय हरकत आहे¿”

“हं... प्रयत्न करायला काही हरकत तर नाही. पण त्यांना फोनवर विचारू शकत नाही. कारण त्यांच्या जवळ फोन नाहीये आणि त्यांच्या घरी जाण्यासाठी राहुल आणि त्याची गाडी लागेल आणि राहुलला रवीवार शिवाय सुट्टी नाही.”

“मग राहुलला फक्त त्याची गाडी माग आणि तू गाडी चालवत घेऊन जा किंवा मग एस्.टी.ने जा.”

“पहिली गोष्ट मला गाडी चालवता येत नाही आणि दुसरी गोष्ट ही, मी जर एस्.टी.ने गेलो तर एका दिवसासाठी मला तिथं राहवं लागेल.”

सायलीची चहा बनवून झाली होती. ती चहासाठी कप घेत म्हणाली.

“मग राहायचं एक दिवस तिथं.”

“नाही, नको... त्यापेक्षा माझ्याकडे एक सोप्पा मार्ग आहे. मी त्यांना पत्राद्वारे माझी संपुर्ण परिस्थिति सांगतो. त्यांना पैशांबद्दल काहीही माहित असेल तर ते मला माझ्या पत्राच्या प्रतिउत्तरात तसं लिहून पाठवतील.”

“पण एवढी महत्त्वाची गोष्ट आणि पत्राने विचारणं¿”

“आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो. पैशांबद्दल त्यांनीच मला सांगितलं. त्यांनी सांगितलं की मी त्यांना त्यांच्या मुलीच्या ऑपरेशनसाठी लाखो रुपये दिले आणि माझ्याकडे आणखी पैसेसुध्दा होते. पण उरलेले पैसे मी कोणाला दिले याबद्दल त्यांनी मला त्यावेळी काहीच सांगितलं नाही. त्यांना काही माहित असतं तर त्यांनी मला त्याच वेळी सांगितलं असतं.”

चहाचा कप देत सायलीने हसत विचारले.

“तुला एक विचारायचं होतं. तू सारखा पत्र का लिहितोस¿”

“मी सारखा कुठं लिहितो¿”

“पोलीसांना पत्र लिहून खुन झाल्याचे सांगितलं, कॉलेजच्या काळात रहस्यमयी प्रेमीकेला प्रेमपत्र लिहिला होतास, आणि आता त्या मानसाला पत्र लिहिणार आहेस.”

“माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये.”

“आपण १९९४ मध्ये जगत आहोत. आता फोनचा काळ आहे. सगळेजण संदेश पाठवण्यासाठी फोनचा वापर करतात.”

“हो, पण अजूनही शहर सोडलं तर इतर ठिकाणी फोनची सुवीधा नाहीये. तिथं पत्राची तरी सुविधा आहे की नाही याचीच शंका आहे.”

आम्ही दोघं बाहेरच्या खोलीत येऊन बसलो. सोफ्यावर बसलेली सायली चहा पित खिडकीकडे पाहत होती. कदाचित खिडकीच्या काचेवरती पडणारे पावसाचं पाणी तिलाही आकर्षीत करत असावं.

“सायली, कॉलेजच्या काळात तुझा कोणी प्रेमी वगैरे होता का¿”

“वगैरेचा काय अर्थ¿”

“म्हणजे बॉयफ्रेंड होता का¿”

“अं... हूं.”

तिने असं काही उत्तर दिलं की ज्याचा अर्थ मला समजला नाही. म्हणून मी तिला विचारले.

“हो की नाही.”

“होता एका.”

“होता म्हणजे. आता नाहीये का¿”

“असंच काही.”

“मग... तुझी ती लव्हस्टोरी सांग की मला.”

चहाचा कप रिकामा करून टि पॉटवर ठेवत ती म्हणाली .

“आदित्य... प्लीझ्, आता नको.”

“मग कधी. लग्न झाल्यानंतर सांगायला येणार आहेस का¿ तू मला त्या वेळी सांगितलीच असशील. मग आता सांगायला काय प्रॉब्लम आहे.”

“त्यावेळी माझी लव्हस्टोरी फक्त तुलाच माहित होती. कॉलेजमध्ये मी कोणालाही सांगितली नव्हती. पण ब्रेकअपनंतर आख्ख्या कॉलेजला आमच्याबद्दल कळालं.”

“पण सुरुवात कशी झाली, तो कोण होता, कुठंला होता आणि तुमचं ब्रेकअप झालं कसं¿ सांग की. डिटेलमध्ये नको सांगूस, शॉर्टमध्ये गोष्ट सांग.”

“होता एक मुलगा. आपल्या कॉलेजमधलाच होता. आमची ओळख कॉलेजमध्येच झाली आणि पुढच्या तिन चार भेटीतच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. आमच्यात काय आहे हे आम्ही कधीच कोणाला कळून दिलं नाही. चार वर्ष असंच चालत राहिलं. पण शेवटच्या वर्षात मी त्याला लग्नाबद्दल विचारलं. त्याने लग्नाचा कधी विचारच नव्हता केला. त्याने तर फक्त त्याच्या करीयरचा विचार केला. मी त्याच्यासमोर लग्नाचा विषय काढला म्हणून त्याने माझ्याशी बोलायचंच बंद केलं आणि एके दिवशी तो शहर सोडून निघून गेला. का गेला आणि कुठं गेला, त्याने कोणालाही सांगितलं नाही... माझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेला.”

काही वेळ आमच्यात शांतता राहिली. माझ्या मनात तिच्या शेवटच्या वाक्याबद्दल शंका होती. मी माझी शंका तिला विचारली.

“आयुष्यातून कायमचा गेला... म्हणजे¿”

“मला सोडून जाण्याआधीचं त्याचं शेवटचं वाक्य हे होतं की तो माझ्या आयुष्यात परत कधीच येणार नाही आणि खरंच तो परत कधीच माझ्या आयुष्यात आला नाही.”

“अं... त्यावेळी... तुझ्या दुःखात मी तुझ्या सोबत तर होतो ना¿”

“मी स्वतःच स्वतःला सावरलं. कॉलेज संपताच तू फोटोग्राफिच्या नादात कुठंतरी निघून गेलास आणि तिन वर्षांनंतर तू परत आलास, म्हणजेच गेल्या वर्षी. त्यातसुध्दा इथं आल्यावर मला भेटायला तू चार महिने लावलेस आणि जेव्हा भेटलास तेव्हा मी तुला सगळं सांगितलं.”

“म्हणजे इतक्या वर्षात त्याने तुला एकदाही भेटायचा प्रयत्न केला नाही किंवा काही तुझ्यासाठी संदेश पाठवला नाही का¿”

“भेटला होता, पण एखाद्या अनोळखी माणसाप्रमाणे. खरंच तो माझ्या आयुष्यात कधीच आला नाही आणि येणारही नाही.”

“आणि समज जर तो आता परत आला, तर¿”

“मी त्याच्या सोबत चार वर्ष घालवलेत. मी त्याला चांगलीच ओळखते. तो कधीच परत येणार नाही.”

“पण समज, जर त्याला परत तुझ्याजवळ येण्याची इच्छा असेल, पण त्याला तुझा पत्ता मिळत नसेल तर...”

“त्याला माझा पत्ता माहित आहे. पण त्याच्याजवळ पत्ता असून, त्याची इच्छा असतानाही तो मला भेटू शकला नाही, तर आमच्या नशिबात एकमेकांना भेटनं नव्हतंच कधी, असं समजायचं.”

“तू त्याचं नाव, पत्ता, काहीतरी सांगशिल तर मी त्याला....”

“काय रे, तुला माझं लग्न मोडायचं आहे का¿”

तिने हसत विचारले.

“तसं नाही. म्हणजे, आता ही स्थिती आहे की तुझं लग्न ठरलंय. त्याची सध्याची स्थिती काय आहे हे जाणून घेतलं असतं... म्हणजे तुझ्या मनात अजूनही कुठंतरी त्याची काळजी असेलच ना¿ म्हणून...”

“इतक्या वर्षांनी जेव्हा आमची चुकून भेट झाली. तेव्हा मी त्याला विचारलं होतं, मी तुझी वाट पाहायची का¿ तेव्हा तो म्हणाला होता की वाट पाहून मला काहीही मिळणार नाही.”

“पण एवढं सगळं झाल्यानंतरही जर तो परत आला तर¿”

प्रश्न ऐकून ती गालातल्या गालात हसली आणि म्हणाली.

“आला तर त्याच्या सोबत लग्न करणार.”

“आणि तुझ्या लग्नानंतर आला तर¿”

“तर मी पळून जाऊन त्याच्यासोबत लग्न करणार.”

सायली वाक्य संपल्याबरोबर हसू लागली.

“हे काय¿ लग्नानंतर जर तो आला आणि तू त्याच्यासोबत पळून गेलीस, तर तू ज्याच्यासोबत आता लग्न करणार आहेस, त्याचं काय होणार¿ त्याचा काय दोष¿ तुमच्या प्रेमाची शिक्षा त्याला का¿”

“आदित्य, कुल डाऊन. एवढा हायपर होऊ नकोस, मी मस्करी करत आहे. मी तुला सांगितलं ना की तो कधीच माझ्या आयुष्यात परतणार नाही आणि तुला काय वाटतं, लग्नानंतर मी काय त्याच्यासोबत पळून जाईन का¿”

ती पुन्हा एकदा हसली.

“काळानुसार माणुसही बदलतो. कदाचित तो सुध्दा बदलला असेल. म्हणून मी असे प्रश्न विचारले. बाकी मला तुझं लग्न मोडण्याची इच्छा नाहीये.”

“काहीही असो. पण त्याचं माझ्या आयुष्यात परतणं आणि माझं लग्न रमेश सोबत न होणं, या दोन्ही गोष्टी असंभ आहेत.”

“आता तू तुझ्या लव्ह स्टोरीतून बाहेर ये आणि मला सांग की माझं ब्रेकअप कसं झालं होतं, याबद्दल मी तुला काही सांगितलं होतं का¿”

“तुला मी किती वेळा सांगायचं, तुझी कोणी गर्लफ्रेंड होती हेच तू मला सांगितलं नव्हतंस. मग मला कसं माहित असणार की तुझं ब्रेकअप कसं झालं ते¿”

आम्ही असंच गप्पा मारत राहिलो आणि पहाट कधी झाली कळालंच नाही. पाऊसही थांबला होता. सकाळी पहिल्या बसने सायली तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली. शेवटी मला झोप आली आणि मी सकाळी ९ वाजता झोपलो.

*****