श्यामची आई
पांडुरंग सदाशिव साने
रात्र अठरावी
अळणी भाजी
राजा व राम नदीवर गेले होते. एका शिलाखंडावर दोघे बसले होते. राजा म्हणाला, "राम! मला येथून जावेसेच वाटत नाही. येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सारे पाहून किती आनंद होतो. परंतु सर्वांत मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा. श्यामच्या गोष्टीही ऐकावयास मिळतील. मला त्या फार आवडतात." राम म्हणाला, "त्यांना गोष्टी म्हणावे, का प्रवचने म्हणावी; व्याख्याने म्हणावी; का आठवणी म्हणाव्या, काही समजत नाही. ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते." राजा म्हणाला, "श्याम बोलतो, त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते. म्हणून सांगण्याला एक विशेषच माधुरी असते. म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो." "अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही. आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोक्ते आहेत. सगळाच रुपया शुद्ध चांदीचा असेल, तर बाजारात चालत नाही. त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावी लागते, तेव्हाच तो खण् वाजतो व व्यवहारात चालतो." राम म्हणाला. "माझ्या मनात एक विचार आहे. तुला सांगू? तू हसशील." राजाने विचारले. "सांग, मी हसणार नाही. कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधी हसत नाही." राम म्हणाला. "श्यामच्या या आठवणी प्रसिद्ध केल्या तर? मुलांना वाचायला आवडतील, बायकांना वाचायला आवडतील; आईबापांस त्या उपयोगी पडतील; श्यामच्या सांगण्यात कोकणातील संस्कृती भरलेली आहे. या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनच आहे. नाही?" राजाने विचारले. "परंतु श्यामला ते आवडणार नाही. त्याला आत्मविश्वास नाही. कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे? लोकांना भव्य, भडक पाहिजे. "त्यांना 'लैला-मजनू'च्या गोष्टी पाहिजेत." असे तो म्हणतो." राम म्हणाला. त्यांचे बोलणे चालले होते, तोच घंटा झाली. प्रार्थनेची घंटा. दोघे मित्र आश्रमात जावयास निघाले. श्याम राजाची वाट पाहात होता. राजा व राम दोघे येताना त्याला दिसले. "आज मला नाही रे हाक मारलीत? अगदी दोघेच गेलात?" श्यामने विचारले. "तू वाचीत होतास, म्हणून नाही बोलाविले. दिवसभर इतर काम असते, थोडा वेळ वाचीत होतास तर अडथळा करू नये, असे वाटले." राजा म्हणाला. "अरे, मला तरी कोठे फारसे वाचावयास आवडते? विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा, मनुष्यांची जीवने वाचावी, हृदये वाचावी, त्यातील सुखदुःखे जाणून घ्यावी, हेच खरे वाचन, नाही का?" श्याम म्हणाला. "श्याम, तू भरपूर वाचले आहेस, म्हणून असे म्हणतोस. सृष्टीचा ग्रंथ वाचावयास शिकावे लागते. शेतकऱ्याच्या आनंदाचे कवी वर्णन करतात; परंतु शेतकऱ्यास तो उपभोगता येत नाही. कारण त्याला ती दृष्टी नसते." राजा म्हणला.
इतक्यात दुसरी घंटा झाली. सारे प्रार्थनेला बसले. प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली: "मित्रांनो! प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते, ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही. कृती ही मुकेपणाने बोलते. शब्दांहूनही हे मुके परिणामकारक असते."
कसे जेवावे याचीसुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे. माझे वडील नेहमी सांगावयाचे, "आपल्या पानाकडे पाहून जेवावे. पानावर वस्तू असता मागू नये. येईल तेव्हा घ्यावे. पंक्तीत सर्वांना वाढायला आणतील, तेव्हा आपणांसही मिळेल. हावरेपणा करू नये. शीत पानाच्या खाली सांडू नये, पानात काही टाकू नये. पानातील पदार्थांवर टीका करू नये. पानात गुंतवळ किंवा काही सापडले, तर निमूटपणे काढावे. वाच्यता करू नये. दुसऱ्यास वर करून दाखवू नये. कारण दुसऱ्यांना किळस येते. विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे. पान कसे लख्ख करावे." या सांगण्याप्रमाणे वडील स्वतः वागत असत. मी अनेकांना जेवताना पाहिले आहे; परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ व निर्मळ दिसे, तसे मी कोठेही पाहिले नाही. त्या ताटात कोणी जेवले आहे की नाही, हे समजण्याचीही मारामार पडे. त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसावयाचा नाही. माझ्या पानाभोवती जर शिते दिसली, तर रागावत व म्हणत, "मथुरीचे एक कोंबडे जेवेल, इतकी शिते सांडली आहेस. कर गोळा सारी." "अमुक वाईट, हे असेच झाले, याला चव नाही." वगैरे ते कधी बोलत नसत. त्यांना सारेच गोड लागे. त्यांचा एक शब्द ठरलेला असे. "राजमान्य!" त्यांना कोणी विचारावे, "भाजी कशी झाली आहे?" त्यांचे उत्तर ठरलेले असे. "राजमान्य." जेवणाची कोणतीही खोडी त्यांना नव्हती.
एके दिवशीची गोष्ट माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे. रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळास गेले, म्हणजे आम्ही पाटपाने घ्यावयास लागत असू. भाताशिवाय सर्व वाढून तयार ठेवीत असू. "आई, भाऊ आले. भाऊ आले. भात उकर." वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थ आणीत, ते आम्ही घेतले, म्हणजे जेवणे सुरू होत.
त्या दिवशी आम्ही जेवावयास बसलो. आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती. माझ्या आईला कसलीही भाजी करावयास येत असे. भोपळीचा पाला, भेंडीचा कोवळा कोवळा पाला, सर्वांची ती भाजी करी. ती म्हणावयाची, "तिखट, मीठ व तेलाची फोडणी दिली, की सारे गोड लागते आणि खरेच गोड लागे. ती करी ते सारेच गोड लागे. जणू तिच्या हातात पाकदेवताच होती. केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी ओतून तो पदार्थ ती तयार करीत असे. माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयात ठेवलेलाच आहे.
परंतु त्या दिवशी मजा आली. भाजी झाली होती मुळी अळणी! भाजीत मीठ घालावयाला आई विसरली होती. कामाच्या भरात राहून गेले घालावयाचे. परंतु वडील बोलत ना, म्हणून आम्हीही कोणी बोललो नाही. वडिलांचा संयम मात्र दांडगा. जणू आस्वादव्रतच ते चालवीत होते. आईने भाजी वाढावयास आणली म्हणजे म्हणावयाचे, "काय फाकडो झाली आहे भाजी!" पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही. कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते, म्हणून आम्हीही थोडी थोडी खात होतो. आम्हीही मीठ मागितले नाही. आई मला म्हणाली, "तुला नाही का रे आवडली भाजी? खात नाहीस रोजच्यासारखी?" मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, "तो आता इंग्रजी शिकायला लागला ना, त्याला या पालेभाज्या कशा आवडतील?" मी म्हटले, "असे नाही काही. इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेन, तर शिकवूच नका मला. कशाला शिकवता?" वडील म्हणाले, "अरे, तुला राग यावा म्हणून म्हटले हो. तू जरा रागावलास म्हणजे बरे वाटते. याला फणसाची भाजी आवडते, होय ना ग? उद्या पाटीलवाडीहून आणीन हो. जून मिळाला तर उकडगरेच करा." आई म्हणाली, "आणावा. पुष्कळ दिवसांत फणसाची भाजी केली नाही." बोलणी अशी होत होत आमची जेवणे झाली. वडील ओटीवर गेले व विष्णुसहस्त्रनाम म्हणत शतपावली करू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर सूत कातीत बसले. खापराची चाती होती. प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे, असा दंडक होता.
पसारा आटोपून आई जेवावयास बसली. ती घास घेते व भाजी खाऊन बघते, तो भाजी अळणी! मीठ नाही मुळी तीत. मी जवळच होतो. आई म्हणाली, "काय, रे, श्याम! भाजीत मीठ मुळीच नाही. तुम्ही कोणी बोललेही नाहीत. श्याम, सांगावे की नाही रे! अळणी कशी रे भाजी खाल्लीत?" मी म्हटले, "भाऊ बोलले नाहीत, म्हणून आम्हीही बोललो नाही!"
आईला वाईट वाटले. "मिठाशिवाय भाजी खाल्लीत रे साऱ्यांनी." ती म्हणाली. तिला रुखरुख लागली. ती पुन्हा म्हणाली, "तरीच तू खाल्ली नाहीस. नाही तर बचकभर भाजी तूच खायचा, निम्मी तूच संपवायचा. तुला गुलामा, भाजी हवी पुष्कळ. माझ्या लक्षात तेव्हाच आले पाहिजे होते. परंतु आता काय बोलून?"
आपली मोठी चूक झाली, असे आईला वाटले. जी वस्तू दुसऱ्याला करून द्यावयाची, ती चांगली करून द्यावी. जो पदार्थ करून द्यावयाचा तो चांगला करून द्यावा. मग भाजी असो, की काही असो. आपण अळणी भाजी वाढली, हयगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही, हे बरे झाले नाही, असे आईला वाटले. तिला रुखरुख लागली.
बरे, आईला वाईट वाटू नये, म्हणून वडील बोलले नाहीत. इतक्या खटपटीने चुलीजवळ धुरात बसून स्वयंपाक केला, तो गोड करून खावा, त्यात दोष पाहू नये. स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये, ही वडिलांची दृष्टी.
मित्रांनो! दुसऱ्याचे मन दुखवू नये, म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजीही मिटक्या मारून खाणीरे माझे वडील श्रेष्ठ, का अळणी भाजी कशी हातून झाली, का, रे, तुम्ही कोणी सांगितले नाही, असे म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही, म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी, माझी आई श्रेष्ठ? दोघेही थोर व श्रेष्ठ. हिंदू संस्कृती, संयम व समाधान यांवर उभारलेली आहे; त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे. हे दोन्ही धडे माझे आईबाप मला देत होते.
***