आजूबाजूला
अरुण वि. देशपांडे
भरवस्तीत असलेला तो वाडा .आता जरी जीर्ण अवस्थेत दिसत असला तरी त्याच्या गत-वैभवाच्या खाणाखुणा त्याच्या आजूबाजूला दिसत असत, बुरूजा सारख्या त्याच्या भिंती ढासळत होत्या पण जुन्या जमान्यातले बांधकाम अजून तसे पक्के होते,जणू वाकेन पण मोडणार नाही .अशा ताठयात हा वाडा आहे..असे समोरून जाणारा येणारा म्हणत असे.
अनेक पिढ्यांना घडवणारा हा वाडा ..गेल्या शतकाचा साक्षीदार म्हणून आजूबाजूला परिचित होता ..
आजच्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून तात्यासाहेब परिवारासहित या वाड्यात वास्तव्यास होते .. त्यांचेच वय आता ऐंशीच्या आसपास होते ...वयपरत्वे होणारे आजार त्यांच्या मागे लागून काही वर्षे झाली होती .. त्यामुळे सगळे आर्थिक - व्यवहार, संपत्तीची देखभाल आणि पारिवारिक जबाबदारी अशा कार्यातून त्यांनी स्वतःला मुक्त करीत नव्या पिढीच्या हाती सर्व कारभार सोपवला होता .
तात्या त्यांच्या स्वभावामुळे, वृत्तीमुळे आजूबाजूच्या परिसरात सर्वांच्या आदरास प्राप्त झाले होते ..त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात ..आपल्या वाड-वडिलांच्या कीर्तीमध्ये भरच घातली, सचोटी, आणि माणसाची पारख, माणूस जोडण्याची कला ..या गुणांच्या बळावर तात्यासाहेबांनी माणसांचा गोतावळा आपल्या भोवती जमवला होता ..आजूबाजूच्या छोट्या मोठ्या गावात लोकोपयोगी कार्य सेवाभावी भावनेतून करण्याची सवय लोकांना लावली,
ज्याची जीभ गोड ..त्याला सारे जग गोड " याची प्रचीती तात्यासाहेबांच्या सहवासात आलेल्या माणसाला येत असे.
पैशाने सगळ्या गोष्टी खरेदी करता येत असतात, पण आत्मसन्मान असणारी माणसे पैशाने विकत घेता येत नसतात " तात्यासाहेब यातील मर्म ओळखून होते ..त्यामुळे आपल्या मोठेपणाचा, श्रीमंतीचा बडेजाव त्यांनी आयुष्यभर कधीच मिरवला नाही ..आणि आपल्या परिवारातील कुणी श्रीमंतीच्या तोऱ्यात वागणार नाही, त्याच्या वागण्यामुळे कुणी दुखावणार नाही, दुरावणार नाही याची काळजी तात्यासाहेब नेहमी घेत..
सुखात सगळेच सोबत असतात ..पण अडचणीच्या वेळी आधार देणारा खरा माणूस असतो ", असा माणूस आपण असावे " तात्या त्यांच्या मनातले हे विचार आपल्या सहवासातील प्रत्येकाला सांगत असत, गरजू माणसासाठी साठी तात्या म्हणजे आधार-वड झाले होते .
सामाजिक जीवनात -सार्वजनिक जीवनात जनता नेहमीच आदर्श व्यक्तीच्या शोधात असते, तात्यासाहेब या अपेक्षापूर्तीच्या कसोटीवर पूर्ण उतरत होते . नेक- नियत, निर्मल आणि स्वच्छ चारित्र्य ..असे गुण तरुण तात्यासाहेबांच्या काळात आजच्या इतके दुर्मिळ नव्हते .. त्या काळात सार्वजनिक सद्वर्तनाचे जे संस्कार त्यांच्या मनावर झाले ते त्यांच्या आचरणात कायम स्वरुपात लोकांना दिसत गेले
जुनी जाणती माणसे सांगत की ..ज्या घरी तोरण बांधले आहे..लगन-कार्य आहे.त्या ठिकाणी विना निमंत्रण जावे, मानपानाची अपेक्षा न ठेवता ..केवळ त्याला आधार देणारा,मदतीसाठी तत्पर असलेला एक माणूस आपला सहभाग असावा, अशावेळी खूप धीर देणारा असतो ..
आजच्या बदलत्या वातावरणात ..असे कुठेच दिसत नाही ..आपल्या आजूबाजूला एखादे लग्न-कार्य आहे, मोठा समारंभ आहे ..त्यात कुणाला सह्बागी करून न घेता "घरच्या घरी कार्य उरकून घेतले जाते ",
तात्यासाहेब असे काही घडतांना पाहून खूप नाराज होत ..माणसे इतकी बदलत जात आहेत ..का अशी वागत आहेत ही माणसे .असा प्रश्न त्यांना पडत होता.
दुसरा प्रसंग ..मरण -दारी "जाण्याचा ..अशा दुक्ख प्रसंगी सांत्वन करणे,धीर देणे, एकटेपणाची, पोरकेपणाची जाणीव न होऊ देणे ..या साठी धीर देणारी माणसे लागतात .. आज आजूबाजूला ..कुणी गेले " हे कळाले तर ..त्याला खांदा देणारे चार माणसे, नातेवाईक सुद्धा हजर नसतात ..शेवटी नगर-पालिकेच्या वाहनातून गेलेल्याव्यक्तीचा अंतिम प्रवास संपतो ..
सुखात नाही तर नाही निदान दुखाच्या प्रसंगी तरी माणसाने माणसाच्या मदतीला धावून यायचे असते " ही भावना आजूबाजूच्या माणसात शिल्लक नाहीये ..! याला काय म्हणावे ? जागच्या जागी पडून रहात तात्यासाहेब अधिकच व्यथित होत.
अलीकडे त्यांच्या मनाला निराशेच्या भावने ग्रासून टाकण्यास सुरुवात केली होती ..त्याला कारण होते ..त्यांच्या घरातील माणसांच्या वागण्यात -बोलण्यात खूप फरक पडला आहे याची त्यांना होऊ लागलेली जाणीव,
तात्यासाहेबांना वाड-वडिलांच्या कडून वारश्याने मिळालेले वैभव ..त्यांना जरी आयते मिळाले होते..त्यांनी काही काम न करता बसून खाल्ले असते तरी पुरेल इतके ते वैभव मोठे होते .. तात्यासाहेब या श्रीमंतीने कधी वाहवले नाहीत, लबाड आणि संधी-साधू लोकांना त्यांनी कायम दूर ठेवले ..आपल्या पैशाचा विनियोग जास्तीत जास्त लोक-कल्याणासाठी होईल या ध्येयाने सेवाभावी वृत्ती कायम ठेवली .. यामुळे तात्यासाहेब आजूबाजूला भलेही आदरणीय व्यक्ती,आदर्श व्यक्ती म्हणून जनतेत प्रिय झाले .. होते पण त्यांच्या या वागण्यामुळे
..घरातील काही माणसांसाठी, तसेच परिवारातील लबाड आणि लोभी नातेवाईकाच्या कायम रोषाचे कारण ठरत गेले, तात्यासाहेब आणि त्यांच्या शब्दांचा मान त्यांच्या नंतरच्या पिढीने थोडाफार तरी राखला, पण आताच्या पिढीने ..तात्यांच्या वागण्याला नावं ठेवण्यास सुरुवात केली,त्यांना विरोध करण्यास सुरुवात केली आजारी आणि दुर्बल झालेल्या तात्यासाहेबांचा पाणउतारा कसा करता येईल ..याचा विचार करण्यात या नव्या पिढीचा वेळ जाऊ लागला, आपल्या आजूबाजूला ..खूप वेगळे असे काही शिजते आहे ", जे आपल्या विरुध्द आहे ..हे तात्यासाहेब जाणून होते,
जणू ही सगळी असंतुष्ट मंडळी एकत्र येऊन ..इतक्या वर्षांचा बदला घेत होती ..ज्यांना तात्यासाहेबांनी कायम दूर ठेवले होते.
आपल्या तात्यांना वाड्यातील माणसे वाईट पद्धतीने वागवत आहेत ..याची कुणकुण आजूबाजूच्या लोकांना लागली होती, पण कुणी बोलनास धजत नव्हते ..कारण वाड्यात नव्याने दाखल झालेल्या माणसांची उपद्रव शक्ती फार मोठी .होती .त्यामुळे तात्यांना चांगले दिवस नाहीत " याबद्दल हळहळ व्यक्त करण्याशिवाय सामन्य लोकांच्या हातात काही नव्हते. मोठ्या घरातील माणसांच्या कारभारात लक्ष देणे आपल्या शक्तीच्या बाहेरचे आहे, याची जाणीव लोकांना होऊ लागली .
तात्यांनी केलेल्या कार्याची जाणीव लोकांना होती ..त्या भावनेतून लोकांच्या मनात तात्या विषयी आपलेपणाची भावना आहे " हे वाड्यातील लोकांना कळून चुकले होते ..त्यामुळे लोकांच्या नजरेत येईल असे काही करणे,तसे वागणे म्हणजे जन-क्षोभ निमंत्रण देण्या सारखे झाले असते ..त्यामुळे तात्यांना त्रास दिला जातो याबद्दल आजूबाजूला काही कळणार नाही याची काळजी वाड्यातील मंडळी गेऊ लागली.
आजारी पडलेल्या तात्यांना बरे होऊ न देता ..तसेच खितपत पडू द्याचे ..असे ठरवले असावे ..अशी वागणूक तात्यांना मिळते आहे.. ही बातमी आजूबाजूला कळत गेली
गावातील जाणती माणसे .अचानकपणे .एक दिवस वाड्यावर गेली ..घरातील लोकांना सांगितले ..आम्हाला आत्ताच्या आत्ता तात्यांना पहायचे आहे, बोलायचे आहे .आम्हाला त्यांची खोली दाखवा .. जास्त हुशारी करण्याचा प्रयत्न करायचा नाही ..असा दम दिल्यावर .. एकजण आलेल्या सर्वांना तात्या असलेल्या खोलीत घेऊन गेला ..
त्या काळोख्या खोलीत शिक्षा भोगीत असलेल्या कैद्य सारखे तात्या पडून होते .. बाहेरच्या जगातील शेकडो लोकांचे आधार असलेले तात्या इथे अंधारात निराधार होऊन जगत आहेत असे दिसून आले.
वाड्यातील लोकांच्या कडून ..तात्यांना मिळत असलेली वागणूक पाहून आलेले लोक संतप्त झाले, तात्यांना सोडून बाहेरगावी गेलेल्या त्यांच्या मुलांना लगेच कळवले ..आणि उद्याच्या उद्या तात्यांना इथून घेऊन जा असे सांगितले.
आपण ज्या लोकांसाठी कार्य केले त्यातील काहीजण आज आपल्यासाठी आले ..हे पाहून तात्यांना खूप बरे वाटले,
माणसे निष्टुर झालीत, उलट्या काळजाची झालीत हे आपण गेल्या काही दिवसापासून पहात आहोत,
पण, आज आपल्या साठी आलेल्या माणसांच्या वागणुकीतून जाणवले आहे की ..
किती ही वाईट घडो ..आजूबाजूला माणूस आणि माणुसकी अजून शिल्लक आहे.
***