श्यामची आई
पांडुरंग सदाशिव साने
रात्र पंधरावी
रघुपती राघव राजाराम
लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते. शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या, साधुसंतांच्या गोष्टी सांगायचा. मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते. लहानसे मखर केले होते. त्याला बेगड वगैरे लावून ते सजविले होते. सुंदर शाळिग्राम या देवळात मी ठेविला होता. तो शाळिग्राम फार तेजस्वी दिसत असे. चंद्रहासप्रमाणे तो शाळिग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा, असे मला वाटे.
रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू. कधी कधी आम्ही कथाकीर्तनही करत असू. आमच्याजवळ मृदंग वगैरे वाद्ये थोडीच होती! घरातील रिकामा डबा घेऊन आम्ही तोच जोरजोराने वाजवीत असू व भजन म्हणत असू. आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई.
विठोबाला वाहिली फुले भजन करिती लहान मुले विठोबाला वाहिली माळ भजन करिती लहान बाळ
वगैरे किती तरी भजने म्हणत आम्ही नाचत असू. भक्तिविजयातील निरनिराळ्या प्रसंगींचे धावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडून म्हणत असू.
गजेंद्राची ऐकून करुणा सत्वर पावलासी, जगज्जीवना प्रल्हादरक्षका मनमोहना पावे आता सत्वर द्रौपदीलज्जानिवारणा पांडवरक्षका, मधुसूदना गोपीजनमानसरंजना अनाथनाथा रुक्मिणीवरा भीमातीरवासी विहारा जगद्वंद्या जगदुध्दारा पावे आता सत्वर
वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येत आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गदित होते.
आम्ही त्या वेळेस फार मोठे नव्हतो. मराठी पाचवीत मी होतो. वय अकरा वर्षांचे होते नव्हते. परंतु भक्तिभावाने आजच्यापेक्षाही त्या वेळेस मी मोठा होतो. त्या वेळेस ना शंका, ना संशय. गोड श्रध्दाळू भावमय भक्ती. निर्जळी एकादशी मी करावयाचा. परमेश्वराचा जप करायचा, कार्तिकस्नान, माघस्नान, वैशाखस्नान वगैरे करावयाचा. कथासारामृत या पोथीत स्नानाचे महत्त्व आहे. स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली, तर अमृत होते, असे त्या पोथीत एके ठिकाणी आहे. एका राजपुत्राला कोणी ब्राम्हणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविले, अशी कथा दिली आहे. मला ते खरे वाटे. आमच्या गावात कोणीतरी मेले होते. मी आईला विचारले, "मी पहाटे अंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळीन. मग तो उठेल. नाही का?"
आई हसली व म्हणाली, "तू वेडा आहेस."त्या वेळची ती भोळी श्रध्दा चांगली, की आजचा संशय चांगला, मला काही सांगता येत नाही. परंतु जाऊ द्या. मी गोष्ट सांगणार आहे, ती निराळीच.
चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे. कोणी तरी शास्त्री येत व चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत. सायंकाळी चार, साडेचारच्या सुमारास पोथी सुरू होत असे. गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते. त्या वेळेस आजोळच्या घरी आम्ही राहात होतो. देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले, तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे. पुराणाला दहा-पाच पुरुष व दहा-वीस बायका बसत असत.
त्या दिवशी रविवार होता. देवळात पुराण सुरू झाले होते. आई पुराणास गेली होती. ती पुराणाला फार वेळ बसत नसे. थोडा वेळ बसून, देवदर्शन घेऊन ती परत येत असे. घरात कोणी नव्हते. आम्ही मुले जमलो होतो. भजन करण्याचे ठरले. घरातील रिकामे डबे आणले. टाळ घेतले व भजन सुरू झाले. आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो. तो डब्यांचा कर्कश आवाज आम्हांला गोड वाटला. लहानपणी सर्वच आवाजांत संगीत वाटते. मुलांना डबा बडविण्यात आनंद वाटतो. परंतु मोठ्या माणसांस ती कटकट होते!
"श्रीराम जयराम जयजयराम" असा घोष दुदुमून गेला. आम्ही मत्त झालो होतो. प्रभुसवे लढू आम्ही कुस्ती प्रेमाची चढली मज मस्ती रे प्रेमाची चढली मज मस्ती
आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्रीबोवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना. "काय शिंची कार्टी!"असे कोणी म्हणू लागले. "हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे-येथे पुराण चालले, समजू नये का?" "पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे? त्यांनी बंद नको का करायला!" "अहो, पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवितात." अशी भाषणे देवळात होऊ लागली. आमचे भजन जोरात चालूच होते. आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो.
देवळातील मंडळींनी गुरवाला बोलाविले व त्याला ते म्हणाले, "जा, रे, त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडाओरडा बंद कर. येथे पुराण चालले आहे." परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती. मंडळींचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते. ती वेगाने घरी येत होती. आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते.
आई आल्याचे आम्हांला भान देखील नव्हते. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो. शेवटी आई रागाने म्हणाली, "श्याम!" तिच्या त्या आवाजात क्रोध होता. मी चपापलो. भजन थांबले, टाळ व डब्यांचे मृदंग मुके झाले. आई रागावली होती. "काय झाले आई?" मी विचारले. "लाज नाही रे वाटत हा धुडगूस घालायला-" आई रागाने बोलली. "आई, हा काय धुडगूस? आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत. तूच ना हा शाळिग्राम मला दिलास? बघ, कसा दिसतो आहे! छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे. तू रागावलीस होय?" मी प्रेमाने पदर धरून विचारले. इतक्यात देवळातील भिकू गुरव आला व म्हणाला, "श्याम, देवळात पुराण चालले आहे. तुमचा धांगडधिंगा बंद करा. पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने." "आम्ही नाही बंद करणार जा. त्यांचे पुराण चालले आहे, तर आमचे भजन चालले आहे." माझा एक मित्र म्हणाला. "अरे श्याम, जरा हळू भजन करा. हे डबे कशाला वाजवायला हवेत? आणि ह्या झांजा? मोठ्याने ओरडले म्हणजेच देव मिळतो, असे नाही. आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल, तर ते रे कसले भजन?" आई शांतपणे म्हणाली. "साधुसंतसुध्दा टाळ वाजवीत व भजन करीत." मी म्हटले. "परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसत ते वाजवीत. इतरांना त्रास झाला असता, तर त्यांनी भजन थांबविले असते. श्याम, तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजविणे प्रिय आहे?" आईने विचारले. "वाजविले म्हणजे आई, रंग चढतो. नुसते नाव कंटाळा आणील." मी म्हणालो. "हळूहळू टाळ्या वाजवा. ताल धरा, म्हणजे झाले. मुद्दाम अडून बसू नये. वाजविणे ही महत्त्वाची गोष्ट नाही. तुम्हांला देवाच्या नावापेक्षा आरडाओरडा व वाजविणे हेच आवडते? श्याम, ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो, ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेच्या आड येऊ नये, माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केलेत, तर तुमचेही काम होईल व देवळात पुराण पण नीट चालेल. भिकू, जा तू. हे नाही हो गलका करणार." असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला.
आम्हां मुलांत वादविवाद सुरू झाला. "मोठे आले डुढ्ढाचार्य आम्हांला बंद करायला. त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावच्या कुटाळक्या करीत बसतात!" वगैरे आम्ही बोलू लागलो. परंतु काय करायचे, ते ठरेना. शेवटी मी म्हटले, "आपली चूक झाली. आपण हळूहळू भजन म्हणू या व नुसत्या टाळ्या वाजवू या. मोठ्याने वाजविण्यात काय आहे?" "श्याम! तू भित्रा आहेस. आपल्याला नाही हे आवडत." बापू म्हणाला. "यात भित्रेपणा कोठे आहे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे. अविचाराने वागण्यात का पराक्रम आहे?" मी विचारले. माझ्यावर रुसून माझे मित्र निघून गेले. त्यांना रामनामापेक्षा डबे बडविणे प्रिय होते. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर "रघुपती राघव राजाराम" करीत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले. त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहीन. लहानपणाप्रमाणेच आजही रडत रामराम म्हणत बसेन. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे : "तुला एकटेच जावे लागेल. जा, तू आपला कंदील घेऊन जा. लोकांच्या टीकेचा झंजावात सुटेल व तुझ्या हातातील दिवा विझेल. परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक. तुला एकट्यानेच जावे लागेल."
***