अंकुश
अमिता ऐ. साल्वी
रात्री सुजाताला कशानेतरी अचानक् जाग आली. कुठून तरी अगदी दबक्या आवाजात स्त्रीचा रडण्याचा आवाज ऐकू येत होता. या नवीन घरात आल्यापासून तिच्या कानावर हे रडणं अनेक वेळा आलं होतं. तिला लहानपणी ऐकलेल्या भुतांच्या गोष्टींमधील अरण्यात रडणाऱ्या स्त्रीचे आठवण झाली, आली अंगावर काटा आला. नाही ! नाही! या गजबजलेल्या मुंबईत असं काही असणे शक्य नाही. तिने स्वतःला समजावलं.
चार महिन्यांपूर्वीच ती आणि तिचे पती दिनकर या फ्लॅटमध्ये रहायला आली होती. दोघंही दिवसभर नोकरीला जात असल्यामुळे आजूबाजूला फारशी ओळख अजून झाली नव्हती. परिसरही विशेष परिचयाचा नव्हता. तिच्या पहिल्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीपलीकडे एक लहानसा रस्ता..अगदी पायवाटच ! आणि पलीकडे हाऊसिंग बोर्डाच्या खूप जुन्या चाळी! रस्त्याच्या कडेला गुलमोहराची ओळीने उभी असलेली झाडे. या झाडांच्या गर्द पाना- फुलांमधे पलीकडील चाळीतली घरे लपून गेलेली होती. हा रम्य परिसर तिला पाहताक्षणीच आवडला होता. पण हा रात्री रडू ऐकू येण्याचा प्रकार भीतीदायक होता. दुसऱ्या दिवशी रविवार होता. दोघांनाही रजा होती. दोघंही नोकरी करत असल्यामुळे एरव्ही निवांत चहा घेणं शक्य नसे. पण रविवारी दोघे गप्पागोष्टी करत एकत्र चहा घेत असत. सुजाता काही जास्त बोलत नाही हे पाहून दिनकरनी विचारले, " तुझी तब्येत बरी नाही का? चेहरा उतरलेला का दिसतोय? डोळेही लाल दिसतायत!"
त्यांना रात्रीच्या प्रकाराविषयी सांगितले, तर ते मस्करी करतील या भीतीने सुजाता त्यांना काही सांगत नव्हती. त्यांचा भुताखेतांवर विश्वास नाही हे तिला चांगलेच माहीत होते.
" हल्ली बऱ्याच वेळा तू अस्वस्थ दिसतेस. या नवीन घरात काही प्रॉब्लेम आहे का तुला?" दिनकरच्या स्वरात आता काळजी दिसत होती. त्यामुळे यांना खरा प्रकार सांगितलाच पाहिजे असा विचार करून सुजाता म्हणाली,
" इथे आल्यापासून रात्री मला बऱ्याच वेळा कुण्या बाईचा रडण्याचा आवाज ऐकू येतो आणि खूप भीती वाटते. एकदा का तो आवाज ऐकू आला की मला रात्रभर झोप लागत नाही! हा काही भुताखेतांच्या तर प्रकार नसेल ना? "
" असं काही नसतं सुजाता! तुला बहुतेक स्वप्न पडत असतील. नवीन जागा आहे नं ! मनात उगाच विकल्प येत असतील. मनातली भीती काढून टाक, आणि रात्री जाग आली तर मला उठवत जा. आपण एवढ्या रात्री रडणा-या भुताचा आपण शोध घेऊ!" दिनकर हसत हसत म्हणाले.
"यासाठीच यांना मला काही सांगायचं नव्हतं. प्रत्येक गोष्ट हसण्यावारी नेतात." मनातल्या मनात तणतणत सुजाता किचन मध्ये गेली. आणि आश्चर्य म्हणजे अचानक् मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. दोघंही आवाज कुठून येतोय हे पाहण्यासाठी बाल्कनीत जाऊन उभी राहिली. पण रस्त्यावर कोणी दिसत नव्हते. चाळींमधली घरं झाडांमधून दिसत नव्हती, पण आवाज तिकडूनच येत होता. थोड्या वेळाने सगळं शांत झालं. त्या चाळीत राहणाऱ्या पीटरचे इस्त्रीचे दुकान होते. दिनकर त्याच्याकडे इस्त्रीसाठी कपडे देत असे, त्यामुळे त्याच्याशी ओळख झाली होती. तो रस्त्याच्या कडेला त्याची रिक्षा स्वच्छ करत होता. त्याला दिनकरने विचारलं " आता रडत कोण होतं? तुमच्या चाळीच्या बाजूने आवाज येत होता."
" त्या आमच्या शेजारी दवे राहतात ना! त्यांच्या घरची ही रोजची कटकट आहे. फॅमिली मॅटरमध्ये कोणी कसं पडणार? " पीटर वैतागून बोलत होता.
" ती बाई रात्रीसुद्धा रडत असते का?" दिनकरना सुजाताच्या बोलण्याची आठवण झाली होती.
" तर काय! रात्री रात्री भांडणं चालतात. कधीकधी तर मारझोडही होते. आणि ती मुलगी रडत बसते. आम्हाला हा रोजचा त्रास आहे." पीटर सांगू लागला. " ही कांता त्यांच्या मुलाची दुसरी बायको! पहिली बायको अशीच झुरून झुरून गेली. आता ही त्यांच्या हातात मिळालीय. दिवसभर काम करून घेतात, आणि पुरेसे जेवणही देत नाहीत. हुंड्यावरून सतत टोमणे मारत असतात. तिने जरा उत्तर दिलं की हात उगारतात. काय त्या मुलीच्या नशिबात आहे, कळत नाही. आई-वडील दूर गावाला आहेत. मध्ये एकदा इथे आले होते. त्यांना रिक्षाने मीच स्टेशनला घेऊन गेलो होतो. त्यावेळी त्यांना हिला होणारा त्रास सांगण्याचा मी प्रयत्न केला. पण त्यांनी लक्ष दिले नाही. आई तर म्हणाली, "मुलगी दिली तिथे मेली! आम्ही यात काही करू शकत नाही. इथे आमच्याच घरात हाता-तोंडाची मिळवणी कशीबशी होतेय. ती आणि तिचं नशीब! दुसरं काय? " ...जर आई वडील इतके बेफिकीर आहेत, तर इतर कोणी काय करू शकणार?"
" आज काय झालं?" दिनकरने कुतुहलाने विचारले.
" आज तर तिला घराबाहेर काढलं! दरवाजातून बाहेर ढकलून दिलं. पायऱ्यांवरून धडपडून पडली. बरंच लागलं असणार तिला! जेव्हा ती रडू लागली आणि माणसं जमू लागली, तेव्हा तिला आता घरात घेऊन गेले आहेत. या गोष्टी जरी डोळ्यासमोर घडल्या तरी कोणी मधे पडत नाही. याच गोष्टीचा फायदा हे लोक घेतात."
एवढं कळल्यावर गप्प बसणाऱ्यांपैकी दिनकर नव्हते. त्यांनी दवेंच्या घराचा नंबर विचारून घेतला. दीपक नवलकर हे त्या विभागातील सामाजिक कार्यकर्ते सोसायटीच्या कामांमुळे त्यांच्या परिचयाचे झाले होते. त्यांना त्यांनी फोन लावला. "साहेब एक घरगुती हिंसाचाराची केस आहे. काही करता येईल का?"
" F I R करावा लागेल. कोणी तुमच्या नात्यातलं आहे का?"
" मी ती मुलगी---कांता- तिचं नावही मला आताच कळलं--किंवा तिच्या घरच्या लोकांना - दवे कुटुंबाला -ओळखत नाही, कधी त्यांना पाहिलंही नाही." दिनकर म्हणाले. सकाळचा सर्व प्रसंग त्यांनी नवलकरना सांगितला." अशा केसेसमध्ये ब-याच वेळा व्हिक्टिम आयत्या वेळी कच खातात . स्वतःला कितीही त्रास झाला तरी आपल्या नव-याला किंवा घरातल्या इतर माणसांना त्रास व्हावा असे त्यांना वाटत नाही. शिवाय ज्या घरात आयुष्य काढायचे तिथल्या माणसांशी दुष्मनी घ्यायला त्या घाबरतात आणि या सगळ्यामध्ये त्यांच्या वतीने तक्रार करणारा माणूस अडचणीत येतो... दुसरा काही उपाय नाही का?" दिनकरने प्रांजळपणे सत्यस्थिती सांगितली.
"ठीक आहे. इथले इन्सपेक्टर माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्याशी बोलून बघतो." नवलकरसाहेबांनी आश्वासन दिले. त्यांना दवेंच्या घरचा पत्ता सांगून दिनकरने फोन ठेवला. नवलकरसाहेबांनी जरी आश्वासन दिले तरी ते ही गोष्ट फार गंभीरपणे घेतील असे दिनकरना वाटत नव्हते.
दुसऱ्या दिवशीपासून ऑफिस चालू झाले सकाळपासून रात्रीपर्यंत रोजच्या रहाटगाडग्यात ते इतके व्यस्त होते रविवारची घटना ते विसरून गेले. मधे एकदा सुजाता त्यांना म्हणाली, "हल्ली मला रात्री जाग येत नाही. बहुतेक दवेंनी कांताला माहेरी पाठवलंय किंवा त्यांच्या समझोता झालाय. तिला माहेरी पाठवलं असलं बरं झालं म्हणायचं, यांच्या जाचातून ती सुटेल. "
त्यानंतरच्या रविवारी संध्याकाळी ते इस्त्रीचे कपडे घेण्यासाठी पीटरच्या दुकानात गेले होते. पीटर तिथेच उभा होता. तिथे काम करणा-या माणसाला काही सूचना देत होता. एकदा एखादी गोष्ट हाती घेतली, की अर्धवट न सोडण्याच्या दिनकरच्या स्वभावाने उचल खाल्ली. " तुझ्या शेजारच्या सासू- सुनेमध्ये समझोता झाला असे दिसते. गेल्या आठवड्यात भांडणाचा आणि रडण्याचा आवाज आला नाही. " त्याने सहज स्वरात हसत - हसत पीटरला विचारले.
पीटरसुद्धा हसला आणि उत्साहाने सांगू लागला, " आपलं बोलणं झालं, त्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांची गाडी त्यांच्या घरासमोर उभी राहिली. पोलिसांना बघूनच तो-यात वागणारी कांताची सासू आणि सासरे गर्भगळीत झाले. इन्स्पेक्टरनी तीक्ष्ण नजर त्यांच्याकडे रोखत बोलायला सुरुवात केली,
"तुमच्या घरात सुनेला मारहाण होते अशी आजूबाजूच्या लोकांनी तक्रार केली आहे. तुमच्याकडच्या भांडणाचा त्यांना फार त्रास होत आहे. त्या चौकशीसाठी आम्ही आलो आहोत."
" मग घरातील लोक घाबरुनच गेले असतील." दिनकर कुतूहलाने म्हणाले.
" हो. ती दोघं नवरा-बायको गयावया करू लागली. 'आम्ही प्रतिष्ठित लोक आहोत. आणि सुनेला तर आम्ही खूप प्रेमाने वागवतो. तिला काही कमी पडू देत नाही.' असा कांगावा करू लागली. कांता समोरच होती. आदल्या दिवशी सासूने पायऱ्यांवरून ढकलल्यामुळे तिचा पाय सुजला होता. ते बघून इन्स्पेक्टर म्हणाले, " तुम्ही तिला किती प्रेमाने वागवता, हे तिच्याकडे बघूनच कळतंय. चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यायचंय का तुम्हाला सगळ्यांना?"
" यावर त्यांनी डोळ्यात पाणी आणलं आणि नकारर्थी मान हलवत हात जोडले." पीटर उत्साहाने सांगत होता. "इन्स्पेक्टर पुढे म्हणाले, लक्षात ठेवा यापुढे जरी चुकून खरोखरीचा अपघात झाला किंवा तिला दुखापत झाली, तरी पहिला संशय तुमच्यावर जाईल. आणि तुम्हाला फार त्रास होईल. तेव्हा यापुढे सुनेला जपा. अन्यथा परिणामांना सामोरे जा. ही माझी शेवटची वॉर्निंग समजा."
" वा! इन्स्पेक्टर साहेबानी फार चांगलं काम केलं. " दिनकर म्हणाले.
" होय साहेब! पण यानंतर फार ताणून न धरता कधीही गरज पडली तर निःसंकोच मदत माग असे आश्वासन कांताला देऊन ते निघाले. आता घरात सगळे कांताला फुलासारखं जपतात. तिची काळजी घेतात; नाइलाजास्तव का होईना, तिला घरात सन्मानाने वागवतात. कामाला बाई ठेवली आहे. ज्या कुणी यांची तक्रार केली, त्याला कांताच्या दुवा मिळतील."
त्याच्याशी बोलण्यात जास्त वेळ न घालवता दिनकर घरी आले. त्यांनी नवलकरना फोन लावला. " साहेब त्या इन्स्पेक्टरनी खूप चांगलं काम केलं. दवे कुटुंबीयांना अशी काही तंबी दिली की कांतावर होणारे सर्व अत्याचार थांबले. एका मुलीचं आयुष्य त्यांच्यामुळे सुखी झालं. तुमचे दोघांचे खूप खूप आभार."
" खरं म्हणजे लेखी तक्रारी शिवाय पोलीस काही करू शकत नाहीत. पण इन्सपेक्टर 'विश्वास' स्वतःच्या जबाबदारीवर कारवाई करण्यासाठी गेले हा त्यांचा मोठेपणा आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व असं आहे की त्यांना बघूनच गुन्हेगार थरथर कापू लागतात! ही तर मध्यमवर्गीय माणसं!" नवलकर बोलत होते.
" त्यांना आणि तुम्हाला ----दोघांनाही तुमच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. " दिनकरनी फोन ठेवला. पण त्यांच्या मनात विचार येत होते; ही मुलगी रडत होती म्हणून तिचे दुःख आजूबाजूच्या लोकांना कळलं तरी! तिला मदतही करता आली पण अशा कित्येक सुना आणि काही ठिकाणी घरातली वृद्ध माणसे कोणालाही कळू न देता आसवे ढाळत असतात. दुर्बलाच्या असहायतेचा फायदा कुठे सुन, तर कुठे सासू घेत असते. वरकरणी सर्व आलबेल दिसते, पण गृहकलहाच्या ह्या वाळवीने समाज पोखरला गेला आहे; बाहेरून सुसंस्कृत दिसणा-या माणसांकडून होणारे अत्याचार नियंत्रणात येणं कधी शक्य होईल का? जेव्हा सरकारने केलेले कायदे फक्त कायद्याच्या पुस्तकात न राहता, त्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल- स्वतःच्या हक्कांची जाणीव पीडितांना होईल ; तेव्हाच या गुन्ह्यांवर अंकुश ठेवणे शक्य होईल.
***