Me Bidhadalo in Marathi Comedy stories by Arun V Deshpande books and stories PDF | मी बिघडलो ..त्याची गोष्ट ..! (विनोदी कथा )

Featured Books
Categories
Share

मी बिघडलो ..त्याची गोष्ट ..! (विनोदी कथा )

मी बिघडलो ..त्याची गोष्ट ..!

(विनोदी कथा )

अरुण वि.देशपांडे

कच्च्या मातीच्या गोळ्यातून सुबक आणि सुरेख मूर्ती आकारास आणणाऱ्या कसबी कारागिराची कलाकारी सारे जग वाखाणत असते ,जो घडवतो "त्याचे कसब तुम्हाला -आम्हाला माहितीचे असते , पण " जे बिघडवतात - त्यांच्या हुशारीचे काय सांगावे ".

आज मी तुमचा परिचय करून देणार आहे तो कुशल, चतुर आणि बेरकी अशा व्यवहार -गुणसंपन्न असणाऱ्या कांही मान्यवरांचा , ज्यांचा मला (बि)-घडवण्यात सिंहाचा वाटा आहे. याचाच एक गर्भित अर्थ असाही आहे, "तो म्हणजे ,मी एक साधा-सुधा, गरीब आणि अतिशय पापभिरू ,आणि निरुपद्रवी असा "इसम" असल्याची या सर्वांची खात्री असल्यामुळे , यांच्याकडून वेळोवेळी "बळीचा बकरा " होण्याची नामुष्की माझ्यावर ओढवत असते . तुमची स्थिती नक्कीच माझ्या सारखी "दुर्दैवी " परिस्थिती नसावी अशी मी नम्र इच्छा व्यक्त करतो.

"भित्यापाठी ब्रह्म -राक्षस" या म्हणीचा प्रत्यय म्हणा किंवा याचा अर्थपूर्ण असा झटका मला वेळोवेळी बसत असल्यामुळे मी तसा "धक्के पचवू शकणारा .मजबूत कलिजा लाभलेला एक "भित्रा माणूस झालो हेच खरे सत्य आहे . .या परिस्थितीला मी सोडून, इतर सगळे , म्हणजे कोण कोण जबाबदार आहेत ? हेच तर अगदी मनमोकळे करून मला सांगायचे आहे तुम्हाला ,असे केल्याशिवाय माझे शीळेसारखे जड झालेले मन ", हलके कसे हो होणार.

आपल्याला घडवणारी माणसे " ही नेहमी आपल्या भवताली असतात ",अगदी तसेच .आपल्याला - "बिघडवनारी -मंडळी" देखील कायम घेराव घालून असतात आणि त्यांना संधी मिळताच .त्यांचा डाव ते अगदी सफाईदारपणे साधित असतात .

यात पहिला नंबर आहे - आमच्या सासरेबुवांचा - त्यांनी त्यांच्या "अति-दूरदृष्टीने -माझ्यासारखा अत्यंत लायक इसम त्यांच्या (अव)-गुणी सुकान्येसाठी मुक्रर केला तो खण आणि तो -दिवस , माझ्या -एकट्यासाठी .कमालीचा दुर्दैवी ठरला असला तरी सासरेबुवा आणि परिवारासाठी तो अत्यंत "भाग्याचा दिन ठरला ".

त्यावेळच्या - माझ्या भावी-वधूचे स्थळ "दर्शनीय अर्थाने -तसे "अवजड -श्रेणीतले होते ",,त्यात भरीस भर म्हणजे आणखी एक सदगुण या सु-कन्येत होता (जो नंतर समजून-उमजला )..तो गुण म्हणजे - "

शाळेचे आणि आमच्या होणाऱ्या बायकोचे अजिबातच न पटल्यामुळे , शेवटी बायकोने "बाणेदारपणा दाखवत -प्रतिज्ञा केली- की - या चार भिंतीच्या शाळेत काय शिकायचे मी ?, त्यापेक्षा -जगाच्या विशाल शाळेत शिकेन आणि ज्ञानाची कोठारे खुली करून दाखवीन "..!पण, यापुढे काद्धीच कोणत्याच शाळेत जाणार नाही ",

मित्रांनो -ही प्रतिज्ञा हवेत केंव्हाच विरून गेलीय, यावरून तिच्या अगाध-ज्ञान "पातळी बद्दल तुम्ही अंदाज बंधू शकाल.

सामन्य माणसांच्या प्रतिज्ञा आणि त्यांचे संकल्प या दोन्हींचे पुढे काय होत असते ", हे तुम्हाला माहितीच आहे , तसेच झाले ..कारण ."माझी बायको झाल्यावर "- या बाईंनी जगाला वार्यावर सोडून दिले ",आणि सगळे लक्ष -मला -कसे (बी)-घडवता येईल याकडे दिले ", हे पाहून आजूबाजूच्या लोकांनी सुटकेचे नि:स्वस सोडले..आणि माझा श्वास मात्र कायमचा घशात अडकला , पण, आता हे सांगायची सोय नाही मित्रांनो.

"गृह-प्रवेशाच्या क्षणी" उंबरठ्यावर ठेविलेल्या मापाला - ओलांडून -हलकेच स्पर्श करून आत येणे " किती रम्य कल्पना आणि हळुवार क्षण असतो हा , पण, इतका सरळ आणि सुलभ मार्ग आमच्या नूतन -गृहलक्ष्मीच्या "लक्षातच आला नव्हता . .परिणामी ते भरलेले माप .. त्यांच्या मजबूत -दणकट -पद -स्पर्शाने सुसाट वेगाने समोरच्या भिंतीवर आदळून .त्याच परतीच्या वेगाने बाहेरच्या कंपाउंड -वोल वर जाऊन विसावले .. विजेच्या वेगास लाजवणारा तो वेग पाहून आमच्या सर्वांचे डोळे दिपून गेले .." असे मत नंतर उपिस्थित पैकी अनेकांनी (दबक्या आवाजात ) व्यक्त केले होते .हे अजून माझ्या चांगलेच लक्षात आहे.

"आगे आगे देखो- होता है क्या ..! " अशीच झलक गृह-प्रवेशाच्या दिवशी दिसली होती , सबब ,"जीव मिठीत नव्हे", तर , मुठीत धरून राहा रे बाबा !", असा सल्ला ,मला माझ्या आतल्या-आवाजाने "लगेच दिला ,जणू "पुढील आयुष्याचे संकेत दिले "..त्यादिवसापासून .."आपणच आपले सच्चे मित्र" या सुविचारावर माझी बसलेली गाढ श्रद्धा "आजतागायत जशीच्या तशी आहे ."

लग्न झाल्या पासून मी एकवचनी नवरा झालो आहे ", म्हणजे बायकोने सांगितलेली प्रत्येक गोष्ट , सोडलेली प्रत्येक ओर्डेर, केलेली प्रत्येक सूचना , एक क्षण विलंब न करता .तिचे एकेक वचन पूर्ण करतो आहे ..त्यामुळे बायकोच्या वचनात रहाणारा पतीदेव "असा लौकिक मी प्राप्त केलाय . अगदी याच सुत्रा-प्रमाणे वागून मी "एक व्रती नवरा झालो आहे ", त्याचे विश्लेषण असे आहे बघा -

"आजन्म बायकोचे (च) ,ऐकणार आणि तसेच वागणार हे एक (अति )अवघड व्रत स्वीकारून मी एक आदर्श ( ?) निर्माण करून ठेवला आहे..असे करून "आजकाल आदर्श ठेवावे असे कुणी नजरे समोरच नाहीये ", या प्रश्नाचे उत्तर देण्याचा , माझ्या परीने मी नक्कीच छोटासा का होईना प्रयत्न केला आहे .

"वेळ सार्थकी कसा लावायचा ?",हा प्रश्न मला कधीच पडणार नाही " याची सुद्धा बायको काळजी घेत असते , मला विचाराल तर मी याचे गुपित सांगेन..की - घड्याळाच्या काट्यांची शिस्त माझ्यात पूर्ण भिनलेली आहे, वेळेवर -, वेळेप्रमाणे ",फक्त बायकोच्या मनाप्रमाणे वागणे " एवढेची मजला ठावे.

माझा हा बदलता स्वभाव पाहून .माझ्या घरच्या लोकांना मात्र मुळीच आनंद होत नाहीये ..त्यामुळे ते कायम मला ..घरचा आहेर देतच असतात ..त्यातला हा एक आहेर बघा ..

"बैलोबा झालाय नुसता ,बायको समोर कशी मान डोलत असते नंदीबैलाची "..!

इतके होऊन ही ..माझ्या नम्र वागण्यात काहीही फरक पडत नाही हे पाहून .अनुक्रमे ..बायको, सासूबाई ,माननीय सासरेबुवा ,आणि माझे बिलंदर -कलंदर मेहुणेसाहेब ..यांचा आनंद शतगुणित होत असतो.

माझे "पालक -मंत्री " म्हणवून घेण्यात धन्यता मानणारे माझे आदरणीय श्वसुर -प.पु. बापूसाहेब ,हे आल्यागेल्या समोर माझ्या वागण्या बद्दल आणि ,स्वभावा बद्दल कौतुक भरल्या शब्दात सांगत असतात ..

जावाई असाव -आमच्या दिनकररवा सारखा -.

आणि खुद्द बायको म्हणते - शब्द झेलावा कसा ? दिनू कडून शिकावे सगळ्यांनी ,

सासुबाईंचे भावपूर्ण उद्गार ऐका - " केवळ पूर्वपुण्याईने (? ) असा नक्षत्र -जावाई मिळाला आम्हाला ".

प्रत्यक्ष माझ्या परिवारात "जोरू का गुलाम " अशी माझी स्वच्छ आणि स्पष्ट अशी प्रतिमा निर्माण करण्यात मी यशस्वी झालो होतो .माझे आई-बाबा , विरुध्द माझ्या बायकोचे लाडके "आई-पप्पा ", या सर्वांचे स्नेह-सम्मेलन होते त्यावेळी "अधिवेशन "आठवते बाकी काही नाही .

"नवर्याला शिस्त लावणे "- हा प्रत्येक बायकोचा आवडता अभ्यासक्रम असतो. "कधी एकदा नवर्याला वेठीस धरते -आणि कामं करून घेते "अशी अधीर अवस्था बायकोची झालेली असते . या "शिस्त -लावणे -नामक संस्कार -शिबिरात प्रमुख मार्गदर्शक आणि तज्ञ -परीक्षक म्हणून अशा दोन्ही जबाबदारी सांभाळन्या साठी माननीय -सासूबाई ,पूर्णवेळ हजर राहून कन्येच्या कर्तुत्वाला बळ देण्याचे कार्य करतात .

स्व-इच्छेने "-निवृत्ती घेऊन आमच्या सासरेबुवांनी त्यांच्या कार्यालयाला आणि त्यांच्या तमाम मित्रांना खूप मोठा दिलासा दिला होता ही खरी गोष्ट आहे.पण, दुसऱ्या दिवसा पासून माझ्या "छळ-पर्वास " आरंभ झाला . परिणामी केवळ माझा सूड घेण्यासाठी तुझ्या पप्पांनी ही निवृत्ती घेतली : असे एकदा मी मोठ्या हिम्मतीने बायको जवळ बोलून दाखवले .

नोकरी करून पगाराच्या रूपाने " जो काही पैसा मी घरात आणीत असतो , त्या पैस्याचा सुखद सहवास मला फक्त .ऑफिस ते घर "हे अंतर चाले पर्यंत लाभत असतो . घरात प्रवेश करता क्षणी "माझ्या खिश्यावर डल्ला मारून माझा पगार " स्वतःच्या ताब्यात घेऊन , उर्वरित एकोणतीस दिवसा मला अनुदान -रक्कम मंजूर करीत असते .अशा प्रतिकूल परीस्थितित जीवनक्रम चालू ठेवतांना सगळीकडून माझी क्रमवारी घसरत जाते ..त्यामुळे आजकाल तर सगळ्या लिस्ट मध्ये माझा नंबर खालून पहिला येत असतो ".

माझी अवस्था (अधिक ) -दयनीय करून टाकणाऱ्या मंडळीत माझ्या फुटीरवादी -मित्र गटांचा फार मोठा वाटा आहे.त्यांची कार्य-पद्धती म्हणजे- नवर्याचा शक्य तो आणि जास्तीत जास्त पाणउतारा -त्याच्या बायको समोर करायचा .आणि या वाहिनी नामक प्रेमळ गृहिणीचा सन्मान करून ,तिने दिलेला फराळ खात खात भाबड्या गरीब नवर्याची अवस्था "घर का न घाट का " करून टाकण्यात अघोरी आनंद मिळवणे. की झाले यांचे काम.

अशी जीवापाड प्रेम करणारी मित्र मंडळी मला मिळाली " .माझे नशीब (?) , पण, हे नमुने तुमच्या राशीला येऊ नयेत अशी प्रार्थना मनातल्या मनात नेहमी करीत असतो.

..

नवरा नावाच्या आज्ञाधारी व्यक्तीने नि:शब्द होऊन, निर्विकार चेहेर्याने बायकोचा प्रत्येक शब्द ऐकून घेत त्या बरहुकूम आचरण करावे " हे प्रत्येक पत्नीचे "दिवा -स्वप्न " असते . ही स्वप्ने खरी होण्यासाठी "पहाटेची वेळच असावी लागते" असा नियम नसतो , त्यामुळे माझ्या सारख्या नवर्यांची फार मोठी गैरसोय होऊन गेलेली आहे.कारण चोवीस तास माझी बायको एकच विचार करीत असते .."या नवर्याला अधिक (बि )-घडवायचे कसे ?

***