Shapit Camera - 2 in Marathi Drama by Niranjan Pranesh Kulkarni books and stories PDF | शापित कॅमेरा

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

शापित कॅमेरा

शापित कॅमेरा

भाग दोन

निखिलने त्याच्या वडिलांना सांगितलं, "बाबा मी उद्या सकाळी मेणवलीला जायला निघणार आहे. तिथं चार-पाच दिवस राहुन तिथल्या जंगलात राहणाऱ्या अघोरी साधूंचे फोटॊ काढणार आहे."

ते निखिलला म्हणाले, "तुझ्या आईची हरकत नसेल तर मी तुला अडवणार नाही."

निखिलची आई त्याला जाऊ देणार नाही हे निखिलला आणि त्याच्या वडिलांना चांगलंच माहित होतं. तरीपण निखिलने आईला सांगितलं, "आई मी उद्या मेणवलीला चाललोय. तिथं कांही दिवस राहून परत येईन. मला माहित आहे कि तुला आणि बाबांना माझी काळजी वाटतीये. पण खरंच काळजी करू नकोस. मला काहीही होणार नाही. मला अडवू नकोस." आई निखिलला म्हणाली, "बाळा आम्ही आधिच तुझ्या दादाला गमावलं आहे. आता तूच आमच्यासाठी सर्वकाही आहेस. तुझ्या पाया पडते पण जाऊ नकोस." निखिलच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं. निखिल न बोलताच निघून गेला.

सकाळी उठल्यावर निखिलचे वडिल निखिलला उठवायला त्याच्या खोलित गेले, पण निखिल तिथे नव्हता. रोज नऊ वाजता उठणारा मुलगा आज लवकर कसा उठला? हा प्रश्न त्यांना पडला. ते हॉल मध्ये आले. तिथे त्यांना TV च्या स्क्रीनवर एक चिट्ठी लावलेली दिसली.

त्यावर लिहिलं होतं -

मी मेणवलीला जात आहे. खरंच माझी काळजी करु नका. हे प्रोजेक्ट माझ्यासाठी खुप महत्वाचं आहे. मी चार-पाच दिवसात परत येईन. कदाचित माझा फोनही लागणार नाही, मीच तुम्हाला फोन करत जाईन.

तुमचा लाडका

निखिल

निखिल साताऱ्याच्या एस. टी. स्टॅन्डवर पोहोचला. निखिलने प्रणिताला फोन लावला आणि त्याचा प्लॅन तिला सांगितला. प्रणितालाही काळजी वाटत होति. पण आपली काळजी व्यक्त करण्याशिवाय ती काहिच करू शकत नव्हती. रोज फोन करण्याचे आश्वासन देऊन निखिलने फोन ठेवला.

साताऱ्यात नाष्टा करुन निखिल मेणवलीच्या बसमध्ये चढला. मेणवलीच्या एस. टी. स्टॅण्डवर पाटील साहेब स्वतः निखिलची वाट पाहत उभे होते. गळ्यात हार घालून पाटलांनी निखिलचं स्वागत केलं. निखिलनेही नमस्कार करुन त्यांचं स्वागत स्वीकारलं.

दोन्ही बाजूनी पिळलेल्या भरगोस मिश्या, पांढऱ्या शुभ्र रंगाचा सदरा - पायजमा, तालमीत कमावलेलं बळकट शरीर, डाव्या हाताच्या बोटांवर चार सोन्याच्या आंगठ्या, मनगटावर चांदीचं जाड कड असं भारदस्त व्यक्तिमत्व पाटलांचं होतं.

पाटिल निखिलला म्हणाले, "आमच्या गावात तुमचं स्वागत हाय. प्रवासानं दमला असाल. आमच्या वाड्यावर पैलं इश्रांती घ्या. झ्याकपैकी जेवन करा. मग राम्या तुमास्नी घाटावर घेउन जाईल. माजं पोरगं बी लई दिसापास्न तुमची वाट बघतंय. त्यो कॅमेरावाला दादा कधी येणार आस रोज इचारतंय."

पाटील चांगलेच बोलके आणि दिलखुलास होते. पाटलांची जीप वाड्यापाशी आली. गाडीचा आवाज ऐकताच पाटलांचं पोरगं 'कॅमेरावाला दादा, कॅमेरावाला दादा' असं ओरडत बाहेर पळत आलं व निखिलकडे कॅमेरा बघायचाय म्हणुन हट्ट करायला लागलं. तसं ते पोरगं आगदी लहान नव्हतं पण चांगलच लाडावलेलं होतं. निखिलला त्याच्या कॅमेऱ्याला कोणी हात लावलेलं बिलकुल खपत नसे. पण "दादा आत्ता दमलाय, त्येला त्रास देऊ नगस" असं म्हणून पाटलांनी निखिलला धर्मसंकटातून वाचवलं. तरीपण ते पोरगं आपला हट्ट सोडेना. शेवटी राम्या त्या पोराला आत घेउन गेला.

पाटलांनी निखिलला पुर्ण वाडा दाखवला व आपल्या घराण्याचा इतिहास सांगितला. एवढा मोठा वाडा निखिलने यापुर्वी कधिच पाहिला नव्हता. वाडा जुना असला तरी बांधकाम अजूनही मजबूत होतं आणि सगळ्या भिंती दगडी होत्या. वाडा फिरून होईपर्यंत स्वयंपाक तयार झाला होता.

कितीतरी दिवसांनी निखिल पुरणपोळी खात होता. जेवण झाल्यावर पान खाऊन निखिल झोपाळ्यावर बसला. वडिलांना काय वाटत असेल, आई काळजी करत असेल, आपण त्यांच्या मनाविरुद्ध इथे येऊन बरोबर केलाय का? हे विचार राहूनराहून त्याच्या मनात येत होते. पण आता त्याचं काम झाल्याशिवाय तो परत जाणार नव्हता. त्याने वडिलांना फोन लावण्यासाठी मोबाईल काढला, पण नेटवर्क प्रोब्लेममुळे त्याला फोन लावता आला नाही. थोड्याच वेळात निखिलला डुलकी लागली. त्याला जेव्हा जाग आली तेव्हा राम्या चहाचा कप हातांत घेउन उभा होता. निखिल चहा पीपर्यंत राम्या तिथेच उभा होता. निखिलचा चहा पिऊन झाल्यावर राम्या निखिलला म्हणाला, "सायब नदीवर जौयाका? परंत अंधार पडल्यावर परत यायला लागल." "हो, मी कॅमेरा घेउन येतो मग आपण निघूया." निखिल म्हणाला.

घाट पाटलांच्या वाड्यापासून फार लांब नव्हता. राम्या आणि निखिल चालत चालत मस्त गप्पा मारत घाटावर पोहोचले. कृष्णा नदीचं पाणी स्वच्छ होतं. आज निखिलला नदी आणि गटार यातला फरक समजला, कारण पुणे शहरातून वाहणारी मुठा नदी पाहिल्यावर ही नदी आहे का गटार असा प्रश्ण निखिलला कायम पडत असे. मावळत्या सूर्याचे नदीच्या प्रवाहावर पडलेले प्रतिबिंब अतिशय सुंदर दिसत होतं. निखिलने काही फोटॊ काढले. थोडावेळ घाटावर बसून निखिल आणि राम्या वाड्यावर परतले.

रात्रि अंथरुणावर पडल्यावर निखिल उद्या काय काय करायचं याचा विचार करत होता. घाटावरून येताना राम्यानं निखिलला त्या साधूंबद्दल सांगितलं होतं की त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी आहेंत, कसे ते लोकांना संमोहित करतात, माणसाचं कच्च मांस खातात. पण या गोष्टींवर निखिलचा विश्वास नव्हता. तो असल्या अफवांना बधणार नव्हता. किमान यासर्व गोष्टी अफवा आहेत असं निखिलचं मत होतं.

सकाळी लवकर उठून निखिल निघायची तयारी करत होता. आवरून झाल्यावर तो झोपाळ्यावर पाटलांची वाट पहात बसला. राम्या दुपारच्या जेवणाचा डबा घेउन आला व त्याच्या मागोमाग पाटिल पण आले. ते निखिलला म्हणाले,"तुमी जे करताय ते वाघाच्या तोंडात हात घालन्यासारखे आहे. परत येकदा इचार करुन बगा."

निखिल म्हणाला, "पाटील साहेब आपल्या देशात लोक अफवांना लगेच भुलतात. चमत्कार, काळी जादू अशा खोट्या गोष्टिंवर लोकांचा लगेच विश्वास बसतो. माझ्यावर विश्वास ठेवा मला काहिही होणार नाही."

राम्यान गाडीची चावी निखिलला दिली. जंगलाकडे जाण्याचा रस्ता राम्यान आधिच निखिलला सांगितला होता. निखिल जंगलाकडे जायला निघाला. जस जसं जंगल जवळ येत होतं तशी वस्ती कमी होत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वडाची झाडं होती. रस्ता कच्चा होता.

निखिल जंगलापर्यंत पोहोचला. तिथेच गाडी लावून, पायवाटेवरून निखिल पुढे जाऊ लागला. जंगलात इतक्या वेगवेगळया प्रकारची झाडं निखिल पहिल्यांदाच बघत होता. थोडे आंतर चालल्यावर निखिलला दोन पायवाटा लागल्या. डाव्याबाजूने जायचे का उजवीकडे वळायचे याचा निखिल विचार करत होता. निखिलने डाव्याबाजुने जाण्याचा निर्णय घेतला.

थोडं पुढे गेल्यावर निखिलला एका झाडाखाली एक साधू बसलेला दिसला. साधूचे डोळे उघडे होते, पण नजर कुठेतरी शून्यात पहात असल्यासारखी होती. नजर अतिशय भेदक होती. साधूचा चेहरा उग्र होता. साधूच्या डोक्यावरचे केस खुप लांब व करड्या रंगाचे होते. डोक्यावरचे आणि दाढीचे केंस अतिशय राठ होते. किती वर्ष या माणसाने आंघोळ केलेली नाही? असं निखिलला वाटलं. साधुच्या चेहऱ्यावर राख फसली होती व दोन भुवयांच्या मध्ये काळ्या रंगाचा नाम होता. गळयात वेगवेगळया आकाराच्या हाडांची माळ होती. साधूने कंबरेभोवती केवळ एक भगव्या रंगाचे वस्त्र गुंडाळले होते. बघून कोणालाही धडकी भरेल असे त्या साधुचे रूप होते. पण निखिल घाबरणाऱ्यातला नव्हता, त्याला फोटॊ काढण्यासाठी आयतीच संधी मिळाली होती.

निखिलने बॅगेतून कॅमेरा काढला. निखिल साधुपासून थोडा लांब उभा होता. प्रथम लांबूनच त्याने साधुचा फोटॊ काढला, पण साधु जागचा हलला नाही. साधु समाधी अवस्थेत होता. निखिलचं धाडस अजून वाढलं. निखिल पुढे गेला व त्याने अजून एक फोटॊ काढला. पण साधु जगाचा हलला नाही. त्याने काहिच प्रतिक्रिया दिली नाही. आता निखिलला साधुच्या भेदक डोळ्यांचा फोटो काढायचा होता. टेलीफोटो लेंन्स वापरून लांबूनही निखिलला साधूचा क्लोज अप फोटॊ काढता आला असता पण त्यांत तेवढी मजा नव्हती, त्याला 35MM चिच प्राईम लेंन्स वापरायची होती. निखिल साधुच्या जवळ गेला, इतका कि निखिलच्या कॅमेऱ्यात आणि साधूच्या डोळयात केवळ एक फुटांचेच अंतर होते. निखिलच्या ह्रिदयाची धडधड वाढली. निखिलने फोटॊ काढला व साधुचे डॊळे हलले. निखिल एकदम मागे सरकला. जंगलांत अंधार असल्यामुळे निखिलने फ्लॅश ऑन ठेवला होता. तो फ्लॅश साधुच्या डोळयात चमकल्यामुळे साधूची समाधि तुटली.

साधुचे पुर्ण शरिर रागाने थरथरत होते. साधुची भेदक नजर निखिलवर खिळली होती. साधु रागारागात निखिलला म्हणाला, "मूर्ख मुला काय केलंस तू हे? माझी समाधि मोडलीस आणि माझ्या परवानगीशिवाय तू माझा फोटॊ कसा काढलास? मी तुला शाप देतो, यापुढे तू कोणत्याही गोष्टीचा फोटॊ काढलास तर तूझ्या कॅमेऱ्यात माझाच फोटॊ येइल."

साधु एवढं बोलून थोडा शांत झाला. निखिल साधूला म्हणाला, "कुठल्या काळात जगताय तुम्ही, शाप बीप सगळं खोटं असतं."

"तुला जर वाटत असेल की माझा शाप खोटा आहे तर त्या झाडाचा फोटॊ काढुन बघ" साधु म्हणाला.

साधुने सांगितल्याप्रमाणे निखिलने एका झाडाचा फोटॊ काढला. पण निखिलच्या कॅमेऱ्यात त्या साधुचाच फोटॊ दिसला. निखिलचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. साधु निखिलकडे पाहून मिश्कीलपणे हसत होता. समोरच्या झाडावर एक सुंदर पक्षी बसला होता. त्या पक्ष्याचे पंख निळ्या रंगाचे होते. निखिलने view finder मधून बघितले तर त्याला तो पक्षी दिसला. पण फोटॊ काढल्यावर कॅमेऱ्यात बघितले तर पुन्हा तेच. कॅमेऱ्यात त्या साधुचाच फोटॊ दिसत होता. निखिलला काहिच कळत नव्हतं. त्या साधूकडे खरंच काहीतरी अलौकिक शक्ती होती. शेवटी निखिलने शरणागती पत्करली. तो त्या साधुला म्हणाला,"प्लिज तुमचा शाप परत घ्या. माझा कॅमेरा मला पहिल्यासारखा करुन द्या. मी चुकलो, तुमची समाधि मोडल्याबद्दल आणि तुमच्या परवानगीशिवाय तुमचे फोटॊ काढल्याबद्दल मी तुमची माफी मागतो. हवंतर तुमच्यासमोर मी तुमचे फोटॊ डिलिट करीन."

"ठिक आहे, तू तुझी चूक कबूल केलीस आणि माफीही मागितलिस. एका अटीवर मी तुला शापमुक्त करिन. जर तू आजचा पुर्ण दिवशी माझ्यासोबत घालवलास तर मी तुला शापमुक्त करिन " साधु निखिलला म्हणाला.

निखिल खुप खुश झाला. त्याचा कॅमेरा त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची वस्तु होती. निखिलला आपण इथे कशासाठी आलो आहोत ते आठवले. तो साधुला म्हणाला, "गुरुजी खरेतर मी इथे एका खास कामासाठी आलो आहे. या जंगलांत तुमच्यासारख्या साधुंची वस्ती आहे असं मी ऐकलं आहे. मला त्या साधुंच्या जीवनाबद्दल जाणून घ्यायचे आहे आणि त्यांचे फोटॊ काढायचे आहेत. तुम्ही पण त्या साधूंपैकीच आहात का?"

साधु मंद हसून म्हणला, "मी त्या वस्तीचा प्रमुख आहे. तुझं मी स्वागत करतो. तू आता आमचा पाहुणा आहॆस. आजचा दिवस तू विसरणार नाहीस याची आम्ही काळजी घेऊ. माझ्या मागे ये."

निखिल साधुच्या मागून चालु लागला. त्या वस्तीच्या प्रमुखाचीच परवानगी मिळाल्यामुळे निखिलला अडवणारे आता कोणिच नव्हते.

बराच वेळ चालल्यावर ते वस्तीपाशी पोहोचले. समोर कालीमातेचं भव्य मंदिर होतं. मंदिराच्या भोवती झोपड्या होत्या. कांही वयस्क साधु कालिमातेच्या पूजेची तयारी करत होते. कांही साधु देवळासमोरच स्वयंपाक करत होते. वेगवेगळ्या प्राण्यांचं मांस मोठ्या पातेल्यांमध्ये ठेवलं होतं. त्या मांसाचा दुर्गंध हावेत पसरला होता. निखिलने नाकावर हात ठेवला. दोन साधूंनी एक मोट्ठी चूल पेटवली आणि ते पातेलं चुलीवर ठेवलं.

तिथे वेगवेगळया वयाचे, रंगाचे, उंचीचे, स्थुल, सडपातळ साधु होते. अगदी निखिलच्या वयाची तरुण मुलंसुद्धा होती. सर्वांनी कंबरेला एक भगवे वस्त्र गुंडाळलं होतं व गळ्यात हाडांची माळ घातली होती. सर्वांच्या चेहेऱ्यावर राख फासली होती. गुरुजी निखिलला कालिमातेच्या मंदिरात घेउन गेले. नावाप्रमाणेच कालीमातेची मूर्ती चकचकीत काळी होती. देवीचा चेहरा अतिशय उग्र होता. लाल रंगाची लांब जीभ होती. मूर्तीला चार हात होते. एका हातात राक्षसाचे मुंडके होते. त्या मुंडक्यातून रक्त गळत असल्यासारखे वाटत होतं. दुसऱ्या हातांत कोयत्यासारखे शस्त्र होतं. मूर्तीच्या गळयात हाडांची माळ होती. निखिलने देवीला नमस्कार केला. गुरुजींनीही हात जोडले व कांही मंत्र पुटपुटले. अचानक कोणीतरी किंचाळल्याचा आवाज आला. निखिलने मागे वळून पाहिले. समोरचे दृश्य अतिशय बीभत्स होते. एका मॊठ्या रानडुक्कराचे मुंडके उडून त्याच्या पुष्ट शरीराजवळ पडले होते. त्या रानडुक्कराची ती शेवटची किंकाळी होती. एक जाडजूड साधु हातात कोयत्यासारखे शस्त्र घेउन उभा होता. त्या कोयत्याला रक्त लागले होते. त्या साधुने त्या शस्त्राने रान डुकराचे मुंडके उडवले होते.

निखिलला या सर्व प्रकाराचा किळस आला होता. निखिलला तिथून निघुन जावस वाटत होतं. पण त्याचा कॅमेरा दुरुस्त होइपर्यंत त्याला तिथे थांबणं भाग होतं. असल्या गलिच्छ, क्रूर लोकांचे जीवन जाणून घेण्यासाठी आपण इथं आलो असा विचार निखिलच्या मनांत आला. कॅमेरा दुरुस्त झाल्यावर इथुन सटकायचं असं निखिलने ठरवलं. देवळातून बाहेर आल्यावर निखिल गुरुजींना म्हणाला, "मला भुक लागली आहे. माझ्याकडे डबा आहे, मी जेवण करुन घेतो."

"आरे आसंकसं, तुम्ही आमचे पाहुणे आहात. आम्ही तुमच्यासाठी खास मेजवानी ठेवली आहे." हे ऐकल्यावर निखिलला मगाशी पाहिलेले रानडुक्करचे मुंडके आठवले व त्याच्या पोटात गोळा आला.

निखिलच्या मनातलं ओळखल्याप्रमाणे साधु म्हणाला, "काळजी करु नका आम्ही काय तुम्हाला मांस खायला घालणार नाही. माझ्या लोकांना मी खास तुमच्यासाठी गोडाधोडाचं जेवण बनवायला सांगितलं आहे."

निखिल काहीच बोलला नाही, नुसतं हसला. तो आणखी करु तरी काय शकत होता. सूर्य डोक्यावर आला होता. निखिलला खुप जोराची भुक लागली होती. काही वेळानंतर दोन तरुण साधु आले आणि निखिलला घेऊन गेले. त्यांनी निखिलला एका झोपडीत न्हेलं व खाली बसायला सांगितलं. जमीन शेणाने सारवली होती. समोर केळीचे मोठं पान ठेवलं होतं व ते तरुण साधु एक एक पदार्थ आणून केळीच्या पानावर वाढत होते. भजी, कुर्मा-पुरी, श्रीखंड, मसालेभात असे स्वादिष्ट पदार्थ खाउन निखिल तृप्त झाला. निखिल हात धुवून झोपडी बाहेर आला. निखिलने पाहिले, जवळंच गुरुजी आणि ते दोन तरुण साधु उभे होते. गुरुजी त्या दोघांना कांहीतरी सांगत होते. गुरुजी तिथुन निघुन गेल्यावर ते तरुण साधु निखिलजवळ आले आणि त्यांनी निखिलचा एक एक हात धरला. काहिच न बोलता ते दोन साधु निखिलला ओढून न्हेत होते. निखिल त्या साधूंना म्हणाला, "मला तुम्ही कुठे घेउन चाललंय आणि माझे हात का धरलेत?" पण कोणिच कांही बोलले नाही. निखिलने हात सोडवून घेण्याचा प्रयत्न केला पण त्या साधुंची पकड मजबुत होती. निखिल काहिच करु शकला नाही.

कांही अंतर चालल्यावर निखिलला एक कोठडी दिसली. कोठडी बांबूच्या दांड्यांपासून बनवली होती. वर जाड पत्रा होता. कोठडीच्या बाहेर चारही बाजुंना पहारेकरी उभे होते. ते पहारेकरी धिप्पाड होते व त्यांचा हांतात धारदार शस्त्र होती. कोठडीत आठ माणसं होती. ती माणसं अतिशय अशक्त दिसत होती. कंबरेभोवती गुंडाळलेला पंचा व्यतिरिक्त त्यांचा अंगावर कोणतेच वस्त्र नव्हते. त्यातल्या एकाचा चेहेरा निखिलला ओळखीचा वाटला. ती व्यक्ति निखिलच्या भावासारखीच दिसत होती, पण दाढी वाढल्यामुळे नीट कळत नव्हतं. त्या व्यक्तीच्या डाव्या डोळ्यावर भुवयांजवळ एक जखमेचा व्रण होता. निखिलला आठवले, लहानपणी खेळत असतांना निखिलचा दादा मयूर घसरून पडला व दगड घासल्यामुळे त्याच्या डोळ्याच्या वर भुवयांजवळ जखम झाली होती. मयूरचा डोळा थोडक्यात बचावला होता. जखम थोडयाच दिवसांत भरली, पण जखमेचा व्रण अजूनही दिसत होता.

ती व्यक्ति मयुरच आहे हे निखिलला कळले. मयुर अजूनही जिवंत होता. निखिल साठी हा आनंदाचा धक्का होता. मयुर हरवल्यानंतर त्याच्या मित्रांनी आणि घरच्यांनी खुप शोधाशोध केली पण तो कांही त्यांना मिळाला नाही. पोलिसांनीही खुप शोधलं पण मयुर कांही परत आला नाही. मयूरच्या आई-वडिलांनी आता तो परत येण्याच्या सर्व आशा सोडल्या.

मयुर गायब होउन आता सहा महिने झाले होते. सहा महिन्यांपूर्वी मयुर त्याच्या मित्रांबरोबर महाबळेश्वरला फिरायला गेला होता. त्याचे मित्र परत आले पण तो काही परत आला नाही. तो आणि त्याचे मित्र सातारा, वाई आणि महाबळेश्वर अशी ट्रिप करुन परत पुण्यात येणार होते. पण मयूरनं मेणवली बद्दल ऐकलं होतं व मेणवलीचे शिव मंदिर आणि नाना फडणवीसांचा वाडा त्याला पाहायचा होता. मयूरचे मित्र कंटाळले होते, पण मयूरने आग्रह केल्यामुळे सर्वांनी अजून एक दिवस थांबायचा निर्णय घेतला. सगळेजण वाईला एका हॉटेलात थांबले होते. सकाळी लवकर आवरून ते मेणवलीला जायला निघाले. मेणवलीत पोहोंचल्यावर त्यांनी शंकराचे दर्शन घेतले व वाडा पण पाहिला आणि देवळाशेजारीच एका हॉटेलमध्ये जेवण केलं. मयूरला घाट पाहायचा होता, पण कोणिच बरोबर यायला तयार होईना. सगळे आधिच कंटाळले होते आणि जेवण जड झाल्यामुळे कोणिच जागचा हलेना. शेवटी मयुर एकटाच निघाला. बराच वेळ झाला तरी मयुर परत आला नाही म्हणुन मित्रांनी त्याला फोन लावला पण फोन स्विच ऑफ लागत होता. आता संध्याकाळ झाली होती पण अजूनही मयूरचा पत्ता नव्हता. आजच सर्वांना पुण्यांत पोहोचायचं होतं. त्याचे मित्र घाटावर पण बघुन आले पण मयुर तिथे नव्हता. गांवातील लोकांना त्याचा फोटॊ दाखवला पण कोणिच त्याला पाहिलं नव्हतं.

गांवातील लोकांच्या म्हणण्यानुसार शक्यतो दुपारच्या वेळी घाटावर कोण जात नसे, कारण गावाजवळच्या जंगलांत अघोरी साधु राहतात व त्यांच्याकडे अद्भुत शक्ती आहेत. त्या शक्तीच्या जोरावर ते माणसांना संमोहित करतात व आपल्याबरोबर घेउन जातात. हे ऐकून मयुरचे मित्र घाबरले, त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. आम्ही लवकरात लवकर त्याला शोधून काढू असं आश्वासन पोलिसांनी दिलं. पण मयुर कांही त्यांना सापडला नाही. निखिलच्या आई-वडिलांसाठी आणि निखिलसाठी हा फार मोठा धक्का होता. येतांना पाचगणीतून स्ट्रॉबेरी आणि मॅप्रोचा जाम आणतो असं सांगून गेलेला मयुर परत आला नाही. निखिलच्या आईला तर आश्रू आवरत नव्हते. निखिलच्या आईने आणि वडिलांनी दोन दिवस काहिच खाल्ले नाही. निखिललाही मयूरची खुप आठवण येत होती. निखिलने इंजिनिअरिंग सोडुन पुर्ण वेळ फोटोग्राफी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा जर निखिल तिथे असता तर त्याने नक्कीच निखिलच्या निर्णयाला पाठिंबा दिला असता. मयुर सुरक्षित आहे असं निखिलला सारखं वाटत होतं किंवा असंही म्हणता येइल की आपला दादा परत येइल यासाठी निखिल आशावादी होता.

निखिलला अश्रू अनावर होत होते, पण परिस्थितीच अशी होती की निखिलला आपल्या भावनांवर आवर घालणे भाग होते. अजूनही मयूरचं निखिलकडे लक्ष गेलं नव्हतं. आपल्याला इथे कशासाठी आणलं आहे हे निखिलला समजलं. ते साधु निखिलला त्या कोठडीत ठेवणार होते. आपल्या भावाचा आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी निखिलला तिथुन सटकणे अपरिहार्य होतं. निर्णय घेण्यासाठी निखिलकडे खुप कमी वेळ होता.

निखिलला एक कप्लना सुचली. तो त्या साधुंना म्हणाला, "मला लघवीला जायचंय. माझ्यावर विश्वास ठेवा मी पळणार नाही. हवतरं तूम्ही माझ्यावर लक्ष ठेवा."

ते दोघं एकमेकांकडे बघू लागले. त्यातला एकजण निखिलला म्हणाला, "ठीक आहे, पण पळून जाण्याचा विचार सुद्धा करु नकोस." आणि त्या साधुने कोठडीपाशी उभ्या असलेल्या पहारेकऱ्यांकडे बोट केलं.

निखिल जवळच्याच एका झाडापाशी गेला व त्याने त्याचा कॅमेरा खाली ठेवला. तो तरुण साधु निखिलकडे लक्ष ठेवून सावध उभा होता. अचानक निखिल उलटी केल्याचं नाटक करु लागला व तसा आवाज काढु लागला. तो साधु हे पाहून निखिलच्या मागे येउन उभा राहिला. तेवढ्यात निखिलने कॅमेरा उचलला व पुर्ण ताकद लावून मागे वळुन त्या साधुच्या चेहेऱ्यावर आदळला. तो साधु एकदम कोलमडला. क्षणाचाही विलंब न लावता निखिलने झाडाजवळच्या भांड्यात ठेवलेली राख दोन्ही मुठीत घेउन साधुच्या डोळ्यात फेकली आणि निखिल पळत सुटला. निखिल पळाला हे त्या साधुला कळेपर्यंत निखिल बराच पुढे गेला होता. निखिल एक झाडामागे लपला.

त्या साधुला काय करावं तेच कळत नव्हतं. गुरुजींना आता तो काय सांगणार होता? निखिल पळुन गेला हे जर गुरुजींना संगितलं तर ते आपल्याला जिवंत ठेवणार नाहीत याची त्या साधुला खात्री होती. त्याने निखिल पळुन गेल्याचे आपल्या सहकाऱ्याला सांगितलं. दोघेही खुप घाबरले होते. तिथुन पळुन जाण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. पण पळुन जाणार तरी कुठं? दोघांनाही काहिच सुचत नव्हतं. त्यांना एक मोठा दगड दिसला. त्या दगडाचा आकार प्रंचंड होता. दोघेही त्या दगडाच्या मागे जाउन बसले.

निखिल ज्या झाडामागे लपला होता त्या झाडाजवळ दोन साधु बोलत उभे होते. त्यातला एक साधु दुसऱ्याला सांगत होता, "गुरुजींना नववा बळी मिळाला असं मी ऐकलं. स्वतः गुरुजींनीच त्याला इकडे आणलं आहे. आज रात्रीच नऊ जणांचा बळी देणार आहेत. रात्री बाराचा मुहूर्त आहे."

दुसरा साधु पहिल्याला म्हणाला, "म्हणजे आता आपण सगळे दीर्घायुषी होणार, आता आपण शंभर वर्षांपेक्षा जास्त जगणार. कित्येक वर्षांपासून आपण ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो दिवस आज आला आहे. आता पूजेच्या तयारीला लागलं पाहिजे." एवढं बोलुन ते साधु तिथुन निघुन गेले.

म्हणजे मयूरला आणि त्या सात जणांना वाचवण्यासाठी निखिलकडे आज रात्री बारा पर्यंतच वेळ होता. आता पुढे काय करायचं याचा निखिल विचार करत होता. निखिलनं आजूबाजूला पाहिलं आणि कोण पाहत नाही याची खात्री करुन तो पूढे चालु लागला. थोडं पुढे गेल्यावर त्याला एक साधु समाधि अवस्थेत बसलेला दिसला. निखिलला एक कल्पना सुचली. यापुर्वी निखिलनं कुणावर कधी हातही उगारला नव्हता. पण आता तो जे करणार होता त्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. निखिलनं बाजूच्या झाडाची एक जाडजूड फांदी तोडली. निखिलला त्या साधुला केवळ बेशुद्ध करायचं होतं. निखिलनं ती फांदी त्या साधुच्या डोक्यात मारली. तो साधु बेशुद्ध होउन खाली कोसळला. निखिलनं साधुच्या कंबरभोवती गुंडाळलेलं वस्त्र व त्याच्या गळ्यातली हाडांची माळ काढली. निखिलनं स्वतःचे कपडे काढुन ते वस्त्र कंबरेभोवती गुंडाळलं व ती माळ गळयात घातली. बाजूला ठेवलेल्या भांड्यातली राख चेहेऱ्याला फासली. निखिलनं त्याच्या लांब केसांना बांधलेली गाठ सोडली. लांब केस आणि दाढीमुळे तो आता खराखुरा साधुच वाटत होता. त्यामुळे आता निखिल पुन्हा साधुंच्या वस्तीत जाऊ शकत होता. त्याला गुरुजी आणि ते तरुण साधु सोडले तर बाकी कोणच ओळखत नव्हतं. निखिल गुरुजींपासून लांबच राहणार होता.

निखिल पुन्हा वस्तीत आला. आत्तापर्यंत तो पळाला म्हणून सगळीकडे धावपळ चालु असेल असं निखिलला वाटलं होतं, पण तसं काहीच नव्हतं. सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. निखिल तिथुन पळुन जाणार होता तेवढयात एका साधूनं निखिलच्या हातात फुलांनी भरलेली एक टोपली दिली आणि एक सुई आणि जाड दोरा दिला. त्या साधुने निखिलला फुलांचा हार बनवायला संगितलं. सगळीकडे देवीच्या पुजेची तयारी जोरात चालली होती. निखिलला अजून कांही वेळ इथेच घालवावा लागणार होता.

निखिलला पाहण्यासाठी गुरुजी कोठडीपाशी आले. पण निखिल कोठडीत नव्हता व ते दोन साधु ज्यांना गुरुजींनी निखिलला कोठडीत टाकायला आणि त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं, तेही तिथं नव्हते. गुरुजींच्या तळपायातील आग मस्तकात गेली. निखिल पळाला आहे हे गुरुजींना समजलं. गुरुजींनी आपल्या दोन विश्वासू साधुंना बोलावलं व निखिलला आणि त्या साधुंना शोधायचं फर्मान सोडलं.

गुरुजींचे विश्वासु साधु आणि दोन पहारेकरी अशा चार जणांची शोधमोहीम सुरु झाली. निखिलला शोधणं किती महत्वाचं आहे हे ते जाणून होते. एक साधु आणि एक पहारेकरी आणि उरलेले दोघे दोन दिशांना गेले. थोडं पुढे गेल्यावर एका साधुला निखिलचा कॅमेरा दिसला. म्हणजे निखिल तिथूनच पुढे गेला आहे हे नक्की होतं. दुसरीकडे तो दुसरा साधु आणि पहारेकरी त्या मॊठ्या दगडापाशी येउन पोहोचले. ते दोन तरुण साधु अजूनही त्या दगडामागेच लपले होते. धिप्पाड पहारेकऱ्याला पाहताच ते साधु चळा चळा कापू लागले. पहारेकऱ्याने त्या दोघांना पकडलं व साधुच्या समोर उभं केलं.

साधुने त्यांना निखिल बद्दल विचारलं. तरुण साधुंनी निखिल कसा पळाला ते सविस्तर सांगितलं व गुरुजींना याबद्दल काहिही सांगू नका आणि आम्हालासोडुन द्या अशी याचना करु लागले. पण तो साधु मुर्ख नव्हता. त्याला त्याचा प्राण प्रिय होता. तो त्या दोघांना गुरुजींकडे घेउन गेला आणि जे जे घडलं ते सर्व कांही सांगितलं. ते दोन तरुण साधु गुरुजींकडे जीवाची भीक मागत होते. पण त्यांच्या रडण्या ओरडण्याचा काहिच उपयोग झाला नाही. सूर्याच्या प्रकाशात चमकणारं कोयत्याचं धारदार पातं त्या नाजूक मानांवरून फिरलं आणि खेळ खलास. गुरुजींनी खूण करताच दोन पहारेकरी आले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तरुण शरीरं घेउन गेले.

निखिलचे हार बनवून झाले होते. कोणाचं लक्ष नाही हे पाहताच निखिल पुढे चालु लागला. तेवढयात निखिलला आवाज ऐकू आला. सगळीकडे गोंधळ चालु होता. एक साधु तिथे ओरडत आला, "नववा बळी पळाला, नववा बळी पळाला". सगळीकडे धावपळ चालु झाली. निखिल अजून पुढे गेला. आता तो वस्तीच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचला. या गोंधळामुळे कोणाचंच लक्ष त्याच्याकडे गेलं नाही. निखिल आता वस्तीतून बाहेर पडला होता. तो आता वाट दिसेल तिथे पळत सुटला. पळुन पळुन निखिलला धाप लागली होती. तो थोडी विश्रांती घेण्यासाठी एका झाडाखाली बसला. अजूनही सुर्य मावळायचा होता, पण जंगलात दाट झाडीमुळे अंधार पडला होता. फार वेळ एकाजागी थांबणं निखिल साठी धोक्याचं होतं आणि त्याच्याकडे वेळही कमी होता.

निखिल तिथुन निघणार तेवढयात काही साधु हातात मशाली घेउन येताना त्याला दिसले. एक साधु तर निखिल ज्या झाडामागे लपला होता त्या झाडापाशीच आला, पण त्याला त्याच्या सहकाऱ्याने हाक मारल्यामुळे तो तिथुन निघुन गेला. निखिल थोडक्यांत वाचला. ते साधु परत गेल्यावर निखिल पुढे चालु लागला. आता सुर्य पुर्ण मावळला होता. निखिलकडे घड्याळ नव्हतं पण साधारण सहा ते सात वाजले असावेत असं निखिलला वाटलं. त्याच्याकडे वेळ फार थोडा होता. अजुन थोड चालल्यावर निखिल रस्त्यापर्यंत पोहोचला. एक गाडी येतांना त्याला दिसली, त्याने हात केला पण गाडी थांबली नाही. निखिलच्या लक्ष्यात आलं की अजूनही तो साधुच्याच वेशात होता आणि त्याला पाहुन कुठलीच गाडी थांबणार नव्हती. आता काय करायचं याचा निखिल विचार करत होता. त्याचे कपडे, बॅग आणि कॅमेरा त्या वस्तीतच राहिले होते.

निखिलला एक गाडी येताना दिसली. त्या गाडीत मेणवलीचे सरपंच पाटील बसले होते. निखिलनं 'पाटील साहेब' अशी हांक मारली. गाडी थांबली. पण पाटील साहेबांनी अजुनही निखिलला ओळखलं नव्हतं. ओळखणार तरी कसं, त्याने केस सोडले होते, चेहेऱ्यावर राख फासली होती आणि त्याचा पूर्ण वेशच साधुंसारखा होता. निखिलनी स्वतःचे नांव सांगितल्यावर पाटील साहेबांना कळलं.

निखिलनं सकाळपासून जे जे घडलं ते सर्व पाटील साहेबांना सांगितलं. त्या दोघांनी ठरवलं की काहिही करुन त्या दुष्ट साधूंचा सोक्षमोक्ष लावायचा. पण जे कांही करायचं ते आत्ताच करायला हवं होतं. पाटील साहेब आणि निखिल गावात आले. पाटील साहेबांनी गावातल्या लोकांना एकत्र येण्याची सूचना दिली. निखिलनं गांवातल्या लोकांना सर्व कांही संगितलं. गांवातील कांही माणसंही अशीच घाटावरून गायब झाली होती. त्यामुळे त्या लोकांच्या घरच्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. सर्व गावच आता एकत्र आलं होतं. त्या वस्तीत साधरण दोनशे साधु होते. त्या साधुंकडे धारदार शास्त्रे होती. गुरुजींकडे आणि काही वृद्ध साधुंकडे चमत्कारिक शक्ती होत्या. त्यामुळे गांवातील पाचशे माणसं काठ्या आणि तलवारी घेउन त्या वस्तीत जाणार होती आणि मयूरला आणि त्या सात लोकांना सोडवुन आणणार होती.

गाड्या भरून लोक जंगलाकडे रवाना झाले. आता सर्वात महत्वाचा प्रश्न होता वस्तीपर्यंत पोहोचायचं कसं. कारण जंगलातून दोन-तीन पायवाटा जात होत्या पण त्यातली एकच वाट वस्तीपर्यंत पोहोचत होती. सर्व लोक एका ठिकाणी थांबले होते. तेवढयात एक तरुण साधु येताना त्यांना दिसला. सर्वजण आंत झाडीत लपले. तो साधु जवळ येताच दोन माणसं झाडीतून बाहेर आली आणि त्या साधुवर झडप घालुन त्याला पकडलं व त्याच्या मानेवर तलवार ठेऊन त्याला वस्तीपर्यंत न्हेण्यास सांगितलं. हडबडलेला तो साधु काहीच करु शकला नाही. सर्व गावकरी त्याच्या मागे जाऊ लागले. बराच वेळ चालल्यावर सर्वजण वस्तीपाशी आले. रात्रीचे आकरा वाजले होते. कालीमातेच्या मंदिरासमोर एक मोठं स्टेज बांधलं होतं. त्या स्टेजवर नऊ लोकांना एकेका खांबाला बांधलं होतं व नऊ साधु कोयता हातांत घेउन त्या लोकांच्यासमोर उभे होते. म्हणजे त्या साधुंना नववा बळी मिळाला होता. मंदीरात गुरुजी आणि पाच वृद्ध साधु देवीची पूजा करण्यात मग्न होते. बरोबर रात्री बारा वाजता पुजा संपणार होती आणि गुरुजींचा आदेश मिळताच त्या स्टेजवर उभ्या नऊ लोकांचा बळी दिला जाणार होता.

निखिल आणि पाटील साहेबांनी सर्व नियोजन केलं होतं. कोणत्याही प्रकारची जीवित हानी होता कामा नये अशी सक्त ताकीद पाटील साहेबांनी गावकऱ्यांना दिली होती. त्यांनी तलवारी बरोबर न्हेल्या होत्या पण केवळ आत्मरक्षणासाठीच ते तलवारीचा वापर करणार होते. सर्वांत प्रथम ते स्टेज वर उभ्या असलेल्या साधुंवर हमला करुन त्या नऊ जणांना सोडवणार होते आणि मग बाकीच्या साधुंबरोबर त्यांची लढाई चालु होणार होती.

ठरल्याप्रमाणे पहिले शंभर गांवकरी जे शरिराने दणकट होते ते हातांत काठया घेउन स्टेजच्या दिशेने धावले आणि त्या साधुंना काही कळायच्या आतच त्यांना धरले व त्यांच्या हातातील कोयते काढुन घेतले. अजून तीनशे साधु पळत आले आणि जे बाकीचे साधु कोयते आणण्यासाठी आपआपल्या झोपडीकडे जात होते त्यांना पकडले. आता फक्त गुरुजी आणि पांच वृद्ध साधु राहिले होते. ते देवीच्या पूजेत इतके मग्न होते की बाहेर कांय चाललंय याचे त्यांना काहीच भान नव्हतं. पाटील साहेब आणि निखिल उरलेल्या गावकऱ्यांना घेउन देवळात गेले. निखिलने गुरुजींचा हात पकडला आणि त्यांना वर ओढलं. गावकऱ्यांनी त्या पाच वृद्ध साधुंना पकडलं. गुरुजीने समोर पहिले तर त्याच्या सर्व साधुंना गावकऱ्यांनी पकडलं होतं. गुरुजी संतापला होता पण तो आता काहीच करु शकत नव्हता.

आता तिथे पोलीस देखिल आले होते. निखिलनं गुरुजीला पोलिसांकडे सुपूर्द केलं.

आज सहा महिन्यानंतर दोन भावांची भेट झाली होती. निखिलनं मयूरला मिठी मारली. त्याला मयुरची कीव आली. सुदृढ शरीर असलेला त्याचा दादा हाडांचा सापळा दिसत होता. निखिलला त्याची अवस्था पाहवत नव्हती. मयूरला खुप बोलायचं होतं पण त्याच्या अंगात काहीच ताकद नव्हती. त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते.

निखिल, पाटील साहेब आणि मयुर परत गावात आले. मयुरनं अंघोळ केली आणि सर्वांनी जेवण केलं. कितीतरी दिवसांनी मयुर पोटभर जेवला होता. जेवण झाल्यावर तो लगीच झोपला. निखिलही खुप दमला होता त्यामुळे त्यालाही लगीच झोप लागली. सकाळी उठल्यावर मयुर निखिलला म्हणाला, "निखिल, मला खरंच तुझा खुप आभिमान वाटतो. मला तुझ्यासारखा हुशार आणि धाडसी भाऊ दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. आज तू केवळ मलाच नाही तर या गावालासुद्धा त्या अघोरी साधुंच्या विळख्यातून वाचवलेस. काल पर्यंत मी जगण्याच्या सर्व आशाच सोडल्या होत्या पण आज मला माझा पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतयं."

"अरे दादा, देवीचीच इच्छा असावी. त्यामुळे देवीनेच माझ्याकडून सर्वकाही करुन घेतलं. बर तू सांग ना तू त्या साधुंच्या तावडीत कसा काय सापडलास? तुझ्या मित्रांकडून मला कळलं की तू घाटावर गेला होतास. त्यापुढे काय झालं?"

दीर्घ श्वास घेउन मयुर सांगु लागला - मी एकटाच घाटावर गेलो होतो. नदीच्या पाण्यात पाय बुडवून मी बसलो होतो. तेवढयात तिथं एक साधु आला व माझी विचारपूस करु लागला. मी त्याला संगितलं की मी माझ्या मिंत्रांबरोबर इथं फिरायला आलो आहे वगैरे. त्याने मला त्याच्या डोळयात पाहायला सांगितलं. संमोहित झाल्याप्रमाणे मीही त्याच्या डोळयात पाहू लागलो. त्याच्या डोळयात एक वेगळीच चमक होती. नंतर मी त्या साधुंच्या वस्तीत कसा पोहोचलो हे मला काहीच आठवत नाही. पण मी जेव्हा भानावर आलो तेव्हा मी त्या कोठडीत बंद होतो.

निखिलनेही दोन दिवसात घडलेलं सर्व कांही मयूरला सांगितलं. सकाळी पाटील साहेबांकडे जेवण करुन निखिल आणि मयुर पुण्याला जायला निघाले. निघताना पाटील साहेब निखिलला म्हणाले, "निखिलराव तुमच्यामुळं आमचं गांव आज येकत्र आलं. आता आमाला त्या साधुंची पन भिती ऱ्हायली नाही. आमचे लोक बी आमास्नी परत भेटले. तुमचे लई उपकार हायत आमच्यावर. जवा वाटल तवा इथं या, आमी तुमच्या शेवेस तयार हाय."

निखिल आणि मयुर पुण्यात पोहोचले. घडलेल्या प्रकाराबद्दल आणि मयुर सुखरुप आहे हे निखिलनं अजून घरी सांगितलं नव्हतं. निखिल आणि मयुर आई-वडिलांना सरप्राईस देणार होते.

निखिलने घराची बेल वाजवली. आईनं दार उघडलं. आपल्या डोळयांवर तिचा विश्वास बसत नव्हता. आपली दोन्ही मुलं सुखरुप पाहुन तिला अत्यानंद झाला होता. तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्ह ते. हे खरंच घडतंय कि आपण स्वप्नात आहोत हेंच तिला कळत नव्हतं. निखिलचे वडिल बाहेर आले. निखिल आणि मयुर दोघांनाही सुखरुप पाहून फारसं कधी भाऊक न होणाऱ्या त्यांच्या वडिलांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. एवढा आनंद त्यांना आयुष्यात पहिल्यांदाच झाला होता. भवनावेग ओसरल्यावर निखिलनं त्याच्या आई-वडिलांना सर्व कांही सांगितलं. निखिलच्या वडिलांना आज खरंच त्याचा अभिमान वाटत होता. जो मुलगा वाया गेला असं त्यांना वाटत होतं त्याने आज असं कांही काम केलं होतं ज्याचा त्यांनी कधी विचारदेखील केला नव्हता. निखिलनं त्यांना त्यांचा दुसरा मुलगा परत मिळवुन दिला होता.

आता निखिलला एक खुप महत्वाचं काम करायचं होतं ज्यासाठी तो खुप आतुर होता. प्रणिताला भेटणे.

कालच निखिलनं ऍमेझॉन वरून नवीन कॅमेरा मागवला. पण त्याचा जुना कॅमेरा अजूनही त्याच्याजवळ आहे आणि अजूनही त्या कॅमेऱ्याने फोटॊ काढल्यावर गुरुजीचा उग्र चेहेराच फोटोत येतो.

लेखक - निरंजन कुलकर्णी