Nishabd Antrang - 3 in Marathi Poems by Vishal Vilas Burungale books and stories PDF | निशब्द अंतरंग - 3

Featured Books
Categories
Share

निशब्द अंतरंग - 3

निशब्द अंतरंग

भाग - 3

अश्व दौडले होते........|

अश्व दौडले होते कधी,

भेदण्या यवनांची कडी,

चढली होती चिलखते,

राखण्या इभ्रतीची मढी,

साद परी एकच होती,

जयजयकार घडोघडी,

हर हर महादेव आरोळी,

काळाचाही उर चीरी,

ऐसेच दौडले अश्व होते,

भेदण्या यवनांची कडी |

नाही संसार नाही नाती,

स्वराज्य पहावे एक जाती,

ऐसीच ज्यांची होती करणी,

लाखोंची बलिदाने झेलली धरणी,

कंठात परी आक्रोश नव्हता,

मी पणाचा जयघोष नव्हता,

हर एकास होश होता,

“ राज्य घडावे, श्रींची इच्छा ”

वसा मंत्राचाच,

हर झोळीत होता,

कैसा काळ अन् कैसी होती घडी,

ऐसेच दौडले अश्व होते,

भेदण्या यवनांची कडी |

आजपरी हे दिसत नाही,

देशाभिमान मनी ठसत नाही,

अन्यायी लढण्या सोडाच,

मयतासही कर अमुचा उठत नाही,

राख झाली इभ्रतीची,

परी अन्याय काही दिसत नाही,

वाताहात सारी धरणीची,

मनास काही कळत नाही,

अरे.... कुठवर उपजतील नपुंसंकी,

या मातृभुमीच्या पोटी,

कैसे दौडणार अश्व यांचे,

भेदण्या यवनांची कडी ...

भेदण्या यवनांची कडी |

आता तरी....|

षंढ झाल्या भावनांनो,

आता तरी जागे व्हा,

धूर्त बनल्या पावलांना,

मनी धरल्या सावजांना,

आता तरी सक्त व्हा,

द्वेषक्रांती नकोची आता,

मनी तेजक्रांती शोधीत या,

षंढ झाल्या भावनांनो,

आता तरी जागे व्हा,

आक्रोश मनी रुतला केव्हाचा,

आज तयाचा सूड घ्या |

कोण हिंदु कोन यवन,

इथे सारेच माणुसकीचे हवन,

कोण गातो कुणाचे गोडवे,

कोण कोणास साजीतो जोडे,

अरे हा न अपमान हा तुमचा,

न अपमान हा अमुचा,

हे तर सारे षड्यंत्र वेड्या,

शुभ्रचर्मी दडुनी आल्या,

कोल्ह्यांचाची तो डाव वेड्या,

आता तरी स्वस्थितीत या,

निद्रा त्याजुनी स्वप्न भेदुनी,

वास्तवी पुन्हा शुरस्त्र व्हा,

षंढ झाल्या भावनांनो,

आता तरी जागेच व्हा,

आक्रोश मनी रुतला केव्हाचा,

आज तयाचा सूड घ्या |

आजही रण तेची आहे,

शत्रू आम्ही आमचेच,

परी समजुनी घेण्या,

मतीच ना इथे,

म्हणुन पिकते आजही,

रणांगणी ते हिंदु-मुस्लीम ,

वैर जानिवेहून रिते,

वेध आज घ्या इतिहासी,

जो पुन्हा सांगण्या आलाच आहे,

छाटुणी शीर परस्परांची,

तमाशापरी शुभ्र चामड्यास आहे,

आता तरी शोध,

मनासी हि तुझ्या,

होऊ दे तो बोध,

कैसे सांगु किती सांगु,

तळमळ फार वाढत आहे,

म्हणुनी सांगतो ... हे वंश बांधवानो ,

आता तरी सज्ज व्हा,

लढण्या-झडण्यापरी स्वत्वासाठी,

आज पुन्हा रण थरथरती या,

षंढ झाल्या भावनांनो,

खरेच परी जागेच व्हा,

आक्रोश मनी रुतला केव्हाचा,

आज तयाचा सूड घ्या

..... आज तयाचा सूड घ्या |

मातृभुमीचं प्रण ....|

विरह कधी मज न घडावा,

मातृभुमीच्या प्रणाचा,

आक्रंद कधी मनी नसावा,

भेदणाऱ्या भावनांचा,

माझा कंठ माझी वानी,

गावो मज मातेचीच गाणी,

माझी वासना माझी मती,

सारीच ढळे तीचे पायी,

तीच सर्वस्वी सर्वदा तीच असो,

मनासी मन आसनीही तिची वसो,

घडो जाणे हस्ते रिती,

म्हणुनी मायभुमी ..... माय,

आज या लेकरांचे सुर गाय,

मी सर्वस्वी तुझ्या कुशीत येतो,

घेतानाही संथ ऱ्हाय,

अशीच यावी देहास गती,

हिच अपेक्षा तुज चरणमिती,

असाच जीवन प्रवास घडावा,

मातृभूमीच्या प्रेमाचा,

विरह कधी मज न घडावा,

मातृभुमीच्या प्रणाचा |

त्वेषनारी रक्तगती,

नसानसांतुनी द्रुत व्हावो,

संथ धुंद जीवन ऐसे,

क्रांतीच्या स्तंभात ठसो,

मातृभुमिच्या इभ्रतीस घडला,

कलंकही मज रक्त आसवांनी पुसो,

आजही धगधगती ज्वाला पुरती,

सर्वांगास जाळुनी उरो,

आईच्या शीलास माझ्या,

पराजयाचा सहवास नको,

म्हणुनी अंगीचा थेंब नी थेंब,

तीज पिंडावरती अविरत ढळो,

हाच तो उष्ण झरा,

अभिषेक तो आईस घडो,

सारा देहची माझा,

तीज सत्कारणी कसावा,

होरा पुरता हाची आहे,

नादान या मनाचा,

विरह कधी मज न घडावा,

मातृभुमीच्या प्रणाचा,

..... विरह कधी मज न घडावा,

मातृभुमीच्या प्रणाचा |

उठ रे देशा...|

उठ उठ रे देशा,

आज पुन्हा बोलायाचे आहे,

जायबंदी बाहु दोन्ही,

पुन्हा नव्याने खोलायाचे आहे,

जाग जाग हे रनवेड्या,

धुरंधरा त्वेषफेऱ्या,

संचार नव्याने मांडायाचे आहे,

उठ उठ रे देशा,

बघ आज पुन्हा लढायाचे आहे |

कोण देश कोण माती,

नाही जात नाही पाती,

सोड उभय जीविताचे सोंग,

धर मनी वेताळाचे भोग,

झगड झगड आता,

गाठ घेन्यादेण्याऱ्याची आहे,

निजल्या विझल्या तरवारीची,

धार तेउनी तीच सांगत आहे,

शांत स्तंभित,

भय स्मशानी दिशाही शांत आहे,

आता तुलाही खरे बघ,

बोलायाचे आहे,

असंख्य ज्वालामुखांनी पुन्हा,

बघ पुन्हा पुन्हा जगायाचे आहे,

उठ उठ रे देशा,

बघ आज पुन्हा लढायाचे आहे |

शंखनाद झाला आता,

रणी सैन्यही शांत आहे,

हिच बघ वेळ गड्या,

शत्रुही हा धुंदीत आहे,

अजुनही कुस मातेची बघ,

तुझ्यावाचुन रिती आहे,

पराक्रम वीरश्री ...........

तीज पान्हांतूनी स्त्रवत आहे,

झेल सारी वीरश्री,

अन् झेल सामर्थ्याचे स्वांतत्र हे,

घे आवेशही पचवुनी आता,

जगणे केवळ मरणेच आहे,

म्हणुनी वेड्या जाग पुन्हा बघ,

आकांत आक्रोश...

सारेच पुन्हा फोडायाचे आहे,

एक एक अपमानी बदला,

अश्व क्रांतीचा आताची,

बघ दौडायाचा आहे,

उठ उठ आता,

उठ अन् उठ तुरे,

रणतांडव ते पुन्हा करायाचे आहे,

बघ आज पुन्हा लढायाचे आहे,

........ पुन्हा लढायाचे आहे |

शर्थ .....|

गड आकाशीचे जिंकण्याची,

शर्थ कुणाची होती ?

धड पांघरते अन आंगरते,

ती जानीव वेडी,

व्यर्थ कुणाची होती,

ते आसवांचे ओठांशी संगर,

पापणींत दडलेले परी,

भावनांचे असंख्य डोंगर,

प्रीत रात जणु गीत गात,

ती अस्पष्ट धुसर......

तनु कुणाची होती,

गड आकाशीचे जिंकण्याची,

शर्थ कुणाची होती ?

पाऊस धारा पहात कधी,

ओघळून जावे पानावरती,

कधी दडावे पाकळीत फुलाच्या,

कधी रग वळचणीत झुरावी,

वेड जिंकण्याचे अन् कधी,

थरथरती ती वीज स्मरे,

घेवूनी सारे बळ उरीचे,

मनही कधी कुठेच नुरे,

हिच घालमेल सदाची,

आजही पुन्हा तिचं होती,

तरीही भावनरंगावरती फुकाची,

रीत कुणाची होती,

गड आकाशीचे जिंकण्याची,

शर्थ कुणाची होती ?

सोड राही थांबलेले,

सांधलेले ते शब्द जुने,

घे नवे अस्त्र करी,

वस्त्रही त्यागुनी अनंत धरी,

ती चाहुल रांगती,

बघ कुठे आसपास गाती,

शोध नवदृष्टीने दिशा मनाची,

रोध कुणाचे कशास होतीं,

घडलेले हे भास कधी,

स्वरातही दडुन जाती,

पडुन जाती असंख्य अक्षरे,

आवाजही विरून जाती,

आता उरली तरीही सर्वांगी,

ती प्रीत कुणाची होती,

गड आकाशीचे जिंकण्याची,

शर्थ कुणाची होती ?

................ शर्थ कुणाची होती ?

गांधीच्या देशात....|

लोकशाहीच्या साठीचं,

नवल असं साऱ्यांनीच सांगायचं,

मिळालेलं स्वातंत्र्य अभिव्यक्तीचं,

तेही आम्ही साऱ्यांनीच भोगायचं,

मग कुठं कधी आणि कसं,

ते आम्ही नाही पहायचं,

कारण गांधीच्या देशात,

हे असंचं चालायचं |

कधी टेबलाखालून,

तर कधी टोपीखालुन,

भ्रष्ठविष्टा मात्र,

चघळत राहायचं,

आणि त्यालाही डोकं लागतं,

हे देखील मिटवून सांगायचं,

कारण गांधीच्या देशात,

हे असंचं चालायचं |

कधी आदर्शांचं खोटं सोंग,

कागदावर उमटवायचं,

अन् मागच्या हातांनी मात्र,

तेच गटार ढवळून काढायचं,

मग अशा या भ्रष्ट देशात,

आदर्श तरी कोणास ठेवायचं,

अन् गांधीच्या या देशात,

काय हे असंचं चालायचं ?

लोकशाही लख्तरं .....|

वेड्यातुनी वेडपणा हा,

माझ्यात ऐसा भिनु पाहे,

माझेच मी पण ज्यासवे,

माझ्याच पासुनी दूर सारे,

किती एकदा भोगू सारे,

लोकशाही लख्तरांचा,

हाची भरला बाजार आहे |

स्वत्व कुणाचे दमडीपोटी,

खरेच कारे विकते झाले,

सत्ता अन सत्तेपोटी,

उभ्या जनांचे हिजडे झाले,

स्वाभिमान अन् अभिमानाची,

गोष्ट कुणी काढावी ?

ऐसीच गौरवशाली इतिहासाची,

लख्तरे परी मांडीत जावी,

तरीही न भरला जीव म्हणुनी,

इथे जीवांचाच खेळ चाले,

लोकशाही लख्तरांचा,

हाची भरला बाजार आहे |

द्रव्याच्या हव्यासापोटी,

द्रव्य ओतुनी क्षणी घडावे,

त्याच मग त्या द्र्व्यापोटी,

जन सारे शोषुनी घ्यावे,

पांघरुनी व्याघ्रचर्मासी,

दडलेले हे कोल्हेच सारे,

अन् हे एकदा न दोनदा,

अव्याहत सारे घडते आहे,

लोकशाही लख्तरांचा,

हाची भरला बाजार आहे |

आज परी न वेळ शोकाची,

आहे हिच क्रांतीवीर्याची,

आहे जरी भुरसटला,

जन आकांताती घुसमटला,

तरी वंश त्याचा मात्र,

शूर अन शूरांचा आहे,

राखेतुनी दुर्ग उभारणे,

हाच अमुचा इतिहास आहे,

म्हणुनी लोकशाही लख्तरांचा,

हाच मोडणे बाजार आहे,

हाच मोडणे बाजार आहे |

तारुण्य हाक .....|

हुंकारल्या दिशा दाही,

काळही डोकुनी पाहे,

शंखनाद फार जुना,

आज पुन्हा वाजुनी राहे,

पोखरल्या अंतरातुनी,

नाद हि गरजुनी आहे,

स्तंभ तरीही कानजोडी,

आज तरी जाग वेड्या,

मातेची हि लाज आहे |

दिली शिव्यांची लाखोली,

हेच का ते शील आहे,

क्रांतीच्या त्या उंच स्तंभी,

हेच का ते ब्रीद आहे,

तुच आज पुन्हा,

तेच ब्रीद ताडूनी पाहे,

आज तरी जाग वेड्या,

मातेची हि लाज आहे |

चढली जी धुळ नव्याने,

तीच आज झटकुनी पाहे,

अंतर आत्मी दिव्याचे,

तेज तु लेवुनी पाहे,

संथ वाहती सरीता जणु,

क्षणाक्षणा ती सांगु पाहे,

आता तरी जाग वेड्या,

मातेची हि लाज आहे |

सोड माझे तुझे आता,

काळ हा मोकाट वाहे,

पोलादी या मनगटात तुझ्या,

दाव जे सस्फोट आहे,

लाल रंगी रंग सारे,

तन जे तुझे मलीन आहे,

आज तरी जाग वेड्या,

मातेची हि लाज आहे |

बलिदानाची ज्योत तेवती,

ठाऊक मज ती सतेज आहे,

आल्या संकटी भुमीच्या,

तीच आज भड्कुनी पाहे,

धगधगती हि तेजवन्ही,

आज पुन्हा साजुनी आहे,

आज तरी जाग वेड्या,

मातेची हि लाज आहे |

आडोसा....|

अजुनही थकल्या पावलांना,

आडोशाची ओढ आहे,

तु नसशील वेड जिथे परी,

तुझ्यात ते वेडची आहे,

वासनांच्या अंबरात कधी,

श्रमांचा गंधही नाही,

त्याच भरल्या सावल्यांना,

आज तुझाची आधार आहे,

अजूनही थकल्या पावलांना,

आडोशाची ओढ आहे |

विहित जरी सारे,

प्रारब्ध मनीच राहे,

त्या आठव क्षणांचा बाजार,

तोही प्राणी क्षुब्ध आहे,

पाठवणी अन् आठवणी,

क्षणांचाच खेळ आहे,

थकले.... दमले सारेच उसासे,

दिशांचाही भेद नाही,

अशाच उनाड जीवनात या,

का कुणाचा वेध आहे,

अजूनही थकल्या पावलांना,

आडोशाची ओढ आहे |

उरात दडल्या दर्द्भावना,

मनही आक्रंद छंद वाहे,

काळा अन् काळीज कांती,

हा कुणाचा वेश आहे,

मी तरी शोधीत आभाळी,

तैसाच तो धरणीवर आहे,

ऐशा त्या विश्वकर्म्याचा,

प्रवास तरी कोण जाणे,

अशीच वेदना अन् वेद्भावना,

क्षणांचीच रेल आहे,

अजूनही थकल्या पावलांना,

आडोशाची ओढ आहे |

अबोल शब्द...|

अबोल माझा शब्द बावरा,

कैफात कुणाच्या झुरतो रे,

क्षण एकांताचे,

वेडात कुणाच्या ....

कोनामागून फिरतो रे,

हा सृष्टीचा वसंत बरवा,

झुरवा कुणाचा सलतो रे,

अबोल माझा शब्द बावरा,

कैफात कुणाच्या झुरतो रे |

नभी मायेचा धुंद गारवा,

गुज कुणाचे धरतो रे,

कधी सऱ्याहि .... धुंद कोसळती,

मोद कुणाचा ढळतो रे,

मोहात जणु सारी धरती,

... हा हर्ष मानसी उनाड भरतो,

तरीही ... शोक कोण करतो रे,

अबोल माझा शब्द बावरा,

कैफात कुणाच्या झुरतो रे |

क्षुधा मनाची कधी कुणाची,

क्षण अंताचाही भुलतो रे,

लक्ष लक्ष ओठांमधुनी,

क्षण प्रेमाचाही मिळतो रे,

जरी अजाण दुर्लक्षित...

तो वेध कुणाचा स्मरतो रे,

अबोल माझा शब्द बावरा,

कैफात कुणाच्या झुरतो रे |

ते शाश्वत असे काही......|

जिकडे तिकडे तुझा सुवास,

तुझाच आत्मा....

अन् तुझाच प्रवास...

भरकटलेली नाव माझी,

तुच पैल अन् तुच आधार,

पाण्यात कधी तु,

वाऱ्यात कधी तु,

क्षण मातीचा सुगंध तु,

तु न कुणाचा ...

अन् कशाचा उधार,

साऱ्या कणाकणांत ...

सदैव फक्त तुझाच निवास,

जिकडे तिकडे तुझा सुवास,

तुझाच आत्मा ...

अन् तुझाच प्रवास |

रात आंधळी कधी पाहते,

जीवनाचे गोड गुपीत,

दिवस परी डोळी साजरा,

न जाणे ... मनीचे भेद,

कधी काळचे...

उरात उरले असंख्य खेद,

तु मनात असशी,

तु तनात भिनशी,

चेतनता अन् जडही तुच,

... तुझी उणीव कशास नाही,

ना तुला कधी उणीव कशास,

असा जिकडे तिकडे तुझा सुवास,

तुझाच आत्मा ...

अन तुझा प्रवास |

मी...|

मी नाही कुणाचा चाकर,

मी नाही कुणाचा नोकर,

मी वकील देखील नाही,

मी नाही कुणाचा जोकर,

मी नाही सरदार इथला,

नाहीच कुणाचा सैनिक,

मी स्वतंत्रतेच्या स्वतंत्र विश्वात,

फक्त अजान एक बालक |

मी शिकारी देखील नाही,

मी ना कुणाचे सावज,

मी शक्यतोवर लढतो,

म्हणुन म्हणतो स्वतःस सावध,

परंतु मी सेनानी हि नाही,

ना गद्दार कुणाचा चाकर,

मी वैद्य नाही कुठला,

नाही कुणाचा पेशंट,

मी नाही कुणाचा चालक,

अन् न कुणाचा मालक,

मी स्वतंत्रतेच्या स्वतंत्र विश्वात,

फक्त अजान एक बालक |

आळवण ...........|

चोखळली वाट आता,

दुर नको सारू,

आळवली ज्योत आता,

अंधारी नको लोटु,

परमपित्या परमेश्वरा,

तमात मजला नको झोकु,

मान्य मला चुकांचा पसारा,

तितुकाच माझ्या पापांचा विस्तारा,

परी तुच दयेचा आद्य विधाता,

घाल पोटी जानुनी अपराध मुलाचा,

अकारण करुणा तुझीच दयानिधा,

मज हवीच देवा, कारुण्य करा,

मन गुंतते या विश्व पसारी,

मनची करते पुन्हा पुन्हा शिरजोरी,

तुच दिलेस वचन,

स्मरता नाम तुझे,

देशील शक्ती अपारी,

आता हे परमेश्वरा,

आळवतो आहे तुजला श्रीधरा,

ये धावुनी आता,

परास्त करण्या या कलयुगी मना |

नामुष्की.....|

कुणास मौज भासते कशाची,

कुणास मौज वाटते कुणाची,

कोण हसतो...

बघुन आंधळा कोणी,

कोण हसतो,

बघुन पांगळा कोणी,

कोणी आजारास,

कर्म म्हणतो...

कोणी आरंभास ...

अंत म्हणतो ...

तरी .... विश्वाची रचनाच इतकी न्यारी,

की कुणाचे दुःखं...

कुणास जन्माचे सुख भासते,

कशा घडतात कुणाच्या रचना,

कशी घडते कुणाची पंक्ती,

आयुष्य म्हणजे...

जणु एक ... कविताच धुंधली,

न दिसते कुणास ....

न स्मरते कुणास...

तरीही आकंठ नाद...

... हुंकार क्षणास...

मनात अशी भरतच जाते,

सांगते अंतराचे गोड गुपीत कधी,

कधी ... वास्तवाचा विस्तव बनते,

जाळते मऊ आशेचे अंकुर,

वाळवंटाचा निवडुंग बनते,

हळुवार पानांत तिच्या,

मग .... बोचरे काटेच भरते...

न सांगुनही .....

सांगितलेले .... असे ....

क्षणात परी....

अस्तित्वच मग सांगुन जाते,

पारीजातक म्हणता म्हणता,

.... कळतच नाही.....

आयुष्य कधी....

वाळवंटीचा फुफाटा बनते,

क्षणात काही अन् क्षणात काही,

आयुष्य जणु रूप असे बदलुन घेते,

अन् कितीही प्रामाणिक तरी,

बद्फैलीची नामुष्की ,

माझ्यावर अशी येऊन जाते |

मी स्वतःला....|

मी स्वतःला सावरताना,

अवघे विश्व पेलू पाहतो,

मी स्वतःला ओळखताना,

अवघे विश्व ओळखु पाहतो,

घडतात ... भावना जेव्हा...

त्यांचाही ठाव अंतरास,

मी पणास ....

असा कोणासही पुसु पाहतो,

मी स्वतःला सावरताना,

अवघे विश्वच पेलू पाहतो |

धुक्याचे धुसर अनुभव मनाशी,

त्यांची धुसरता .....

क्षणिक मी पुसु पाहतो,

राहतात जखमा ओल्याच कशा या,

कधी .... मलम त्यांसही शोधु पाहतो,

नसतात जिथे अत्तरांच्या कुप्या,

न असतात काही फुलांचे थवे ....

त्या निर्जन स्मशानी...

सुगंध न जाणे कैसा..

मीच तो शोधु पाहतो,

मी स्वतःला सावरताना,

अवघे विश्वच पेलू पाहतो |

घटकाभराची शांतता कुठे,

अविचल मनाची आर्तता जिथे,

अशी काहीशी ....

न वाटणारी पिडा जिथे,

ते इच्छित स्थळ ...

न दिसणारे ... न स्मरणारे,

किंबहुना कधीच नसणारे,

असण्याच्या आवेशी धुंडू पाहतो,

पडुन उठतो उठुन पडतो..

अन् क्षण सांधण्यासाठी ..

मग आयुष्य थोडे,

कारणावाचून उसणे घेतो,

मी स्वतःला सावरताना,

अवघे विश्वच पेलू पाहतो |

अजुन वादळ तर......|

अजुन वादळ तर आलच नाही,

स्वैर सुटला वारा म्हणुनी,

अन् उनाड झाली धरा म्हणुनी,

मिटलीस दारे....

घेतल्या मिटुनी खिडक्या,

चाहुलीत .... अंताच्या....

गार पडल्या नसा ....

तर गड्या ....

अजून पुरती विध्वंस कळा,

तुज दिसलीच नाही,

नुसतेच झाले....

वीजांचे कल्लोळ ...

नभ मात्र .... ओले झालेच नाहीत,

एवढा हरलास आत्ताच ....

अरे वादळ तर अजुन आलंच नाही |

सुर अंतीचे.....|

हे सुर कसे अंतीचे,

आज मी आवळले...

क्षणही भरुनी आसवे,

माझ्यासव गहिवरले,

प्रातः भासली..

धुसर कोवळी ...

परी रात आंधळी...

तयात होती...

जयात पाहिली,

स्वप्नांची पालवी...

ती पथ चकवी ...

रहाट होती...

हे भाग्य अन् ..

नशिब खेळ...

का... कुणास ठाऊक...

कुठून ... कैसे बावरले...

हे सुर कसे अंतीचे,

आज मी आवळले...

क्षणही भरुनी आसवे,

माझ्यासव गहिवरले |

हर एक दिशांत सांडला मधुकंद...

हर एक फुलास मधुर गंध...

पाउलवाटा सजल्या....

फुटली गवतासही ...

अनावर पालवी....

परी क्षणात .... भोवताली....

...दिवे कैसे मालवले...

स्वप्नची झाले भासांचे...

... काळीज अंती कालवले,

हे सुर कसे अंतीचे,

आज मी आवळले...

क्षणही भरुनी आसवे,

माझ्यासव गहिवरले |

ऋतु येतात ... ठाऊक मज,

ऋतु जातात .... ठाऊक मज,

वसंतातली बहार अजुनही .....

श्रावणातच ... बरसली...

आठवण राहिली...

बहराची फक्त....

वास्तवी......

उन्हेच मज आठवली...

हे क्षणांचे किती...

कलह कालवे....

दिवस असे हि घालवले,

हे सुर कसे अंतीचे,

आज मी आवळले...

क्षणही भरुनी आसवे,

माझ्यासव गहिवरले |

ते वेड ...|

ते वेड अजब आहे,

जे काळजास वेडं करू पाहतं,

मखमली पाचुवर....

दवासंगं खेळू पाहतं,

आताशा स्वप्नातही स्वप्नीचं,

अल्लड विश्व कोण जाणे,

कोणास छळू पाहतं...

ते वेड अजब आहे,

जे काळीज वेड करू पाहतं |

जेव्हा भावनांचा पसारा...

समेटून .... अंबरात दडवू पाहतो,

क्षणास आठवणींचे झुंबर...

अन् ...

सभोवताली सहवासाचे अत्तर उधळु पाहतो,

तोच क्षण एक......

सारी भातुकलीच मोडुन जातो,

मग् उरलेल्या मोडलेल्या अस्ताव्यस्त काचा...

विखरलेले .... आभासांचे रंग...

सारं .... एकटक अन् स्तब्ध राहुन पाहतो,

अन् क्षणभर म्हणता म्हणता...

दिवसही सरून जातो...

मग सायेच्या पिवळसर छटांत,

निखळलेलं .... विखरलेलं ते छोटसं जग...

इवल्याशा .... नाजुक मनात....

कुठे आठवण म्हणुन ऱ्हावु पाहतं,

ते वेड अजब आहे,

जे काळजास वेडं करू पाहतं |

आयुष्यवाट भरकटलेली.....|

कुठे कुणाच्या अस्तित्वासाठी

आयुष्यवाट भरकटलेली,

श्वासात कधी तर....

कधी .... आभासांनी मळकटलेली,

प्रभात न माध्यान्ह समयी,

प्रमाद घडतो उनाड जीवनी,

मी शब्दांचा मालिक नाही,

न शब्द माझे बांधील ....

तरीही अतुट बंधन आमुचे,

न कोणाची ..... उणीव,

तो अश्व मनीचा ....

उधळतो कधी मीपणीचा,

ते मीपण ती स्वत्वकडा ....

कधीतरी भेदुनी..... सर्वस्वधरा....

आंतरात्मी मधुकंदाच्या राशी,

कसे शोधावे कुणासाठी...

हि रहाट एकटी...

एकटा प्रवास...

हि पहाट अधुरी ....

अधुरा सुवास...

क्षण कंठाया देखील माझी,

काया अजुन थरथरलेली....

उरास .... किती घडतील त्रास तरी....

वाचा अजुनही सळसळलेली,

कुठे कुणाच्या अस्तित्वासाठी,

आयुष्यवाट भरकटलेली,

श्वासांत कधी तर ...

कधी आसवांनी मळकटलेली |

मौन माझे....|

मौन माझे अंतरंगी,

भिनवेन आता मी,

अबोल शब्द कधीचे,

सलवत देखील...

नेईन आता मी ,

आत अंताचे,

जे शब्द मौनाचे,

जी भीती कंठाची,

सर्वस्व हरण्याची ,

काही संपण्याची ,

ती सोडुन देईन आता मी,

पथ सारे .... क्षणभंगुर,

बेडीच जणु सर्वांगी,

सोडवेन आता मी,

मौन माझे अंतरंगी,

भिनवेन आता मी |

गोड कल्पना ,

शब्दांचे उसासे,

पापण्यांची तडफड,

ओठांची बडबड,

विश्वाची काळजी,

स्वत्वाचा विसर,

विरहाची कुणकुण,

आभासाची वेडी धुन,

सारी विसरेन आता मी,

स्वप्नं सारीच रंगबेरंगी ,

आसवासंगे ....

भिजवेन आता मी,

मौन माझे अंतरंगी,

भिनवेन आता मी |

ती विषाची अंतिम सरीता,

ती रसाची अंतिम घटिका,

ती उपवनीची कृष लतिका,

ती पाठ्वनीची ... रास प्रणिता...

ती असली ती तसली..

मला काहीच कुणाचे,

...न कुणास माझे रंगमनीचे,

राठ .... जड....

भाव कधीचे....

सोडेन आता मी....

उद्याची पहाट ...

उद्याचा रवी...

चांद देखील ....

विसरेन आता मी,

मौन माझे अंतरंगी,

भिनवेन आता मी |

स्वगत ....|

स्वगत माझे लिहिले मी,

व्याकुळ मज अंतरातूनी,

साद आजही माझ्या उरी,

तुझ्या शब्दांची ओढ जरी,

मन छेदुन .... काळीज भेदुन,

तुझा प्रत्येक शब्द..

काळजावरी डागून गेला,

झाला पसारा अवघा जगाचा,

त्राण अंगीचा दुर गेला,

व्याध बनुनी तु तरी का,

सावज मज काळजास केले...

असे किती तीर ...

साधुन अंगी...

नयनही अगदी...

ओथंबुन गेले...

सांगु आज कसे शब्दांतुनी,

रक्ताळलेल्या अंतरामधुनी,

सुर .... व्याकुळ...

व्याकुळ साद...

काळीज अवघे रक्तरंजुन गेले,

पाहिले कधीच तु जरी...

पावलावाचून ....

दुःखं अवघे जीवनी आले,

सांगु तरी कसा मी...

भावगती अवघी ...

स्त्रवली मज अश्रुंतुनी,

स्वगत माझे लिहिले मी,

व्याकुळ मज अंतरातूनी |

कार्य नसे काही .....|

इथे आता अमुचे,

कार्य नसे काही,

दिसते आजही आम्हां,

उगाची स्मशान घाई,

इथे कुणाचेच कधी,

मार्ग नव्हते साधे,

इथे कधीच नव्हती शांती,

शब्दांचेच उसासे,

इथे अंतापर्यंत झगडण्याची,

शर्थ जरी अमुची होती,

खड्ग राहिले हाती,

वीरगती एका दमात आली,

या जगण्यास ऐसा कोणता,

अर्थ उमगत नाही,

इथे आता अमुचे,

कार्य नसे काही |

जितुका आत्मी तळमळलो,

जितुका अंतरी हळहळलो,

तो विषाद मनीचा कधी,

अंतासी भिडलाच नाही,

पाखरांच्या परांस जणु,

आघात ऐसा घडलाच काही,

पंगु झाली आयुधे,

विरली शब्दांची पालवी,

आता राह न कुठली,

न राहिली आशाही काही,

इथे आता अमुचे,

कार्य नसे काही |

कधी असे ...कधी तसे....|

अशी जावू पाहते वेदना उराशी,

जिथे सर्वथा असतो,

हात भावनांचा जराशी,

कधी तोकडे भासते विश्व,

कधी भासती तुडुंब गगने,

किती अंतरासी ...वेडी झळाळी,

पीके शब्द अन् वेगळीच गाणी,

नसे कधी शोध कोठे कुणाचा,

नसे साहित्य न रस सौदर्याचा,

हि भावना .. हि वासना ...

हे काळीज ... हि संकल्पना ...

दुर्बोध सारे .... दुर्बोध वेदना,

... कुठे वाटते पुसावे कुणासी,

कधी वाटते रुसावे कुणासी,

परी अंतरीचा कधी बोध...

नव्हता मनासी...

कधी आसवे...

एकांत समयी ...

कधी गलबला ..

एकांतास मनी ...

अंतरे कधी वाढत जाती...

होती ...धुसर...

कधी मिटुन जाती..

आशा ... वादळापरीस असती,

जिथे आनंद विसरून बसशी,

म्हणुनी मना .... सांगतो,

जणु हे काळीज विनवी,

अशा जगाच्या नको बाळगुस राशी..

जिथे पिडेल कीड अंतरास,

अन् जगावे लागेल होऊन दुभाषी,

कधी लख्तरे ....

कधी अत्तरे....

कधी आसमंत सारा...

झाकोळून बसतो...

तेव्हा अर्थ उमगतो मनाशी...

जगणे घडते...

जणु वाटते असंख्य ...

मधुकंदाच्या राशी,

जशी जाऊ पाहते...

वेदना उराशी ...

जिथे सर्वथा असतो...

हात भावनांचा जराशी |

शंखनाद .....|

होऊनी वज्रासम शस्त्र जणु,

दावुनी अकल्पित अस्त्र जणु,

शब्द माझे...

मर्मासी भिडतील....

छेदुनी सारी अंतरंगे....

रक्तासम.....

रंजित तुषारी ढळतील ...

होऊनी वज्रासम शस्त्र जणु,

शब्द माझे मर्मासी भिडतील |

आजवरी ढळत होती,

आसवांमधुनी .....

चित्कार कुणाची..

अन् कुणाची मुक वेदना,

आजपरी हरएक वेदना,

ओल नयनास परी देणार नाही,

जव तोलुन धरीन अवघी दुःखे,

तव वेचुन घेईन अगणित तृष्णे,

आज बाहु शस्त्राविनही ....

मेघासम गरजतील ...

बरसतील चहूदिशांनी ...

अन् ज्वालामुखीही....

फुटुन आसमंता भिडतील,

अन् होऊनी वज्रासम शस्त्र जणु,

शब्द माझे मर्मासी भिडतील |

आता खैर नाही तयांची,

जयांची स्वत्वे ओलीस ती पडली,

आता खैर नाही तयांची,

जयांनी मातेलाच...

कुंटणखाणी दिधली,

आता होईल...

वर्षाव ज्वालांचा ....

आता होईल ...

वर्षाव उल्कांचा,

शीर झाकण्या आता त्यांना,

न कोणते छप्पर,

अन् ना आश्रय ...

कुणाचे घडतील ...

होऊनी वज्रासम शस्त्र जणु,

शब्द माझे मर्मासी भिडतील |

तो असाच येतो....|

तो असाच येतो अवचित,

घेऊन हजार आठवणींचे ढग,

अन् भासांच काळंकुट्ट आभाळ,

तो घेऊन येतो अशीच,

काळीशार साउली.....

... अस्तित्वावर मखमल अंथरणारी,

तो ... क्षणात सारं सैरभैर करतो...

सावरता सावरता स्वतःला....

मी हि मग ... मला हरवुन बसतो...

अन् समजावे काही तोच...

नभांचाही उर भरतो...

डोळे मिटतात अन्...

तिच्या सहवासातले अनमोल मोती..

टपटप .... सर्वांगावर ढळू लागतात,

मग ... अंगही शहारतं ....

सर्वत्र .... मातीच्या सुगंधात मिसळुन ....

तिचा सहवास रोमरोमास स्पर्श करतो,

डोळे मिटुन मी शांतच असतो...

तोवर ... त्याचेही भान पुरते हरपलेले,

तोही सीमा उल्लंघुन खुप बरसतो....

...तिच्या नसण्याने.....

होणारी काळजाची तडफड,

गडगडून जगास सांगतो...

...तीही पाहत असेल मला...

तीही अनुभवत असेल मला...

म्हणुन विजेची एक अर्जंट तार...

तिच्याकडे भिरकावून देतो....

तो असाच कधीतरी अवचित येतो...

अन् सुन्या अंगणात माझ्या...

आठवनिंचा चिखल करून जातो...

तो असाच येतो...

.... अन् नेहमीच येतो |

सरता दिवस .....|

आज हाही दिवस सरला,

संपली दिवसाची रहाट ...

रवी झुकला पश्चिम दारी,

अन् पाखरांनीही ....

धरली घरट्याची वाट...

.... वृक्ष हलले क्षणभर...

... जणु आळस दिला दिवसाकाठी,

शीण जन्माचा हरदिवशी....

घेती वेलीही .... वळसे देठी,

एक दिन अजून संपला...

एक क्षण अजून जुंपला ....

अन मुक्काम इथला....

अजून एक दिवसाने थिजला...

आज हाही दिवस सरला....

हाही दिवस सरला |

असं हरून जगनं ......|

हे असं हरून जगनं तुला शोभत नाही,

पाडुन खांदे...

मौनात रडनं ...

तुझ्या इमानात हि बसत नाही,

हि वेळ जणु...

आसमंती कष्टाची...

झडण्याची .... झिजण्याची...

अन् यात सोडुन रण ....

... भावणात बुडनं तुला तरी शोभत नाही,

हे असं हरून जगणं तुला शोभतच नाही |

अरे ...सुर्याची कूस भरून,

आभाळाशी .... रण खेळणारा तु,

करून लाखो विस्तवांचा झरा....

आगीशी भिडणारा तु...

तु जगशील उषेच्या अपेक्षी...

मग् माध्यानहि तुज मिळणार नाही...

टळून जातील क्षण...

स्वतःस ढाळण्याचे ....

पैलुसंगे खुलण्याचे...

मग् पश्चातापाविना ,

दुजे काहीच तुज घडणार नाही,

हे असं हरून जगणं,

तुला तरी शोभणार नाही |

आशा......|

उडत रहावे सदाची | उंच नभी क्षणी |

आशा फुलाव्या ज्या | राहिल्या अतृप्त ||

क्षण सावरावे | असे बावरावे |

मलाही नसावी | कल्पना तयाची ||

शब्दांनी माझीया | हे असे फुलावे |

फुल हि नमते | व्हावे तिजपुढे ||

कल्पनांनी साच्या | सोडावा मनाचा |

वेध आसमंता | विहरावा त्यांचा ||

ज्योत नयनांची | अशीच फुलावी |

कुट्ट अंधारीही | प्रकाश करावी ||

करांनी माझीया | असेच झरावे |

मार्ग क्रमताना | ईश्वरा धरावे ||

राम जणु यंत्र | स्मरावा एकची |

अखंड तो मंत्र | सरता आयुष्य ||

देह हा माझाच | नको अहंकार |

चरणी ईश्वरा | तुझ्याच झिजावा ||

परकेपणाचे सुरुंग ....|

तट बांधले बुरुज उभारले,

माणसांनीच माणसांमध्ये,

परकेपनाचे सुरुंग लावले,

शंकेच्या आस्मानी,

संशयाचे धुकेच दाट,

मंतरलेल्या सकाळी....

दिवसभराचे उट्टेच फार.....

माया तुटली......

प्रेम आटले,

थोडी होती आप्त नातलगे...

तेथेही पैसा माणके .....

परस्परांवरी मात करती फाकडे,

अन माणसांनीच माणसांमध्ये,

परकेपनाचे सुरुंग लावले |

सर्द......|

सर्द झाल्या दिशा सभोवताली,

सर्द मीही .... असाच काही,

होतील सर्द उषेचे पंख,

जातील विरून...

नभांचे रंग,

घेतील जणु पांघरून पुन्हा,

निजलेल्या ... त्या धुंद कळ्या,

निपजेल ओठ अलगद कधी,

माझ्या श्वासांची मंद गती,

घेतील ....... उश्वास....

विरहाचे.............

अन् आठवणींचे तळे पुन्हा,

नटेल पिवळसर छटांनी ,

केला अभिषेक तयास,

जणु आभाळीच्या करांनी,

अशा या गुलाबी प्रभाती,

आतुन जे दडपुन राही...

ते शब्द ती तु,

ते तुझे...

सारेच उधळावे ...... अंतराळी,

सर्द झाल्या दिशा सभोवताली,

सर्द मीही .... असाच काही |

शहारणारी .... ती गुलाब कळी,

झोका झोंबणारा वारा देई,

इवलेशे ते ओठ तिचे,

तेही मग दडवुन घेई ...

तिथेच कधी मग,

.......... ओशाळून तो भ्रमर येई,

उठवे तिला जणु,

आर्जव कोणी राजकुमारीस होई,

तीही ... त्या इवल्या ओठांत मग,

हसु काही उगाच आणी,

जणु ठाऊकच नाही लाजणे,

म्हणुनी ..... इतुके का

लाजुन जाई....

कोवळ्या उन्हांत जणु,

पदर प्रीतीचा.......

सांगे तिज काळजास काही,

इतुके सोपे का हे ....

.... खरेच होते न होते

कुण्या काळी ......

सर्द झाल्या दिशा सभोवताली,

सर्द मीही .... असाच काही |

आनंद .............|

आनंदाच्या क्षणी ..... इथवर,

आनंदून इतुके जावे,

आनंदाचे हर्ष फवारे,

अनंतातही .... विरून जावे...

आनंद भाळी घेवूनी फिरावा,

आनंद अंतरी माळुनी बघावा,

आनंद सर्वांगी असा भिनावा,

ध्यास मनासी ......

आनंदाहून दुजा नसावा |

सृष्टीत आनंद,

वृष्टीत आनंद,

वारी भरला गोड सुगंध,

त्याहुनी स्वच्छंद ....

मनीचा आनंद ,

पाणी जैसा .... पुसुनी जावा,

ऐसा आनंद क्षणासी नसावा,

आनंद ...... नभासी भिडावा,

अन् नसानसांतुनी फिरावा,

ध्यास मनासी ......

आनंदाहून दुजा नसावा |

आनंदाच्या अनंत भराऱ्या,

आनंदी या ..... नव्याने घ्याव्या,

आनंदाच्या प्रकोपात कधी,

आत अधरामध्ये उगी,

द्वेष कधी कुणाचा नसावा,

सर्वांग जळते....

ज्या अग्नीमध्ये ,

तो द्वेष, तो मत्सर ....

औषधासहि .......

मुळी न उरावा

ध्यास मनासी ......

आनंदाहून दुजा नसावा |

आयुष्य......|

आयुष्य एक अंधार कोठडी,

दुःखांची वेदनेची,

न सहन होणाऱ्या

... असंख्य यातनांची,

आयुष्य एक अंधार कोठडी,

न संपणाऱ्या संकटांची,

आप्तांच्या विरहाची,

अन् सतत .... रक्तबंबाळ करणाऱ्या,

कुण्या अदृश्य आघांतांची,

आयुष्य एक अंधार कोठडी,

कधी न संपणाऱ्या अंधाराची |

आयुष्य फैर झाडली गोळी,

आयुष्य स्वैर तुटलेली .....

पतंग वेडी,

आयुष्य अंतापर्यंत

आयुष्य म्हणून जगण्याची,

अन् मरतानाही .....

मी मी म्हणत कुजण्याची,

उगाच कुणा नाशिवंत जगासाठी,

आपणहुन झिजण्याची,

आयुष्य एक अंधार कोठडी,

अंधारात मरण्याची |

क्षुद्र भावनांचा सहवास,

क्षुद्र कल्पनांचा विलास,

क्षुद्र अति अंतरातला आवाज,

अन क्षुद्र कुणाशी केलेला

...... मुक्त संवाद......

आयुष्य बंधनांची शृंखला,

आयुष्य आसवांची विद्युलता,

आयुष्य घटकाभर निवारा,

अन् ..... अनंत काळची,

वाळवंटी धरा ........

आयुष्य अन् गोष्ट आयुष्याची,

आयुष्य अन् रोख आयुष्याची,

जितकी निरागस.....

त्याहून खुपच भयाची,

आयुष्य एक अंधार कोठडी,

अंधारात थिजण्याची ....

आयुष्य एक अंधार कोठडी...

आयुष्यभर .....

फक्त मरण्याची ....

फक्त मरण्याची .....|

क्षण .....|

क्षणभर वाटेवर त्या...

क्षणभर मित भाषेवर या,

क्षणभर .... उठतील फवारे,

क्षणभर मनासी उभारे,

क्षण भरत जातील कधीतरी,

क्षण उरत जातील अधांतरी,

क्षणात उदंड भरला मोद,

क्षणांविन अधुरा वाऱ्याचा ओघ,

क्षण .... असेच क्षणभर,

क्षण ..... मनात मनभर,

क्षण बोलुन जातील क्षणाचे,

क्षण तोलुन पाहतील मनाचे,

क्षणात इतुके काही,

क्षणांवाचून जगणे नाही,

क्षणात अवघे विरून जाई,

क्षण जसे अंतरीचे गोंदण राही,

क्षण हेच विश्व...

क्षण हाच आत्मा...

क्षण हिच काया,

क्षण हि अंतरीची माया,

क्षणात क्षणाचे किती मनोरे,

क्षणच लिहिती...

अवघ्या जीवनाचे उतारे |

निरर्थक ......|

इथे शब्दांचा अर्थ कळेना,

इथे आसवांचा पुर अटेना,

इथे वासनांचे किती मळे,

प्रेमाचा अर्थ परी,

कुणासी कळेना,

जगी असुनी वात्सल्य ममता,

मनातुनी धगधगते द्वेष कांता,

थरथरत्या अंतरातुनीहि कधी,

सलसलते दुःखं शमेना,

इथे शब्दांचा अर्थ कळेना,

इथे आसवांचा पुर अटेना |

या अस्वस्थ संसारी,

शुद्ध मायेची खोली,

पापण्यांत असेल माझ्या,

कुठे विरून गेली,

ती ... शुद्ध वेडपणाची छाप,

पुसतो म्हणता....

मुळीच पुसेना,

काळीख अवघी जीवनावरती,

मिरवू म्हणता तीही मिटेना,

इथे शब्दांचा अर्थ कळेना,

इथे आसवांचा पुर अटेना |

दडू म्हणता एकांतात कधी,

नको म्हणता....

उनाड जगास काही,

भाव परी ....अगदी,

स्वच्छ स्फटिक बनती,

मुख अस्मानी उनाड फिरती,

शल्य त्यांचे किती लपविले,

परी भाव मुखीचे तरीही दडेना,

इथे शब्दांचा अर्थ कळेना,

इथे आसवांचा पुर अटेना |

हि चाहूल मज नकोच काही,

हि ... धुंदी अशी,

स्वत्वास माझ्या जाळत जाई,

नको होते..... आता सारे,

तरीही जीव माझा.....

कशात कळेना.....

साऱ्यांवाचुन रिते कितीही,

मनही आता कुठे रमेना,

इथे शब्दांचा अर्थ कळेना,

इथे आसवांचा पुर अटेना |

हि चाहूल मज नकोच काही,

हि ..... धुंदी अशी,

स्वत्वास माझ्या जाळत जाई,

नको होते .... आता सारे....

तरीही जीव माझा...

कशात कळेना...

साऱ्यांवाचुन रिते कितीही,

मनही आता कुठे रमेना,

इथे शब्दांचा अर्थ कळेना,

इथे आसवांचा पुर अटेना |