Niyati - 2 in Marathi Short Stories by Vishal Vilas Burungale books and stories PDF | नियती - 2

Featured Books
Categories
Share

नियती - 2

नियति

भाग - 2

(६)

त्या दिवशीच्या त्या प्रसंगापासुन शिरीष मनीषाला शक्यतो टाळु लागला ...का कुणास ठाऊक पण ... तिच्याशी काय बोलावं यायचं कोडं त्याला पडायचं ... हळुहळु दोघांचं वागणं सुमनच्या लक्षात यायला लागलं ... परंतु असं अचानक काही बोलणं योग्य झालं नसतं म्हणुन तीही काही दिवस अशीच शांत राहिली ... पण किती दिवस ... इकडे मनीषाही दिवसेंदिवस गप्प गप्पच होत चालली होती ... आई दादांनाही कळेना हे नक्की होतंय तरी काय हिला .... शेवटी दादांनी .... सुमनकडे विषय काढलाच .......

“ काय गं सुमन ... या मनिषाचं काय बिनसलंय .... गेला आठवडा झाला बघतोय ... कुणाशी बोलणं नाही ... जेवणाकडे लक्ष नाही ... काय चाललंय तरी काय तिचं .....”

सुमन काहीशी गोंधळूनच......

“ काही नाही ... हो दादा ... परीक्षेचं टेन्शन घेतलं असेल तिनं ... तुम्ही नका काळजी करू ... मी विचारते तिला ... मी बघते तिला काही प्रोब्लेम असेल तर ... तुम्ही नका विचार करू ....”

`“ बरं .... तु विचारतेस ... ठीक आहे... पण पोरी ... जरा जपुन ...तुम्ही जे काही समाजकारण ... राजकारण करता ... ते .. हातभर लांबच ठेवावं माणसानं ... आता तुम्हाला माझ्या वैचारिक बंधनात अडकवनं मला प्रशस्त वाटत नाही म्हणुन ... तुम्हाला हि मोकळीक दिली हो मी.... पण तिचा गैरवापर होईल असं काही करू नका बरे ... स्वतःला सांभाळा अन मग जगाचं बघा .... काय बरोबर आहे की नाही माझं...? ”

“ हो ...हो ...दादा मी घेईन काळजी ”

आता मात्र सुमनचा नाईलाज झाला, तसही तिच्या लक्षात आलचं होतं सारं अन ... मनीषाच्या वागण्यातुन तर काय ... अगदी स्पष्टच होतं ... की नक्की ... काय घडतंय ते ... बराच धीर करून शेवटी तिने ... शिरीषशीच प्रत्यक्ष बोलण्याचा निर्णय घेतला ... कारण हा गुंता सुटणं तसं त्यांच्याच हातात होतं....

एक दिवस लेक्चर संपल्यानंतर शिरीषला थांबण्यास सांगुन ... सुमनने त्याच्यापाशी विषय काढला ......

“ माफ कर शिरीष पण अगदी विषयालाच हात घालतेय ... तु काही गैरसमज करून घेणार नसशील तर तुला एक विचारायचय ....”

“ अरे गैरसमजाचं काय कारण ... तु बोल ना...”

“ नाही तसं नाही रे ....पण गेले आठवडाभर मनीषाचं वागणं फारच विचित्र होत चाललंय ... बाबांनाही काळजी वाटू लागलीय ... ते बोललेही माझ्याशी त्याबाबत अन तुही काहीसा गंभीरच आहेस ... म्हुणुन विचारतेय तुला ... काही झालय का तुमच्यात ... ती एक काही बोलत नाही ... निदान तु तरी.....”

“ अरे तु असं मनाला लावुन घेऊ नकोस अन काळजी तर अजिबात करू नकोस ... खरं तर आज-उद्या मीच बोलणार होतो तुझ्याशी या विषयावर ... पण मनाची तयारी करता करता आज अचानक तुच विषय काढलास ... एका अर्थानं .... बरंच झालं ...

... तु विचारलस ना काय झालय का आमच्यात... तर हो आठवड्यापूर्वीचं ...मनीषाने मला प्रोपोज केलं ....”

“ मग तु काय म्हंटलास ...?”

“ अरे तिथेच तर अडलं ना सारं ... मी तिला काहीच बोललो नाही ... मला फार ओक्वर्ड वाटलं ... काय बोलावं काही सुचेनाच ... आणि म्हणुनच पुन्हा मनीषाचा कॉल देखील रिसीव केला नाही मी ........ खरं तर मलाही समजेना मी असं का वागलो ते अन कदाचित माझ्या अशा वागण्यामुळे .... मनिषा मात्र काही भलताच विचार करत असेल माझ्याबद्दल ... म्हणुनच ... मला तुझ्याशी बोलायचं होतं ....”

“ म्हणजे ... तुला ती आवडत नाही का ? ... का ... आणखी काही कारण ...”

“ नाही गं ... असं काही नाही ... तिच्यासारख्या मुलीला नाही म्हणणारा एखादा मुर्खच असेल पण ... का कुणास ठाऊक पण तिला हो म्हणण्यात मला ... काहीतरी अपराध केल्यासारखं वाटतंय .....”

“ अरे खरंच मनात प्रेम असेल तर अपराधी वाटण्याचं काय कारण.....”

“ तसं नाही गं ... पण तुला ठाऊक आहे ... माझी परिस्थिती कशी आहे ती ... अन हेही ठाऊक आहे की .... अजुन बराच मोठा पल्ला पार करायचाय मला ... त्यामुळे आतोनात कष्ट हे ठरलेलेच आहेत ... अन हि गोष्ट मला वाटतं तुझ्या आई बाबांनाही चांगलीच ठाऊक आहे ... मग एवढं सारं माहित असताना मी जर मनिषाला होय म्हंटल तर ... तुझ्या आई बाबांचा असाच समाज होईल की ... हे समाजकारण ... वगैरे ... असल्या गोष्टी करून मीच मनीषाला लग्नाची फुस लावली ... वगैरे वगैरे .... अन मला नेमकं हेच नको आहे....”

“ अरे वेडा आहेस का शिरीष ... एवढीशी गोष्ट ... अन काय म्हणावं तुम्हांला ... अरे दादांचं म्हणत असशील तर अशी थर्डक्लास विचारसरणी निदान त्यांची तरी नाही ... अन फार अभिमान वाटतो त्यांना तुझा .... अरे प्रत्येक गोष्टीत सारखं तुझंच उदाहरण देत असतात ... काही झालं की ... तो शिरीष बघ कसा वागतो अन तो शिरीष बघ काय करतो .... सारखं तुझंच नाव असतं त्यांच्या तोंडात ......”

“ ते बरोबर आहे पण ....”

“ आता.... पण वगैरे काही नाही .... आधी ... त्या मनिषाला फोन कर ... कधीची रुसुन बसलीय ठमाबाई ... काय रे तुम्ही .... ! ... थांब आता मला अगोदर दादांशीच बोललं पाहिजे.....”

“ नाही पण एवढी काय घाई आहे ....”

“ अरे घाई कशी नाही ... आता कॉलेज संपायला किती दिवस राहिलेत तसही दादा म्हणतच होते .... एवढं कॉलेज संपलं की एक एक भार हलका करून घ्यायचा म्हणुन ....”

“ हो पण ... माझ्या आई बाबांशीही बोललं पाहिजेच की ...’

“ हो हो अगदी बरोबर ... बरं मग मी असं करते दादांनाच तुझ्या आईवडिलांशी बोलायला लावते ... म्हणजे तर काही प्रोब्लेमच नाही ... काय बरोबर की नाही ....’

“ आता काय .. मी नाही म्हणुन तु ऐकणार आहेस थोडीच ...”

“ ओके देन .... मी आजच बोलते दादांशी... ”

अगदी भरभर आभाळ सांडावं तसं सारं काही .... भरभर होत गेलं ... तसा शिरीषच्या मनातील संकोचही सुमनच्या बोलण्याने पार निघुन गेला ... इकडे दादांनाही .... श्रीमंतीपेक्षा ... कर्तबगार जावई मिळणार याचा आनंद ... मनिषा तर काय ... तिला तर आभाळ ठेंगण झालेलं ... अन शिरीषचे आईबाबा त्यांचं काय .. आपली सोयरिक एवढ्या शिकल्या सवरल्या घरात होणार ... अन सुनही ...सुंदर ... शिकलेली ... त्यामुळे नाही म्हणायला जागाच कुठे होती .... अशाप्रकारे सगळ्या गोष्टी भरभर जुळून आल्या .... लगेच मुहूर्तही काढण्यात आला....

(७)

ठरल्याप्रमाणे शिरीष मनिषा दोघांचही लग्न ठरलं अन झालं देखील .... पण तशी सुमन वयाने मोठी ... मग तिच्या अगोदर मनिषाचं लग्न .... दादांनाही थोडं अवघडचं वाटलं ... म्हणुन ते बोलले सुमनशी पण माझं शिक्षण पुर्ण झाल्याशिवाय लग्नाचा विषय काढायचा नाही ... असं अगदी स्पष्टच बजावलं तीने दादांना... त्यामुळे दादांनीही .... विषय जास्त तानला नाही .... अन मोठीच्या अगोदरच छोटीचं उरकलं ...

लग्नानंतर मनिषा जणु लक्ष्मीच्या पावलांनीच .... शिरीषच्या घरात प्रवेश करती झाली ... कारण लग्नानंतर ... एक महीना होतो ना होतो तोच शिरीषचं प्रमोशन झालं .... अन तेही अचानक ... ज्या युनिट मध्ये तो काम करत होता .... त्या संपुर्ण युनिटचा सुपरवायझर म्हणुन .... अर्थात हे घडणार होतं ... कारण शिरीषची कामाविषयीची तगमग .... प्रामाणिकता पाहुन त्याला प्रमोशन द्यायचं हे मॅनेजर साहेबांनी आधीच ठरवलं होतं ... अडथळा होता तो डिग्रीचा ती देखील .... मिळाली ... अन लग्नाचं गिफ्ट म्हणुन जणु प्रमोशनच कंपनीने त्याला दिलं ... आता कंपनीचं क्वाटर देखील मिळालं .... लगेचचं मनीषाच्या आग्रहाखातर .... शिरीषने त्याच्या आईवडिलांनाही इकडेच राहायला बोलावलं मनीषाही जॉब करू लागली त्यामुळे ..... कधी नव्हे ती आर्थिक चणचणीतुन मोकळीक मिळाली .... सारं काही अगदी सुरळीत चाललं होतं .... वर्षभरातच .... दोघांनी अतिशय कष्टाने स्वतःच घर उभारलं .... पुढे चारचाकीही आली .... अगदी सारं काही ठरल्याप्रमाणे घडत होतं ... फक्त एक गोष्ट सोडुन ती म्हणजे ... समाजसेवेचं घेतलेलं व्रत .... ते मात्र हेलकावेच खात होतं .... अन त्यातही आनंदाची गोष्ट म्हणजे .... मनिषा आई होणार होती ..... सारीकडे आनंदी आनंद शिरीषचे आईबाबाही .... खुप खुष होते .... सासु तर सुनेला इकडचा पेला तिकडे करू द्यायची नाही .... काहीच दिवसात मनिषा बाळांतीन झाली .... मुलगा झाला ... सारे खुष .... शिरीषचा आनंदही अगदी गगनात मावेनासा झाला .... दोन्ही आजी आजोबाही फार आनंदात होते .... सारं काही अगदी व्यवस्थित चाललं होतं.

आता .... बाळ काही दोन तीन महिन्यांचाच असेल .... तोच मनीषाला काहीसं इन्फेक्शन झालं .... त्यामुळे डॉक्टरांनी मुलाला काही दिवस तिजपासुन दुर ठेवण्यास सांगितले ..... आता मुलाचं सारं करायचं कोण ? अर्थात सुमन .... पण सुमनचीही परिक्षा जवळ आलेली .... डीग्रीनंतर.. ती सी. ए. करत होती अन आता शेवटचंच वर्ष होतं .... त्यामुळे तिचाही नाईलाज ..... त्यामुळे ही जबाबदारी .... बाळाच्या दोन्ही आजींनी विभागुन घेतली ... अन शेवटी काय ... प्रेम महत्वाचं ... बाकी सारं क्षुल्लक मग कष्टही कसं आनंद देऊन जातं.

(८)

पावसाळ्याचे दिवस होते .... त्यादिवशी सकाळपासुनच .... आभाळ अगदी काळंशार झालं होतं ... गरमिनं नुसती तगमग होत होती जीवाची .... त्यामुळे आता .... फार मोठा पाऊस येणार हे जणु ठरलेलंच ... अन झालंही तसचं .... दुपारनंतर जो काही पाउस आला तो थांबण्याचं नावचं घेईना .... अशातच ... मनीषाला अचानक त्रास होऊ लागला .... घरी दोन म्हातारी माणसं .... त्या दोघींनाही काही सुचेना तेवढ्यात मनीषाच्या आईने शिरीषला फोन केला .... मनीषाला फारच त्रास होऊ लागलाय हे कळताच शिरीषही तडक निघाला काही वेळातच तो घरी पोहोचला .... लगेच मनीषाला गाडीत घातलं अन हॉस्पिटलकडे निघाले ..... आता मनिषाबरोबर कोणीतरी हवं म्हणुन शिरीषची आईही बरोबर आली .... तोपर्यंत शिरीषचे वडीलही घरी पोहोचले होते .... तेही त्यांच्यासोबत निघाले .... इकडे मनीषाची आई ... अन बाळ दोघेच घरात होते .... तोपर्यंत .... सुमनला अन बाबांनाही फोन करून खबर करण्यात आली .... त्यांनी परस्पर हॉस्पिटल मध्ये जायचं ठरवलं ... अन तसं ते पोहोचलेही ... पण तास झाला दोन तास झाले तरी कोणाचाच कोणाला पत्ता नाही ... बाबा काळजीत होते ... सुमनही दोघांचेही फोन ट्राय करत होती ... पण ना शिरीषचा फोन लागत होता ना मनीषाचा ... काहीच कळायला मार्ग नव्हता पुन्हा घरी फोन केला तर ... ते घरीही आले नव्हते सारेच चिंतेत, कोणाला काहीच सुचेना ..... एवढ्यात .. सुमनचा फोन वाजला अनोळखी नंबर होता .... फोन उचलला .....

“ हॅलो ... कोण...?”

“ हॅलो ..... पोलीस ...... मॅडम ..... आपल्याला थोडं विचारायचं होतं .....”

“ हो सॉरी पण इथे एक अपघात झालेला आहे अन अपघातात सापडलेल्या इसमाजवळ आपला नंबर सापडला ... त्याचं आय. डी. ही आहे आमच्याकडे ... शिरीष जाधव नाव त्याचं ... आपण ओळखता त्यांना .....”

अचानक पायाखालची जमीनच सरकावी त्याप्रमाणे .... सुमन क्षणभर सुन्न झाली ... बाबा शेजारी बसलेले ....

“ अगं सुमन कोणाचा फोन होता .... काय कळलं का कुठे आहेत सारे ते .........”

सुमनने स्वतःला कसेतरी सावरले ... अन अपघाताबद्दल .... बाबांना सांगितले .... बाबांनाही धक्का बसला .... तशातही स्वतःला सावरत पुन्हा त्याच नंबरवरती फोन करून .... नक्की ... कुठे अपघात झालाय हे नक्की माहित करून घेतलं ... अन दोघेही तडक तिथे पोहोचले ... तोपर्यंत साऱ्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवले होते ... ते तडक तिथे पोहोचले खरे .... पण ... तोपर्यंत फारच उशिर झाला होता .... अपघात एवढा भयंकर होता की .... चौघांपैकी एकही जण वाचु शकला नाही ....

संसारी जीवनात नियती कुठे अन कशी झडप घालील काही काही सांगता येत नाही ... सारे होत्याचे नव्हते करायला ... तिला फक्त एक क्षण पुरेसा असतो ... अन नेमकं हेच केलं होतं तिने .... एका झडपेतच ... सारं कुटुंबच ... तिच्या अधाशी पोटात तिनं सामावुन घेतलं होतं ....

सुमन अगदीच .... सुन्न झाली ... रडावं का हसावं ... काहीच कळेनासं झालं... अन त्या दिवसापासुन तिचे अश्रु सुकले ... ते कायमचेच .... अगदी कायमचे.......

(९)

अचानक झालेल्या आघाताने ... केवळ सुमनच कोसळली असं नाही ... आईनेही अगदी अंथरून पकडलं ... आता या तान्ह्या बाळाचं काय ... तिच्या डोक्यात ... सारखं हेच ... दादा मात्र ... तिला धिर द्यायला म्हणुन सारखं म्हणायचे .....

“ बाळाचं काय होणार .... बाळाचं काय होणार .... सारखं एकच रडगाणं ... अरे काय होणार म्हणजे .... आपण नाही का त्याला ... अनाथ का आहे तो ... माझ्या जीवात जीव असेपर्यंत ... त्याच्यासाठी विव्हळलेलं मला चालायचं नाही .... आधीच सांगतोय .....”

.... दादा कितीही म्हटले तरी सुमनच्याही लक्षात येत होतं की नक्की कोणती काळजी त्यांना सतावतेय ती ...

तसं आता बाळाचं सारं काही तिच्याच अंगावर पडलं होतं..... न मागताही .... मातृत्व ... नियतीनं तिच्या कुशीत टाकलं होतं अन तिनंही ते आनंदानं स्वीकारलं होतं .... पण ... पण त्या आनंदालाही ... दुःखाची एक गडद किनार होती .... सुमनणे सी. ए. करण्याचा निर्णय घेतला .... तो खरतरं केवळ शिकण्यासाठी म्हणुन नाही तसं बाबा सांगत होते त्याप्रमाणे तिच्या शिकण्याला कुठेही अडथळा होणार नाही .... अशी स्थळ तिला येत होतीच की .... पण ती मात्र लग्न न करण्यावर ठाम राहिली .... कारण .... कारण तिच्या जीवनाचा कच्चा-चिठ्ठा तिला अगोदरच कळला होता .... आपलं आयुष्य किती ? हे देखील ..... तिला चांगलच ठाऊक होतं ... कारण एका लेकीच्या जाण्यानं आईनं अंथरून धरलेलं ... मग दुसऱ्या लेकीच्या मरणाच्या वार्तेने ... तिचं मरण कितीसं दुर राहिल असतं ... हे कळण्याइतपत ती नक्कीच सुज्ञ होती.

आता तिच्या आयुष्याची ध्येयं अगदी स्पष्ट अन अगदीच सिमित होती .... कारण तसही तिच्याकडे जास्त दिवस होते कुठे ?...

तशातही सुमनने तिचं सी. ए. पुर्ण केलं ... लगेच एका नामांकित कंपनीत मोठ्या हुद्द्याची नोकरीही मिळाली .... आता ... लहानग्या निखिलची ती मावशी नव्हतीच मुळी ती तर आता .... आई झाली होती ... अन आता सुमनची आईही अगदीच थकुन गेली होती.

मोठ्या हिमतीनं सुमनने ..... मुल अन नोकरी स्वतःच आजारपण सांभाळून तडीस नेलं .... अन सारं स्थिर स्थावर केलं ... दादांनाही वी. आर. एस. घ्यायला लावली .... अन हवापालट म्हणुन आई दादा दोघंही गावी राहायला गेले............

(१०)

इतक्या दिवसानंतर अचानक सुमन .... सारं काही आठवत होती ... आयुष्याची बेरीज वजाबाकी कुठे चुक ... कुठे बरोबर शोधत होती .... कारण ... नियतीने तिचा शेवटचा फासा फेकला होता .... कारण गेल्याच आठवड्यात ..... मरणाचं अल्टीमेटम तिच्या हातात पडलं होतं .... आता तिच्याकडे होते ते फक्त चार महिने .... हार्डली चार महिने ... तसं निखिलच्या भविष्याची सारी तरतूद तिने केली होती .... त्याच्या शिक्षणाचा अन एकंदरीत साऱ्याच गोष्टींचा त्याला बोझ होणार नाही असं सारं काही तिनं ... पाहिलं होतं ... पण हे झालं पैशाचं .... पण आयुष्य केवळ पैशावर जगता येतं असं थोडीच आहे ... त्यासाठी भावना हव्या असतात .... आपल्या कोणीतरी .... आपल्यासाठी विणलेल्या ... त्या भावनांची उब तीच तर खऱ्या अर्थाने .... मानवाचं आयुष्य फुलवत असते ...त्याला जोमाने वाढण्याची उर्मी देत असते ... पण ... हे सारं ... त्या चिमुरड्या निखिलच्या आयुष्यात नाही अन .... कधीही नसणार ....

पण सुमनही .... लाचार होती ... वाटत असुनही .... जीवनाचं दान तिला मिळणार नव्हतं... अन ..... निखिलच्या आयुष्यावरचं उन पेलण्याइतकं तिचं छत्रही विस्तारनं शक्य नव्हतं ...शक्य नाही ......

सुमन विचार करत होती ... अन फक्त विचारच करत होती .... तिच्या दृष्टीने तिनं करण्यासारखं .... आता सारचं केलं होतं .... आता ... आता काय अश्रुंची ओली कड सावरत उरलेले दिवस ... ओठांची कोर साधत ... जगायचे ... किंवा ढकलायचे ... एवढंच .... एवढंच तिच्या हातात होतं......

*** समाप्त ***