Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.
#KAVYOTSAV -2
बजेट.....
निळ्याशार आभाळात नुकतेच ढग दाटले होते,
पाऊस खूप होणार यंदा, बापाला माझ्या वाटले होते,
बापाला नव्हतं माहिती की नशिबात काय वाढलं होतं,
हिम्मत करून पुन्हा एकदा वर्षाचं बजेट काढलं होतं.....
गेल्यावर्षी खत कमी पडलं,या वर्षी जरा जास्त टाकू,
बाप म्हणे यंदा आपण जिवापल्याड
शेत राखू,
सावकाराकडून कर्ज काढून अन्यायाला निमंत्रण धाडलं होतं,
हिम्मत करून पुन्हा एकदा वर्षाचं बजेट काढलं होतं...
सरता सरत दिवस गेले 7 जून ही तारीख आली,
जोरदार पावसाने हजेरी लावून,काळी आई ओली केली,
सगळ्यागत बापानं माझ्या आज वावर पेरलं होतं,
हिम्मत करून पुन्हा एकदा वर्षाचं बजेट काढलं होतं...
आज बापासोबत मी पण गेलो, शिवार सारं नटलं होतं,
बाप पण जाम खुश जणू, सारं त्याला भेटलं होतं.
पालवी नवीन बघून बापाला स्फुरण नवं चढलं होतं
हिम्मत करून पुन्हा एकदा वर्षाचं बजेट काढलं होतं.
रोज रोज पीक बघून बापाला हिम्मत नवी आली होती
निसर्गानं मात्र आता कमाल सुरू केली होती,
महिना झाला पाण्याचं एक शितुड देखील पडलं नव्हतं
हिम्मत करून पुन्हा एकदा वर्षाचं बजेट काढलं होतं.
थोड्या दिवसात रूप पालटलं, होत्याचं नव्हतं झालं
हिरवगार शिवार आता स्मशानागत झालं,
निसर्गाच्या मनात यंदा रहस्य नवं दडलं होतं
हिम्मत करून पुन्हा एकदा वर्षाचं बजेट काढलं होतं.
दिवसागणिक बाप माझा शेत बघून खचत होता
डोक्याला हात लावलेला बाबा,पुन्हा मला दिसत होता.
काळजावरील काळजीचं सावट आणखी पुन्हा वाढलं होतं.
हिम्मत करून पुन्हा एकदा वर्षाचं बजेट काढलं होतं.
दिवाळीला सारा गाव नव्या जल्लोषात न्हात होता
बाप माझा हताशपणे एकटक पाहत होता
लाचार त्या चेहऱ्यानं काळीज माझं फाडलं होतं
हिम्मत करून पुन्हा एकदा वर्षाचं बजेट काढलं होतं.
आज बाबा खूप दिवसांनी मोकळं मोकळं बोलला होता
मला नव्हतं माहिती तो कायमचा सोडून चालला होता
शेतात जाऊन येतो बोलला पिकात जीव गुतलाय माझा
एवढं बोलून बापानं माझ्या सगळ्यांची घेतली रजा,
खूप वेळानं लक्षात आलं,घरातला दोर सापडत नव्हता
नेमका त्याच वेळी बाप माझा हरवलेल्या दोराशी झगडत होता
‘ शेतकऱ्याचा बळी ' मध्ये बापाचं नाव पडलं होतं
आज मात्र माझ्या बापाचं काढलेलं बजेट मोडलं होतं
मंगेश हिवाळे