संपूर्ण बाळकराम

(22)
  • 118.2k
  • 63
  • 44.7k

वसंत ऋतूत आपल्या सृष्टीमध्यें केवढाले फेरफार घडून येतात हे नव्याने कशाला सांगावयाला पाहिजे? झाडांना पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो, वेलींना फुले येतात, ठिकठिकाणच्या वक्त्यांना शब्द फुटतात, पांढर्‍या सशांना पोरे होतात, मेंढयावरची लोकर कातरतात, कोकिळेला कंठ फुटतो, छत्र्यांवर नवे अभे्र चढतात, शहरबाजारांतून खेडेगांवच्या पाहुण्यांना ऊत येतो, मोराला नवा पिसारा फुटतो, कुत्र्यांना लूत लागते, तोरणा-करवंदांचे पेव फुटते, कलिंगडे विकावयास येतात, वगैरे हजारो घडामोडींनी चराचरसृष्टी अगदी गजबजून जाते. या चमत्कारसृष्टीतच आणखी एका चमत्कारमय फेरफाराची गणना करावयास पाहिजे. वसंतोत्सवाच्या सुमारास अनेक फेरफारांप्रमाणेच नवर्‍या मुलांची व त्यांच्या आईबापांची माथी फिरत असतात! पिसाळलेले कुत्रे चावलेला मनुष्य ज्याप्रमाणे आंगोठीच्या मेघांचा गडगडाट ऐकताच पुन्हा पिसाळतो, त्याप्रमाणेच मुंजीच्या वाजंत्र्यांचा कडकडाट कानी पडताच 'उपवधू' मुलांच्या व त्यांच्या वाडवडिलांच्या अंगी भिनलेले अहंपणाचे विषही तडाक्यासरशी उचल खात असते. क्षणार्धात त्यांना आपल्या स्थितीचा, आपल्या किमतीचा, आपल्या योग्यतेचा, किंबहुना आपल्या स्वत:चाही विसर पडून ते अंकगणिताचे पुस्तक रचणार्‍या संख्या-पंडिताप्रमाणे सरसहा मोठमोठाल्या रकमा बडबडू लागतात, आणि बिचार्‍या मुलीच्या बापांना ही अवघड उदाहरणे सोडवावी लागतात. ईश्वराच्या दयेने मला स्वत:ला मुलगी नाही! परंतु काही स्नेह्यासोबत्यांबरोबर करमणुकीखातर खेटे घालून या बाबतीत मी जो अनुभव मिळविला आहे, त्याचा फायदा मी उदार बुध्दीने वाचकांना देण्याचे योजिले आहे.

Full Novel

1

संपूर्ण बाळकराम - 1

वसंत ऋतूत आपल्या सृष्टीमध्यें केवढाले फेरफार घडून येतात हे नव्याने कशाला सांगावयाला पाहिजे? झाडांना पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो, फुले येतात, ठिकठिकाणच्या वक्त्यांना शब्द फुटतात, पांढर्‍या सशांना पोरे होतात, मेंढयावरची लोकर कातरतात, कोकिळेला कंठ फुटतो, छत्र्यांवर नवे अभे्र चढतात, शहरबाजारांतून खेडेगांवच्या पाहुण्यांना ऊत येतो, मोराला नवा पिसारा फुटतो, कुत्र्यांना लूत लागते, तोरणा-करवंदांचे पेव फुटते, कलिंगडे विकावयास येतात, वगैरे हजारो घडामोडींनी चराचरसृष्टी अगदी गजबजून जाते. या चमत्कारसृष्टीतच आणखी एका चमत्कारमय फेरफाराची गणना करावयास पाहिजे. वसंतोत्सवाच्या सुमारास अनेक फेरफारांप्रमाणेच नवर्‍या मुलांची व त्यांच्या आईबापांची माथी फिरत असतात! पिसाळलेले कुत्रे चावलेला मनुष्य ज्याप्रमाणे आंगोठीच्या मेघांचा गडगडाट ऐकताच पुन्हा पिसाळतो, त्याप्रमाणेच मुंजीच्या वाजंत्र्यांचा कडकडाट कानी पडताच 'उपवधू' मुलांच्या व त्यांच्या वाडवडिलांच्या अंगी भिनलेले अहंपणाचे विषही तडाक्यासरशी उचल खात असते. क्षणार्धात त्यांना आपल्या स्थितीचा, आपल्या किमतीचा, आपल्या योग्यतेचा, किंबहुना आपल्या स्वत:चाही विसर पडून ते अंकगणिताचे पुस्तक रचणार्‍या संख्या-पंडिताप्रमाणे सरसहा मोठमोठाल्या रकमा बडबडू लागतात, आणि बिचार्‍या मुलीच्या बापांना ही अवघड उदाहरणे सोडवावी लागतात. ईश्वराच्या दयेने मला स्वत:ला मुलगी नाही! परंतु काही स्नेह्यासोबत्यांबरोबर करमणुकीखातर खेटे घालून या बाबतीत मी जो अनुभव मिळविला आहे, त्याचा फायदा मी उदार बुध्दीने वाचकांना देण्याचे योजिले आहे. ...Read More

2

संपूर्ण बाळकराम - 2

लग्नाच्या मोहिमेची पूर्वतयारी वर शोधाया जाण्यापूर्वी किती तयारी लागे - बाळकराम कोणत्याही महत्कार्याला सुरुवात करण्यापूर्वी त्याची आधी किती तरी तयारी करावी याचे थोडक्यात चटकदार वर्णन शिरोभागी दिलेल्या अर्ध्या साकीत कवीने दिलेलेच आहे! परीक्षेचे कागद तीन तासांत चट्दिशी लिहून काढण्यासाठी आलेला उमेदवार आधी वर्षभर पूर्वतयारी करीत असतो. एखाद्या दिवशी सकाळी पेढीच्या दारांवर दिवाळे फुकट मोकळे झाल्याची नोटीस अचानक लावणार्‍या पेढीवाल्या भागीदारांना चार-चार महिने आधी खलबते करावी लागतात. त्याचप्रमाणे माझे मित्र तिंबूनाना यांच्या ठकीसाठी नवरामुलगा शोधण्यासाठी पुण्यास येऊन ठेपण्यापूर्वी आम्हाला आधी किती पूर्वतयारी करावी लागली, याची वाचकांना या लेखात थोडक्यात माहिती करून देण्याचे योजिले आहे. ...Read More

3

संपूर्ण बाळकराम - 3

आता एकच विचार, कोणी नवरा त्याशी समर्पू म्हणे। मानवी बुध्दीच्या आटोक्यात येणार्‍या कोणत्याही विषयाच्या ज्ञानाची, सामान्यत: तात्त्वि (Theoretical) व व्यावहारिक अशी दोन अंगे असतात. यापैकी कोणत्याही एकाचाच परिचय होऊन भागत नाही. त्यापैकी कोणतेही एक दुसर्‍यावाचून भटकताना दिसले, म्हणजे विरहावस्थेतील प्रणयीजनाप्रमाणे बेवकूब ठरून ते उपहासाला पात्र होते. पहिल्याला 'पुस्तकी विद्या' हे नाव मिळून दुसर्‍याची आडमुठेपणात जमा होते. 'बारीक तांदूळ तितके चांगले' हे पुस्तकी सूत्र पाठ म्हणणारा पक्वपंडित व्यावहारिक ज्ञानाच्या अभावी, बारकातले बारीक तांदूळ म्हणून कण्याच घेऊन घरी येतो! पोहण्याच्या पुस्तकातील नियम हृदयात साठवून, समोर मोठया मेजावर ठेवलेल्या बशीभर पाण्यातल्या बेडकाबरहुकूम हातपाय पाखडणारा तितीर्षु बारा वर्षे असे अध्ययन करूनही शेवटी स्नान करताना झोक जाऊन बालडीभर पाण्यात बुडून मेल्यास नवल नाही! चोवीस वर्षाच्या एका नवरदेवाऐवजी बारबारा वर्षाचे दोन विचवे चालतील किंवा नाही, ही शंका काढणारे डोकेही केवळ एकांगी ज्ञानानेच एकीकडे कलते झाले असले पाहिजे. ...Read More

4

संपूर्ण बाळकराम - 4

प्रस्तुत लेखाचा मथळा वाचून लगेच लेखकाच्या नावावर नजर टाकताच माझ्या सार्‍या वाचकभगिनी एकदम थबकतील, आणि मला स्वयंपाकघरातून हाकलून लावण्याचा करू लागतील! माझ्या भगिनीवर्गाने आपल्या या गरीब भावंडावर अशी आग पाखडण्यापूर्वी पुढील चार शब्द वाचून पाहण्याची कृपा करावी. माझ्या सुशिक्षित भगिनीजनांच्या विचारशीलतेची मला खात्री असल्यामुळे, या शब्दाकडे त्यांचे रागावलोकन होणार नाही, अशी मला पूर्ण उमेद आहे. बाकी एखाद्या निरक्षर बाईने मात्र हे चार शब्द वाचण्याची तसदी घेतली असती किंवा नाही, याची शंकाच आहे! बहुधा पहिल्या दोन ओळींवरच नजर फेकून तिने माझा लेख चुलीत टाकला असता, आणि तापलेल्या कालथ्याच्या किंवा जळत्या कोलिताच्या साहाय्याने मला स्वयंपाकघरातून पिटाळून लावले असते. यद्यपि प्रत्येक समाजाने आपापल्या परीने स्त्री-पुरुषांसाठी भिन्नभिन्न कामे नेमून दिली आहेत तथापि प्रसंगविशेषी एका मनुष्यभेदाच्या प्राण्याला दुसर्‍याचे हक्क घेण्यापुरती सवलत देण्यात येते. ...Read More

5

संपूर्ण बाळकराम - 5

या जगतीतलावर अखिल मानवजातीच्या सुखसमाधानाची जी जी साधने आहेत, त्या सर्वात काव्याला सर्व राष्ट्रांनी, सर्व धर्मांनी आणि सर्व जातींनी अग्रस्थान दिलेले आहे. काव्यात राष्ट्राचे बुध्दिवैभव आणि कर्तृत्वशक्ती इतिहास आणि संस्कृती, विकारोत्कर्ष आणि नीतिमत्ता, अशी जोडपी एकाच वेळी विहरत असल्यामुळे राष्ट्राचे सर्वस्व त्याच्या काव्यात प्रतिबिंब होत असते. ज्यांना लिपी नाही, अशी राष्ट्रे थोडीबहुत सापडतील परंतु लौकिक काव्याविरहित राष्ट्र कधीही सापडणार नाही. लेखनकलेच्या अभावी इलियडसारखी महाकाव्ये कैक पिढयांपर्यंत नुसती जिभेच्या शेंडयावर नाचत आली होती. कवितेचा व राष्ट्रोत्कर्षाचा परस्परांशी निकट संबंध आहे. कवितेने वीरांना आणि प्रणयीजनांना उत्साह दिला आहे, आणि वीरांनी व प्रणयीजनांनी कवितेला विषयांचा पुरवठा केला आहे सुंदर स्त्रियांना चढवून ठेविले आहे. कवितेने किती तरी लोकांना शुध्द वेडे केले आहे, तर शुध्द वेडयांनी किती तरी कविता केल्या आहेत! आणि म्हणूनच या महत्त्वाच्या विषयावर चार शब्द लिहिण्याचा आज मी प्रयत्न करून पाहणार आहे. ...Read More

6

संपूर्ण बाळकराम - 6

नाटकाच्या धंद्यात मोरावळयाप्रमाणे मुरलेल्या माझ्या एका सन्मान्य मित्राने मराठी नाटयविदृक्षु लोकांस 'नाटक कसे पाहावे?' हे सांगण्याचा यत्न केला आहे. गृहस्थ भावी मराठी लेखकांना 'नाटक कसे लिहावे?' याविषयी काही धडे देणार आहेत असे माझ्या कानावर आले आहे. त्यावरून सदरहू विषयासंबंधीचे माझे विचार मी सध्या प्रसिध्द करीत आहे. वर सांगितलेल्या गृहस्थास किंवा या विषयावर लिहू इच्छिणार्या दुसर्या कोणासही माझ्या या विचारांचा मनमुराद फायदा घेता यावा म्हणून मी मुद्दाम या विचारांचे 1837 च्या 25 व्या आक्टान्वये सर्व हक्क राखून ठेविले नाहीत! नाटक लिहू इच्छिणार्या भावी तरुणास तर हा लेख फारच उपयोगी आहे. यातील सूचनांच्या योग्य विचाराने जे नाटक लिहिले जाईल ते सध्याच्या नाटकग्रंथांच्या मालिकेत बसावयास पात्र झाल्याखेरीज राहणार नाही. ...Read More

7

संपूर्ण बाळकराम - 7

ईशस्तुतीला सुरुवात करण्यापूर्वी वास्तविक पाहता नाटयकथानक (Plot) वगैरे काही गोष्टींचा विचार करावयास पाहिजे होता पण मागील खेपेस वचन चुकल्यामुळे 'ईशस्तुती'पासूनच सुरुवात करणे भाग पडत आहे. म्हणून कथानक वगैरेंचा विचार मागाहून होईल. ...Read More

8

संपूर्ण बाळकराम - 8

प्रस्तावनेच्या इतर बाजूप्रस्तावनेच्या इतर बाजूप्रस्तावनेच्या इतर बाजू जिल्हानिहाय गौरकाय अधिकारी, जिल्ह्यांच्या विस्तृत पटांगणात कलेक्टर, मॅजिस्ट्रेट व प्रसंगी पोलिटिकल एजंट तीन निरनिराळया रूपांनी वावरत असतो त्याचप्रमाणे बार्शी लाइट रेल्वेचा अर्धगौर गार्ड, गाडी चालत असेपर्यंत गार्ड, स्टेशनवर उभी राहावयाचे बेतात असताना उतारूंजवळ तिकिटे घेणारा तिकिट कलेक्टर, गाडी उभी असेपर्यंत स्टेशनावर झपाटयाने येरझारा घालणारा स्टेशनमास्तर व शेवटी गाडी सुटावयाचे वेळी बावटा दाखविणारा पोर्टर, हे चार निरनिराळे हुद्दे सांभाळून असतो. सकृद्दर्शनी यांची कर्तबगारी मोठीशी वाटते खरी परंतु नाटयसृष्टीमधील गौरमुख सूत्रधार त्याच्या उज्ज्वलतेस काळिमा लविल्याखेरीज राहणार नाही. हा प्राणी प्रस्तावनेच्या आकुंचित जागेतच पाच निरनिराळया नात्यांनी वावरत असतो. बोलण्याच्या भरात कोणतीही गोष्ट सहज विसरणारा अजागळ, घरांतील सर्व भानगडींबद्दल बेदरकार राहून हमेशा नाटकांच्या जाहिराती ठोकणारा लोकरंजनाचा मक्तेदार, ग्रंथकार व नट यांच्याबद्दल देवाजवळ व प्रेक्षकांजवळ वकिली करणारा स्वयंसेवक, एका सदैव उपवर पोरीचा दैववादी बाप व नाटकांचा तिटकारा करणार्या एका हट्टवादी बायकोचा निश्चयी नवरा, ही सूत्रधाराची पाच अंगे आहेत. यथाछंद यांचा थोडथोडा विचार करू. ...Read More

9

संपूर्ण बाळकराम - 9

छोट्या जगूचा 'रिपोर्ट' धाकटा जगू कळू लागल्यापासून एका नाटक मंडळीतच होता. एकदा मंडळीच्या मालकाबरोबर एक लग्नसमारंभ पाहून आल्यावर त्याने आपल्या मित्रांना खाली लिहिल्याप्रमाणे 'रिपोर्ट' दिला- खेळ मुद्दाम बांधिलेल्या मांडवात झाला. स्टेज मातीचेच केले होते आणि फारच लहान होते. 'सीन' जंगलाचा होता असे वाटते पण जंगलाच्या 'झालरी' मुळीच नव्हत्या म्हणून त्याच्याबद्दल स्टेजवर झाडांचा पालाच बांधला होता. पडदे स्टेजच्या भोवती न बांधता सगळया थिएटरभोवती गुंडाळले होते. खेळाचे 'पास' फुकट वाटले होते. खुरच्याबिर्च्या काहीच नव्हत्या. सगळयांना जाजमावरच बसावे लागले. 'कुलीन' स्त्रियांसाठी स्टेजच्या आजूबाजूस जागा राखून ठेविली होती पण गर्दी फार झाल्यामुळे त्यांना उभ्याने सगळा खेळ पहावा लागला. वेश्यांसाठी जागा मुळीच ठेवली नव्हती आणि त्या आल्याही नव्हत्या. मॅनेजर लोकच पानविडीतंबाखू घेऊन ऑडिअन्समध्ये फिरत होते. ...Read More

10

संपूर्ण बाळकराम - 10

पूर्वार्ध काही वर्षांपूर्वी 'केसरी' पत्रात एका पुस्तकाबद्दल विनोदात्मक, परंतु मनन करण्यासारखा अभिप्राय आला होता. त्या पुस्तकाचे नाव 'जेवावे कसे' हे केसरीकारांनी त्या पुस्तकाच्या बरेवाईटपणाकडे फारसे लक्ष न देता त्याच्या अकालदर्शनाबद्दल मात्र अभिप्राय दिला होता. सध्या लोकांपुढे 'जेवावे कसे' हा प्रश्न नसून 'जेवावयाचे मिळवावे कसे' हा आहे. अशा आधाराने केसरीकारांनी त्या पुस्तकाच्या अप्रयोजकतेचा उल्लेख केला होता. कधी कधी अनुभवी मनुष्याकडून वरील लेखकाप्रमाणे मौजेच्या चुका घडून येतात. 'रंगभूमी'च्या संपादकांनी 'ग्रंथसार' या नात्याने हीच चूक केली आहे. 'नाटक कसे पाहावे?' या प्रश्नाचा ऊहापोह करण्यासाठी त्यांनी सबंध एक पुस्तक लिहिण्याचे श्रम घेतले आहेत पण दिलगिरीची गोष्ट आहे की, त्यांनी या प्रश्नाची केवळ उत्तरार्धाचीच बाजू घेतली आहे आणि मूळ महत्त्वाची बाजू तशीच ठेविली आहे. ...Read More

11

संपूर्ण बाळकराम - 11

(स्थळ : विक्रांताच्या घरातील माजघर. पात्रे: ठमाबाई, उमाबाई, भामाबाई, चिमाबाई वगैरे बायका व आवडी, बगडी वगैरे परकर्‍या पोरी, बाळंतपदर व पिवळीफिक्कट अशी विक्रांताची आई, मध्यंतरी टांगलेला पाळणा पाळण्यात बारा दिवसांचा विक्रांत.) सर्व बायका : पद - (चाल- हजारो वर्षे चालत आलेलीच.) गोविंद घ्या कुणी। गोपाळ घ्या कुणी। गोविंद घ्या कुणी। गोपाळ घ्या कुणी। ('नाही मी बोलत नाथा' हा चरण जितके वेळा म्हणण्याचा साधारणपणे प्रघात आहे तितके वेळा हेच एकसारखे, प्रेक्षकांस कंटाळा येईपर्यंत घोळून म्हणतात.) ...Read More

12

संपूर्ण बाळकराम - 12

(स्थळ: घरासमोरील अंगण. वेळ- चांदण्या रात्रीचा पहिला प्रहर. पात्रे: भोकाड पसरून रडणारा आठ-दहा महिन्यांचा बाबू. बाबूची समजूत घालीत असलेले वडील- तर्कालंकारचूडामणी प्रोफेसर कोटिबुध्दे.) प्रा. कोटिबुध्दे : (गंभीर वाणीने) बाबू, रडू नकोस! रडण्याने स्वत: रडणाराला काहीच फलप्राप्ती होत नसून, आसमंतात्भागी वास्तव्य करणाराला- म्हणजे निकटतरवर्ती जनसमुदायाला मात्र कर्णकर्कश रुदनध्वनीपासून महत्तम त्रास होण्याचा संभव असतो. किंबहुना खात्री असते, असेही म्हटले असता अतिशयोक्ती होणार नाही. ...Read More

13

संपूर्ण बाळकराम - 13

(दामू कोशांतून शब्द काढीत आहे एका बाजूला दिनू भूगोल घोकीत आहे प्रत्येकाजवळ पुस्तके व वह्या पडल्या आहेत जवळच कपडे पडले आहेत.) दामू : (डिक्शनरीत पाहतो) एफ ए बी एल ई, एफ ए- दिनू : (मोठयाने) खानदेश जिल्ह्यातील तालुके- (तीनदा घोकतो.) धुळे, अमळनेर, एरंडोल, पाचोरे, धुळे, अमळनेर, एरंडोऽल- दामू : एफ एबी एल ई फेबल म्हणजे कल्पित गोष्ट. (लिहू लागतो.) दिनू : धु-ळे, अमळनेर- दामू : दिन्या, हळू घोकणा रे! माझा शब्द चुकला की इकडे! हे बघ, फेबल म्हणजे कल्पित नेर झाले आहे. हळू घोक. (शब्द पाहू लागतो) बी ई ए यू- ...Read More

14

संपूर्ण बाळकराम - 14

मनुष्याचे मन सदासर्वदा उत्सवप्रिय असते. यद्यपि, कैक नाटक-कादंबऱ्यांच्या प्रस्तावनांचा आरंभ या वाक्याने झाला असला, पुराणाभिमानी लोकांनाही हे मत मान्य 'दक्षिणा प्राइज कमिटीने' बक्षिसास पात्र ठरविलेल्या पुस्तकांतही जरी हे वाक्य एखादे वेळी दिसून आले, फार कशाला हे वचन शाळाखात्याने सुध्दा मंजूर केले असले तरीसुध्दा ते सर्वांशी खरे आहे. हवा, पाणी, अन्न, झोप, खोटे बोलणे, बालविवाह, होमरूल, वगैरे बाबतींप्रमाणे या उत्सवप्रियतेचीही मनुष्यप्राणाच्या जीवनाला महत्त्वाची आवश्यकता असते. मात्र परमेश्वराने या उत्सवप्रियतेची काही नैसर्गिक बाह्य योजना करून ठेवलेली नसल्यामुळे मनुष्यजातीला कृत्रिम साधने निर्माण करावी लागली आहेत. ...Read More

15

संपूर्ण बाळकराम - 15

मनसा चिंतितं कार्य दैवमन्यच्च चिंतयेत्। - संस्कृत सुभाषित. परमेश्वराच्या या विविधविषय विश्वविद्यालयात प्राणिमात्राला आजन्म अनुभवाच्या शिक्षणक्रमांतून पसार व्हावे लागत असते. या आयर्ुव्यापी अभ्यासात प्रत्येकाला त्रिकालबाधित सत्यापैकी कोठल्या तरी प्रमेयाचा कृत्य सिध्दान्त स्वरूपाने यथाबुद्ध्या प्रत्यय येत असतो. कोणाला 'सत्यमेव जयते नानृतम्' या तत्त्वातल्या सत्याची समज पडते तर कोणाची 'नरो वा कुंजरो वा' यासारख्या दुटप्पी बोलण्यावाचून जगात निभावणी होत नाही, अशी खातरजमा होत जाते. एकाला या हातावरचे झाडे या हातावर देण्याचा खरेपणा हाती येतो तर, दुसरा चित्रगुप्ताच्या खातेवहीत पुष्कळदा चुकभूल होत असल्याबद्दल बिनचूक टाचण करून ठेवितो. याप्रमाणे प्रत्येकाला ह्या ना त्या तत्त्वाचे अनुभवजन्य ज्ञान मिळत असते. परंतु त्यातल्या त्यात काही सत्यतत्त्वे अशी व्यापक स्वरूपाची आहेत की, त्यांचा प्रत्यय प्रत्येकाला उभ्या आयुष्यात एकदा तरी येतोच येतो. चालू लेखाच्या मथळयावर दिलेल्या श्लोकांतील सूत्रात्मक सत्य हे असल्या सर्वव्यापक तत्त्वांचे उत्तम उदाहरण आहे. ...Read More