श्यामची आई - 23

  • 7.1k
  • 2
  • 1.9k

मे महिन्याच्या सुटीत मी घरी गेलो होतो. इंग्रजी चवथीत मी गेलो होतो. मी घरी गेलो, म्हणजे आईला आधार वाटे. कारण ती नेहमी आजारी असे. एक दिवस ताप येई दुसऱ्या दिवशी ताप निघाला की ती पुन्हा कामाला लागावयाची. ताप आला की निजावयाचे, ताप निघताच उठावयाचे. ती फार अशक्त झाली होती. मी आलो, म्हणजे तिला बरे वाटे. मी तिला पाणी भरण्यास, धुणे धुण्यास मदत करीत असे. अंगणाची झाडलोट करीत असे. आईचे पाय चेपायचे, हा तर सुटीतील माझा नेमच झालेला असे.