अस्तित्व - एक चंदेरी स्वप्न! " आयुष्याने आपल्याला काय दिलं, यापेक्षा आपण आयुष्याला काय दिलं याचा जर हिशोब केला तर आयुष्य नावाचं किचकट उदाहरणही सहज सुटतं. " नेहमीप्रमाणे आजही त्याने त्याच्या डायरीत या ओळी खरडल्या. आणि तो तसाच डोळे मिटून आरामखुर्चीवर मागे रेलून बसला. शेजारी डावीकडे लांब चंदेरी रंगाची इमारत चकाकत होती. खिडकीतून मात्र ती लहान होत गेलेली दिसायची. आणि त्याच्या एका बाजूचा नजारा झगमगत असताना दुसऱ्या बाजूला मात्र काळ्याकुट्ट अंधाराने मिठीत घेतल्यासारखं भासायचं. डोळे मिटलेले असूनही इतक्या वर्षात मुंबईत राहुन तिथल्या वाऱ्याच्या झुळूकेच्या आभासानेही तिथे आजूबाजूला काय घडतंय हे त्याला अंदाजातून समजायचं. किंबहुना हे सगळं आता त्याच्या सवयीचंच झालेलं.