मल्ल - प्रेमयुद्ध घराच्या मागच्या अंगणात विहीर होती. विहिरीच्या बाजूला चाफ्याचे झाड होते. सगळीकडे फुलांचा सडा पडला होता. बसायला दगडी ताल होती. जरा अंतर ठेवून दोघे त्यावर बसले. आजूबाजूला घर होती. कोणी ना कोणी येऊन घरांमधून डोकावत होते. कदाचित जोडी कशी आहे यावर चर्चा होत होती.बराच वेळ दोघेही शांत होते.."माफ करा..." वीर म्हणाला."सगळं झाल्यावर माफी कसली मागताय?" क्रांती रागाने बोलली."काय करणार याआधी एवढं कुणी आवडलं नव्हतं...पण मी जबरदस्ती न्हाय करणार ? " वीर शांतपणे बोलला." मग आत्ता काय करताय??? तुमाला म्हाइतीये मला लग्न करायचं न्हाय....आणि तुमच्याबरोबर तर न्हाईत न्हाय..." वीरने पटकन क्रांतीच्या नजरेत बघितले. तो दुखावला हे क्रांतीला लगेचच समजले."