अध्याय 2 विराध राक्षसाचा वध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ अत्री आश्रमात श्रीरामांचे आगमन : अतिऋषि वसे जेथ । आतुरविश्रांतिपर्वत ।तेथें आला श्रीरघुनाथ । समवेत स्त्रीबंधू ॥ १ ॥देखोनि अत्रीचे चरण । श्रीरामें घातलें लोटांगण ।ऋषीनें दिधलें आलिंगन । समाधान ध्येयध्याना ॥ २ ॥सीता आणि लक्ष्मण । दोघीं घातलें लोटांगण ।दृढ मस्तकीं धरले चरण । सुखसंपन्न ऋषि जाला ॥ ३ ॥श्रीरामें अति उल्हासता । अनसूयाचरणीं ठेविला माथां ।अत्रि म्हणे श्रीरघुनाथा । तुझी हे माता पुरातन ॥ ४ ॥ अनसूया व सीतेची भेट, सीतेचे अभिनंदन : ऐकोनि अत्रीचें वचन । सौमित्रें वंदिले तिचे चरण ।सीतेनें घातलें लोटांगण । दिधलें आलिंगन अनसूये ॥