“उजळून आलंय आभाळ रामाच्या पहारी...!! आन् गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी..!!” टाळाची बारीक किनकिन.. आन् जोडीला चिपळ्या वाजण्याचा आवाज कानावर पडला तशी म्या आंगावरली गोधडी फेकून दिली.. “आये...वासुदेव आलाय गं...” म्हणंत पळत पळत आंगणात गेलो.बाहेर झुंजूमुंजू झालं व्हतं.. आंगणातल्या नींबाच्या झाडावर चिमण्यांचा चिवचिवाट चालू व्हता.. डोक्यावर मोराच्या पखाची गमतीदार टोपी.. पायापवतर मळकाटल्याला पांढरा झगा.. इठ्ठालावाणी धोतर नेसल्याला, एका खांद्याला लटकावलेली झोळी, कपाळावर आन् कानाला गोपीचंदनाचा टीळा.. गळ्यात तुळशीच्या माळा, लाल काठाचं उपारणं, अनवाणी हळूहळू पावलं टाकीत..सवताभवती गोल गोल गिरक्या मारीत वासुदेव आला व्हता..निसता आला नव्हता तर आख्या