'शाहीर'! क्रमशः.. भाग- पाच "...तुमच्या गुडघ्याला इतकं लागलं, तर त्या वेळी डॉक्टर, दवाखाना असतीलच की! " " ही मागच्या तीस वर्षां अगोदरची गोष्ट. त्या टायमाला सरकारी दवाखान्याशिवाय कवचितच कुठंतरी एखादा दवाखाना असायचा. आन् दवाखान्यात जायाचं म्हंटल्यावर अंगावर काटा उभा राह्याचा, त्या वेळची माणसं दुखण्यानं जाग्यावर बसून राह्यली तरी दवाखान्याचं नाव काढत नसायची. हळद, झाडपाल्याच्या औषधावरच लय लोकांचा विश्वास. त्यामुळं दवाखान्याचा इचार कुणाच्या डोक्यात सुद्धा येत नसायचा. आन् मग कुठला दवाखाना न् काय..! , पण आत्ताच्या लोकांचं कसं झालंय, कष्टाचं प्रमाण कमी.. खाणं नाजूक.. त्यामुळं जीवन नाजूक झालंय, ह्यांना त्यावेळच्या माणसांसारखं किरकोळ दुखणं सुद्धा अंगावर काढणं म्हणजे जीवावर बेतण्यासारखं आहे."