"हणम्या, जरा चहा पाण्याचं बघ! दिवस हातभर वर आलाय. ऊन तापायच्या आधी रानात खेटा मारायचाय!"हानाम्याने लगबगीने मालकाच्या पुढ्यात, लाल भडक तांब्याचा लोटा अन तांब्याचाच वीतभर उंच पेला ठेवला. पुन्हा घरात फेरी मारून, ताज्या दुधाचा, विलायची-अद्रक घातलेला, वाफाळलेला चहाचा कप आणला.उंच्यापुऱ्या भारदस्त विष्णुपंतांनी शेजारच्या तांब्याच्या पेल्यातले पाणी, तोंड वर करून नरड्यात ओतले. पांढऱ्याशुभ्र धोतराच्या सोग्याने, ओल्या मिश्या साफ केल्या. गरमागरम चहा बशीत ओतून मन लावून पिला. चहा पिताना, अभिमानाने आपल्या वाडलोपार्जीत, भव्य दगडी तटबंदी असलेल्या वाड्यावरून समाधानाने नजर फिरावी. हत्तीवर अंबारीत बसून त्यांचे पूर्वज, या समोरच्या वीतभर रुंद भरीव लोखंडी दाराच्या कमानीतून येत असत! एखाद्या किल्ल्याला लाजवील असा त्यांचा वाडा होता.