परदेशातला, बहुदा त्यागराजचा हा शेवटचा प्रोजेक्ट होता. तो सध्या वयाच्या पन्नाशीच्या टप्यात होता. हिंदी महासागरात श्रीलंकेच्या आजून दक्षिणेला, श्रीलंकेच्या आधिपत्यातल्या, एका नगण्य बेटावर, तो प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आला होता. या खडकाळ आणि डोंगराळ बेटावर काही ब्रिजेस बांधायची होती. भारतातल्या कॉन्स्ट्रक्शन कंपनीने त्याला पाठवले होते. याला दोन कारणे होती. एक तर तो सडाफटिंग होता. कुटुंब बायका पोर! काही पाश नव्हते. कारण त्याचा 'कुटुंब' व्यवस्थेवर अजिबात विश्वास नव्हता. आजाद पंछी! सुख पैशात खरेदी करता येतात, हे याच जगाने, त्याला शिकवले होते. आणि दुसरे कारण त्याची भटकंतीची हौस!कालच सिमेंटने भरुन आलेले शिप, गोडाऊन मध्ये डंप करून तो निवांत झाला. अजून स्टील आले नव्हते.