रावसाहेब वाड्यावर पोहोचले तेव्हा त्यांचं मन पश्चातापाने व्यापलं होतं. बाळूवर आपल्या मुलावर आपण किती अन्याय केले हा एकच विचार त्यांच्या मनात घोळत होता. वाड्यात येताच बाळूला शोधत पूर्ण वाडा त्यांनी पालथा घातला. शेवटी ते गोठ्यात गेले. तिथे बाळू गाईंना चारा देण्यात मग्न होता. बाळूला पाहताच रावसाहेबांनी त्याला आलिंगन दिले आणि ते लहान मुलासारखे रडू लागले. रडक्या घोगऱ्या आवाजात ते बोलत होते, “मला माफ कर बाळा, माफ कर! तुला गुरासारखा वागवला, वाटेल ते बोललो, पाठीत लाथा हणल्या, तुझा गाल सुजवला, मी चुकलो बाळा मी खूप मोठी चूक केली, माफ कर, मला माफ कर!” रावसाहेबांच्या अश्रूंमुळे बाळूचा मळका शर्ट खांद्यापाशी भिजला होता.