काही जुन्या आठवणींमुळे वृषालीचं मन विस्कळीत झालं होतं. ते पूर्वपदावर आणण्यासाठी कटू आठवणींच्या जागी सुखद आठवणी पेरणं गरजेचं होतं. पण जोपर्यंत वृषालीच्या मनाचे दरवाजे बंद होते तोपर्यंत हे शक्य नव्हतं. तसेच तिच्या घराण्यात मनोविकाराने ग्रासलेली ती काही पहिली व्यक्ती नव्हती. तिच्या आज्जीला देखील नैराश्याचे झटके बऱ्याचदा येऊन गेले होते. पण तरीदेखील काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे वृषालीच्या मनावर झालेली जखम इतक्या दिवसांनंतर पुन्हा एकदा ओली व्हावी याचं उत्तर मात्र खुद्द डॉक्टरांकडे देखील नव्हतं. विज्ञान कितीही पुढे गेलं असलं तरी मनुष्याचं मन इतकं गूढ आहे की ते पूर्णपणे ओळखणं विज्ञानाला सुद्धा अजून शक्य झालेलं नाही. राजेश, मनाली आणि संदीपने वृषालीच्या डॉक्टरांची भेट घेतली.