तो कोणाचा कोण होता माहित नाही, पण माझा मात्र बंडूदादाच होता! त्याच्यात माझ्यात सहासात वर्षाचे अंतर होते. तेव्हा मी सात आठ वर्षांचा असेल. वय कधीच त्याच्या माझ्यात आड आले नाही. मी लहान म्हणून त्याने कधी दुय्यमतेने वागवले नाही कि, तो मोठा म्हणून मी अंतर ठेवले नाही. तो एक 'ब्राह्मणाचे अनाथ पोर ' हि माहिती नन्तर मिळाली पण ती गौण होती आणि गौणच राहिली. आमच्या घरातहि त्याच्यात माझ्यात कधीच भेदभाव झाला नाही. कपाळभर अस्ताव्यस्त केस, दाट काळ्याभोर भुवया, त्यातून त्याला पाहायची सवय होती. त्याचे डोळे तपकिरी रंगाचे, कायम काहीतरी शोधात असणारे! मला तो रंग खूप आवडायचा. त्याला सिनेमाचे भयंकर वेड होते.