दिवाणखाना भव्य होता. ठायी ठायी कोचे होती. मध्ये बैठक होती. तेथे होड होते. महात्माजींची तसबीर तेथे होती. घना तेथे बसला होता. तो व्यवस्थापक व मालक यांची वाट पाहात होता. खिशातून टकली काढून तो तेथे कातीत बसला आणि रामनाम म्हणत होता. त्याची क्षणात तन्मयता झाली. “पुरे सारे ढोंग.” व्यवस्थापक येऊन म्हणाले. “ढोंग आहे की मनापासून कर्म होत आहे, प्रभूला माहीत. तुम्ही तरी ढोंग करू नका म्हणजे झाले. येथे महात्माजींची तसबीर तुम्ही लावली आहे, तिला साक्ष ठेवून वागता ना?” घनाने विचारले. “महात्माजी तर मालक म्हणजे ट्रस्टी म्हणतात. तुमचा निराळा प्रचार.” “परंतु ट्रस्टी म्हणजे आपण काय समजता?”