भाग 1.. पुढल्या पाचच मिनिटात ट्रेन प्लॅटफॉर्म वर येत असल्याची घोषणा झाली.. त्याबरोबर सर्व प्रवासी आपापल्या बॅगा घेऊन पुढे सरसावले.. मीही जड अंतःकरणाने माझी बॅग हातात घेतली.. आणि क्षणात गोव्याला जाणारी ट्रेन माझ्या पुढ्यात उभी होती; पण.... पाऊल उचलायचं सुचत नव्हतं. काही सेकंद जणू संपूर्ण शरीर गोठल्याचा भास झाला.. आपल्याला त्या ट्रेन मधे चढायचं आहे; एक नवीन आयुष्य सुरु करायचं आहे याचा पूर्णपणे विसर पडला होता.. मेंदू अगदी बधिर झाल्यागत वाटत होतं..असं वाटत होतं की..दोन्ही हातांनी डोकं गच्च दाबून धरावं..? "मीराsss अगं काय करतेयस? कसला विचार करतेयस एवढा?? ट्रेन सुटेल ना आपली.... चल लवकर..." - विक्रांत च्या आवाजाने मी भानावर आले..