तो गाव फार मोठा नव्हता. फार लहानही नव्हता. समुद्रकाठी होता तो परंतु गावाची हवा बिघडली होती. जिकडे तिकडे दलदली झाल्या होत्या. त्यामुळे बेसुमार डास झाले होते. गावात हिवतापाच्या साथीचा कहर होता. घरोघर अंथरूणे पसरलेली होती. माणसांचे सापळे झाले होते परंतु कोण नष्ट करणार हया दलदली? श्रीमंत लोक शहरांत राहू लागले. त्यांना हया लोकांची करुणा येईना. लोकांचे जीवन सुखी करणे म्हणजे धर्म असे कोणाला वाटेना. एका श्रीमंताने त्या गावात आणखी एक मोठे मंदिर बांधायचे ठरविले. लाख दोन लाख रुपये खर्च होणार होते.