त्या दिवशी उजाडत ढब्बूसाहेब फुलाच्या कोठडीजवळ एकदम आले. शिपायाने कोठडी उघडली. साहेब आत शिरले. ते खोलीत पाहू लागले. तेथे मडक्यात तो वेल वाढत होता. संशयी साहेब त्या वेलाकडे टक लावून पाहू लागले. ‘हा कसला वेल? हा वेल वाढवून खिडकीतून खाली सोडायचा असेल. त्या दोराच्या साहाय्याने पळून जायचे असेल. होय ना? मोठे बिलंदर बोवा तुम्ही क्रान्तिकारक. कोठे काय कराल त्याचा नेम नाही. कोठून आणलेस हे मडके? कोठून आणलीस माती?’