लिली व वालजी त्या भूत बंगल्यात राहात होती. मुंबईतील अगदी दूरच्या गरीब वस्तीत. तो प्रचंड बंगला होता. त्या बंगल्यात शेकडो खोल्या होत्या. त्या बंगल्यात भुते आहेत अशी आख्यायिका होती, म्हणून फारसे कोणी तेथे राहायला येत नसे. तेथे भाडे थोडे असे. बरेच गरीब लोक हळुहळू तेथे राहायला येऊ लागले. गरिबांना भुते थोडीच बाधा करणार? दारिद्रयाचे भूत ज्याच्या मानगुटीस बसलेले, त्याला बाकीचे भुते साधी वाटतात. बिर्हाडे बदलता बदलता वालजीही तेथे आला.