दुःखी.. - 4

  • 7.9k
  • 3.1k

त्या उदार पुरुषाचे मूळचे नाव वालजी. वालजी घोडयावर स्वार होऊन परत आपल्या शहरी आला. पोलिस लवकरच आपणास पकडणार ही त्याला खात्रीच होती. सायंकाळ होऊन गेली होती. त्याने आवराआवर केली. उरलेसुरले काम आटोपले. त्याने अंगात एक विशेष जाकीट घातले, त्यावरून आणखी एक अंगरखा घातला. त्यावरून आणखी एक जाड लांब कोट घातला. त्याला दवाखान्यात जाऊन त्या अभागिनीची भेट घ्यायची इच्छा होती. तिची मुलगी आणण्याचे त्याने कबूल केले होते परंतु अकस्मात हा खटला आला. त्या मुलीकडे जाण्याचे राहिले आणि आता तर ते शक्य नव्हते परंतु त्या आईला भेटता आले तर पाहावे असे वालजीला सारखे वाटत होते.