ते तीन तरुण होते. तिघे एकमेकांचे मित्र होते, ख्यालीखुशाली करणारे होते. प्रत्येकाचे एकेक प्रेमपात्र होते. परंतु हळुहळू त्या तिघांना त्या प्रेमपात्रांचा वीट आला. आपल्या पाठीमागे असणार्या त्या तिघींचा त्याग करावयाचा असे त्यांनी ठरविले. ते तिघे आपापल्या त्या दोन दिवसांच्या राण्या बरोबर घेऊन निघाले. ते एका सुंदर थंडगार हवेच्या ठिकाणी जाणार होते. त्यांच्या प्रियकरणींना आनंद झाला होता. आपल्यावर आपल्या प्रियकराचे किती प्रेम, असे प्रत्येकीला वाटत होते.