अडकला! स्वराज्यसूर्य अडकला! शहाजी-जिजाऊंचा सुत अडकला! औरंगजेबाच्या पिंजऱ्यात अडकला! स्वराज्याचा,माँसाहेबाचा चेहरा काळवंडला. घात झाला. औरंगजेबाने दगा दिला. शिवरायांना कैदेत टाकले. नजरकैद असली तरीही काय झाले, शेवटी तुरूंग तो तुरूंगच! सततचा खडा पहारा छातीवर! जंगलात एखाद्या शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेला सिंह डरकाळी फोडून स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो, जाळे कुरतडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो परंतु शिवाजी नामक वाघाला काहीही करता येत नव्हते. त्यांचेवर करडी नजर होती.