एके दिवशी सकाळी करुणा त्या समाध्यांजवळ गेली होती. हात जोडून, डोळे मिटून ती तेथे बसली होती. मधून मधून तिच्या डोळ्यांतून अश्रू घळघळत होते. प्रेमानंद तेथे येऊन उभा होता. ते पवित्र व प्रेमळ, करुणगंभीर दृश्य तो पाहात होता. करुणेने डोळे उघडले, समोर प्रेमानंद होता. क्षणभर कोणी बोलले नाही. ‘प्रेमानंद, बसा. उभे का ? परके थोडेच आहात ? शिरीषचे तुम्ही मित्र. बसा. केव्हा येईल तुमचा मित्र ? असा कसा कठोर मित्र ?’