शिवरायांची यशस्वी घोडदौड चालू असताना त्यांच्या जीवनात दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. एक अत्यंत वाईट तर एक आनंदी अशी. शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे हे लहानपणापासूनच शहाजीराजे यांच्यासोबत कर्नाटकात राहात असत. तेही अत्यंत शूर, धाडसी, पराक्रमी होते. त्यावेळी अफजलखान कर्नाटकातील कनकगिरीच्या गडावर हल्ला करण्यासाठी कर्नाटकात पोहोचला होता. त्याला मदत करावी असा आदेश आदिलशाहीने संभाजीराजेंना दिला होता. त्या हुकुमानुसार संभाजीराजेंनी अफजलखानासोबत कनकगिरीच्या किल्ल्याला वेढा घातला होता.