प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. माझीं पत्रें तुला व तुझ्या सेवा दलांतील मित्रांना आवडतात. हें वाचून मला बरें वाटलें. मला माझी मर्यादा माहीत आहे. सांगोपांग ज्ञान मला नाहीं. परंतु समर्थांनी सांगितलें आहे कीं, जें जें आपणांस माहीत असेल तें तें द्यावें. काजव्यानें आपल्या शक्तींनें चमकावें. तारे आपल्यापरी चमकतील. चंद्रसूर्य त्यांच्या शक्तीप्रमाणें प्रकाश देतील. माझ्यानें राहवत नाही. भारतीय तरुणांकडे माझें मन धांवतें. त्यांना मिठी मारावी व भारताच्या ध्येयाकडे त्यांना न्यावें असें वाटतें, परंतु मी कोण, माझी शक्ति ती किती ! राहवत नाहीं म्हणून करायचें.