श्यामचीं पत्रें - 6

  • 6.9k
  • 1.8k

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. आज सायंकाळी आकाशांत बीजेची चंद्रकोर दिसत होती. लहानपणीं आम्ही द्वितीयेची ही चंद्रकोर पाहण्यासाठी धडपड करीत असूं. आणि दिसली कीं, ती एकमेकांस दाखवीत असूं. सुताचा धागा त्या चंद्राला वाहून जुनें घे, नवें दे, असें नमस्कार करुन म्हणत असूं. या चंद्रकोरेची इतकी कां बरें महति? कारण ती वर्धिष्णु आहे. विकासाचा तो आरंभ आहे. कोणताहि विकासाचा आरंभ मंगल आहे. श्री. शिवछत्रपतींची जी राजमुद्रा होती तींत ' प्रतिपच्चंद्ररेखेव ' असें तिला म्हटलें आहे. शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा शुक्ल पंक्षातील चंद्राप्रमाणें वर्धिष्णु आहे असें त्या श्लोकांत आहे.