दुस-या दिवशी सुशांतचे आई - बाबा ठरल्याप्रमाणे दीपाच्या घरी आले. सुंदर आणि सोज्वळ दीपा त्यांना पाहिल्याबरोबर पसंत पडली. महिन्याभरात दोघांचं लग्नही झालं. सुशांतच्या सहवासात हळूहळू ती पूर्वीच्या कटु स्मृती अाणि दुःख विसरून गेली आणि नव्या जोमाने आयुष्य जगू लागली. शिवाय नाशिकमध्ये तिच्याविषयी माहिती असणारे परिचित लोक आजूबाजूला नसल्यामुळे तिला नको असलेल्या नजरांचा सामना करावा लागत नव्हता. नवीन वातावरणात ती आत्मविश्वासाने वावरू लागली. पण सहा महिन्यातच सुशांतची बदली परत मुंबईला झाली. शेतीकडे लक्ष द्यायचे असल्यामुळे सुशांतच्या आई-बाबांना गावी रहाणे भाग होते. सुशांतच्या कामाच्या वेळा ठरलेल्या नव्हत्या. ब-याच वेळा ते रात्री उशीरा घरी येत. घरी दिवसभर एकटे रहाण्यापेक्षा दीपाने परत हाॅस्पिटलमध्ये नोकरी सुरू केली.