केरळ हे भारतातले देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे. कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळ राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली. तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी असून राज्यातील कोची व कोळिकोड ही महत्त्वाची शहरे आहेत. मल्याळम ही राज्याची प्रमुख भाषा आहे. पर्यटनाच्या बाबतीत केरळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून सृष्टिसौंदर्य पहायला व आयुर्वेदिक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो प्रवासी केरळमध्ये येतात. राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे केरळ भारतातील सर्वाधिक शिक्षित लोकांचे राज्य आहे. केरळातील अंदाजित 50 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.