२. महाबळेश्वर- द लॅंड ऑफ स्ट्रॉबेरीज..

(20)
  • 12.2k
  • 2
  • 4.5k

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे एक नगरपालिका असणारे तालुक्याचे शहर आहे. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटातील उंच डोंगरावर हे वसलेले शहर आहे. भारतातील जी हिरवळीने सजलेली कांही मोजकीच ठिकाणे आहेत त्यातीलच हे एक. ब्रिटिश राजवटीतील मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी होती. येथील महाबळेश्वराचे देऊळ हे यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले. अफझलखानच्या तंबूचे सोन्याचे कळस शिवाजी महाराजांनी या महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले होते. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी चांगली घनदाट वनश्री आहे. महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर, लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी अतिशय प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर, रासबेरी, जांभळाचा मध व लाल मुळे, गाजरे हे सुद्धा खास प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळतो.