एक होता गाव. त्या गावात एक मनुष्य होता. त्याला दोन बायका होत्या. एक होती आवडती व एक होती नावडती. जी नावडती होती ती दिसायला चांगली नव्हती. तिला फार कष्ट पडत. कोंबडा आवरल्यापासून ती कामाला लागे. ती दिवसभर सारखे काम करी. विहिरीचे पाणी तीच भरी. नदीवर धुण्याची मोट घेऊन तीच जाई. गुराढोरांचे तीच करी. दळणकांडण तीच करी. खटाळभर खरकटी भांडी तीच घाशी. झाडलोट, सडा-सारवण, दिवाबत्ती, सारे तीच करी. क्षणाचीही तिला विश्रांती नसे. इतके काम करूनही तिच्याजवळ कोणी गोड बोलत नसे. तिला गोड घास मिळत नसे. तिच्या वाटयाला रोज उठून शिळवड असायची. नेसू फाटके जुनेर असायचे. निजायला फटकुर मिळायचे. तिच्या अंगाखांद्यावर मणीमगळसूत्राशिवाय काही नव्हते. हातात नीटसा बिल्वरही नव्हता. दागदागिन्यांचे एक असो मेले. त्याच्यावाचून माणसाचे अडत नाही परंतु फुकाचा गोड शब्द, तोही महाग असावा? परंतु या जगात गोड बोलण्याचाही पुष्कळदा दुष्काळच असतो.