मनुष्याचे मन सदासर्वदा उत्सवप्रिय असते. यद्यपि, कैक नाटक-कादंबऱ्यांच्या प्रस्तावनांचा आरंभ या वाक्याने झाला असला, पुराणाभिमानी लोकांनाही हे मत मान्य असले, 'दक्षिणा प्राइज कमिटीने' बक्षिसास पात्र ठरविलेल्या पुस्तकांतही जरी हे वाक्य एखादे वेळी दिसून आले, फार कशाला हे वचन शाळाखात्याने सुध्दा मंजूर केले असले तरीसुध्दा ते सर्वांशी खरे आहे. हवा, पाणी, अन्न, झोप, खोटे बोलणे, बालविवाह, होमरूल, वगैरे बाबतींप्रमाणे या उत्सवप्रियतेचीही मनुष्यप्राणाच्या जीवनाला महत्त्वाची आवश्यकता असते. मात्र परमेश्वराने या उत्सवप्रियतेची काही नैसर्गिक बाह्य योजना करून ठेवलेली नसल्यामुळे मनुष्यजातीला कृत्रिम साधने निर्माण करावी लागली आहेत.