संपूर्ण बाळकराम - 12

  • 7.1k
  • 2.3k

(स्थळ: घरासमोरील अंगण. वेळ- चांदण्या रात्रीचा पहिला प्रहर. पात्रे: भोकाड पसरून रडणारा आठ-दहा महिन्यांचा बाबू. बाबूची समजूत घालीत असलेले त्याचे वडील- तर्कालंकारचूडामणी प्रोफेसर कोटिबुध्दे.) प्रा. कोटिबुध्दे : (गंभीर वाणीने) बाबू, रडू नकोस! रडण्याने स्वत: रडणाराला काहीच फलप्राप्ती होत नसून, आसमंतात्भागी वास्तव्य करणाराला- म्हणजे निकटतरवर्ती जनसमुदायाला मात्र कर्णकर्कश रुदनध्वनीपासून महत्तम त्रास होण्याचा संभव असतो. किंबहुना खात्री असते, असेही म्हटले असता अतिशयोक्ती होणार नाही.