प्रस्तुत लेखाचा मथळा वाचून लगेच लेखकाच्या नावावर नजर टाकताच माझ्या सार्या वाचकभगिनी एकदम थबकतील, आणि मला स्वयंपाकघरातून हाकलून लावण्याचा ठराव करू लागतील! माझ्या भगिनीवर्गाने आपल्या या गरीब भावंडावर अशी आग पाखडण्यापूर्वी पुढील चार शब्द वाचून पाहण्याची कृपा करावी. माझ्या सुशिक्षित भगिनीजनांच्या विचारशीलतेची मला खात्री असल्यामुळे, या शब्दाकडे त्यांचे रागावलोकन होणार नाही, अशी मला पूर्ण उमेद आहे. बाकी एखाद्या निरक्षर बाईने मात्र हे चार शब्द वाचण्याची तसदी घेतली असती किंवा नाही, याची शंकाच आहे! बहुधा पहिल्या दोन ओळींवरच नजर फेकून तिने माझा लेख चुलीत टाकला असता, आणि तापलेल्या कालथ्याच्या किंवा जळत्या कोलिताच्या साहाय्याने मला स्वयंपाकघरातून पिटाळून लावले असते. यद्यपि प्रत्येक समाजाने आपापल्या परीने स्त्री-पुरुषांसाठी भिन्नभिन्न कामे नेमून दिली आहेत तथापि प्रसंगविशेषी एका मनुष्यभेदाच्या प्राण्याला दुसर्याचे हक्क घेण्यापुरती सवलत देण्यात येते.