आता एकच विचार, कोणी नवरा त्याशी समर्पू म्हणे। मानवी बुध्दीच्या आटोक्यात येणार्या कोणत्याही विषयाच्या ज्ञानाची, सामान्यत: तात्त्वि (Theoretical) व व्यावहारिक (Practical) अशी दोन अंगे असतात. यापैकी कोणत्याही एकाचाच परिचय होऊन भागत नाही. त्यापैकी कोणतेही एक दुसर्यावाचून भटकताना दिसले, म्हणजे विरहावस्थेतील प्रणयीजनाप्रमाणे बेवकूब ठरून ते उपहासाला पात्र होते. पहिल्याला 'पुस्तकी विद्या' हे नाव मिळून दुसर्याची आडमुठेपणात जमा होते. 'बारीक तांदूळ तितके चांगले' हे पुस्तकी सूत्र पाठ म्हणणारा पक्वपंडित व्यावहारिक ज्ञानाच्या अभावी, बारकातले बारीक तांदूळ म्हणून कण्याच घेऊन घरी येतो! पोहण्याच्या पुस्तकातील नियम हृदयात साठवून, समोर मोठया मेजावर ठेवलेल्या बशीभर पाण्यातल्या बेडकाबरहुकूम हातपाय पाखडणारा तितीर्षु बारा वर्षे असे अध्ययन करूनही शेवटी स्नान करताना झोक जाऊन बालडीभर पाण्यात बुडून मेल्यास नवल नाही! चोवीस वर्षाच्या एका नवरदेवाऐवजी बारबारा वर्षाचे दोन विचवे चालतील किंवा नाही, ही शंका काढणारे डोकेही केवळ एकांगी ज्ञानानेच एकीकडे कलते झाले असले पाहिजे.