संपूर्ण बाळकराम - 2

  • 9.1k
  • 4.2k

लग्नाच्या मोहिमेची पूर्वतयारी वर शोधाया जाण्यापूर्वी किती तयारी लागे - बाळकराम कोणत्याही महत्कार्याला सुरुवात करण्यापूर्वी त्याची आधी किती तरी तयारी करावी लागते, याचे थोडक्यात चटकदार वर्णन शिरोभागी दिलेल्या अर्ध्या साकीत कवीने दिलेलेच आहे! परीक्षेचे कागद तीन तासांत चट्दिशी लिहून काढण्यासाठी आलेला उमेदवार आधी वर्षभर पूर्वतयारी करीत असतो. एखाद्या दिवशी सकाळी पेढीच्या दारांवर दिवाळे फुकट मोकळे झाल्याची नोटीस अचानक लावणार्‍या पेढीवाल्या भागीदारांना चार-चार महिने आधी खलबते करावी लागतात. त्याचप्रमाणे माझे मित्र तिंबूनाना यांच्या ठकीसाठी नवरामुलगा शोधण्यासाठी पुण्यास येऊन ठेपण्यापूर्वी आम्हाला आधी किती पूर्वतयारी करावी लागली, याची वाचकांना या लेखात थोडक्यात माहिती करून देण्याचे योजिले आहे.