तो काळ आर्यांच्या विजयाचा व विस्ताराचा होता. आर्य प्रथम पंजाबात आले, तेथे नीट पाय रोवून ते आणखी पुढे सरकले. गंगा व यमुना या सुंदर विशाल नद्यांच्या गहिऱ्या पाण्याने समृद्ध व सुपीक झालेल्या रमणीय प्रदेशांत आर्य राजे करुन राहू लागले. सृष्टिसुंदरीने वरदहस्त ठेवलेल्या याच प्रदेशात, जनकासारखे राजर्षी जन्मले. धर्म, तत्त्वज्ञान, कला यांचा विकास येथेच प्रथम झाला व संस्कृतिसूर्याचे हे येथील किरण हळूहळू अखिल भारतवर्षावर पसरु लागले. उत्तर हिंदुस्थानात आर्यांच्या वसाहती सर्वत्र होण्यापूर्वीच ओढ्या प्रांतातून समुद्रकिनार्यापर्यंत येऊन तेथे गलबतात बसून काही धाडसी आर्य खाली सिलोन ऊर्फ लंका बेटात गेले. या बेटाजवळ मोत्यांच्या खाणी होत्या. सोन्याच्या खाणी होत्या. हे राज्य समृद्ध झाले. लंकाधीश रावणासारखा महत्त्वाकांक्षी राजा उत्तरेकडे दिग्विजय करण्यास निघाला व नाशिकपर्यंत आला. तेथे त्याने आपले अधिकारी ठेवले. रावणासारखे राजे दक्षिणेकडून उत्तरेकडे येत होते, तर दुसरे संस्कृतिप्रसार करणारे धाडसी ऋषी विंध्यपर्वत ओलांडून खाली दक्षिणेकडे येत होते.