मुलांसाठी फुले- ४

  • 8.9k
  • 2.2k

एका कापडाच्या व्यापाऱ्याने आपल्या दुकानात एक नवीन मुलगा नोकरीस ठेवला. त्या मुलाचा बाप गरीब होता. बापाने मुलाला शाळेतील शिक्षण दिले नव्हते. परंतु घरगुती शिक्षण त्याने दिले होते. प्रामाणिकपणाने वागावे, कोणाला फसवू नये. कोणाला हसू नये. कष्टाने मिळेल ते खावे. चोरी-चहाडी करून श्रीमंत होण्यापेक्षा खरेपणाने वागून गरिबीत राहावे लागले तरी आनंदाने राहावे, असे त्याचा बाप त्याला शिकवीत असे. निरनिराळ्या बोधपर गोष्टी सांगून मुलाला चांगले वळण त्याने लावलेले होते. मुलगा चुणचुणीत होता चपळ होता परंतु त्याहीपेक्षा खरेपणाने वागणारा, गोड बोलणारा व प्रामाणिक होता. दुकानात तो सर्वांना आवडे. गिऱ्हाईक त्याच्याकडे जास्त यावयाचे दुसऱ्या नोकराकडे कमी जावयाचे. बोलायला गोड, दिसायला गोड, मनाने गोड, हृदयाने गोड, अशी मुले म्हणजे देवाघरची फुले.