ती एक गरीब विधवा होती. मोलाने काम करी व चार कच्च्याबच्च्यांचे पालनपोषण करी. एका लहानशा झोपडीत ती राहत असे. ती सदैव समाधानी असे. सकाळपासून सायंकाळपर्यंत एका क्षणाचाही विसावा तिला मिळत नसे. त्या दिवशी कोणता तरी सण आला होता. घरोघर आनंद होता. प्रत्येकाच्या घरी आज कोणते ना कोणते तरी पक्वान्न करण्यात येत होते. रामाच्या घरी त्याच्या बापाने श्रीखंडासाठी चक्का आणला होता. मधुकरला बासुंदी आवडे म्हणून त्याच्या आईने कढईत दूध आटत ठेवले होते. गोविंदाच्या घरी पुरणपोळी होती. परंतु आमच्या त्या गरीब मोलकरणीच्या झोपडीत काय करण्यात येणार होते?