अतीत आज किती वर्षांनी या "बालसुधारक" समाज संस्थेमध्ये मी पाऊल ठेवत आहे. जवळ जवळ पाच-सहा वर्ष झाली असतील, परंतु इथल्या व्यवस्थेमध्ये किती फरक पडला होता. संस्थे समोरील हिरवागार बगीचा,इमारतीच्या गेटवर सुवर्णाक्षरात सोनेरीवर्खाने चमकणारी "बालसुधारक समाज संस्था" म्हणून हि मोठी अक्षरं नजरेला आकर्षित करत होती. पत्र्याच्या आडोशाने उभं असलेलं हे बालमुलांच घरकुल, एक मोठ्या इमारतीच्या स्वरूपात उभं होत. यामध्ये काम करणाऱ्या परिचारिका बर्याचश्या नवीन चेहऱ्याच्या दिसत होत्या. मी क्षणभर भांबावून गेलो आणि इकडे तिकडे नजर फिरवता फिरवता एक मॅम माझ्याच दिशेने येताना दिसली.