१२. पाझर सुखाचा...- ‘मावशी, मी आशा बोलतेय. संगीताची मुलगी आशा. या विकेंडला तुम्हाला वेळ आहे का मी तुमच्याकडे आले असते,’ फोनवरचे बोलणे ऐकून माधुरीला आनंदाचा धक्काच बसला. ‘हो, नक्की ये,’ असे म्हणून तिने आशाला तिच्या घराचा पत्ता नीट सांगून कसे यायचे याविषयी सूचना दिल्या आणि , ‘ये मग नक्की, बाय’ असे म्हणून फोन ठेवला. आशा तिच्या माहेरी काम करणाऱ्या संगीताची मुलगी. सॉफ्टवेअर इंजिनिअर झाल्यावर एम.एस.करण्यासाठी अमेरिकेतल्या नामवंत विद्यापीठात आली होती, हे माधुरीच्या आईकडून तिला कळलेच होते. ती फोन करुन भेटायला येईल, हे सुध्दा आईने सांगितले होते. आज तिचा फोन आल्यावर माधुरीचे मन 30 वर्षे मागे, तिच्या बालपणात गेले.